Tuesday, May 5, 2009

अध्याय अठरावा ॥ [ उत्तरार्ध्र ]( भाग पहिला )

। मोक्षसंज्ञासयोगः ।

श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात् ।

स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् ॥ ४७ ॥

अगा आपुला हा स्वधर्मु । आचरणीं जरी विषमु ।

तरी पाहावा तो परिणामु । फळेल जेणें ॥ ९२३ ॥

जैं सुखालागीं आपणपयां । निंबचि आथी धनंजया ।

तैं कडुवटपणा तयाचिया । उबगिजेना ॥ ९२४ ॥

फळणया ऐलीकडे । केळीतें पाहातां आस मोडे ।

ऐसी त्यजिली तरी जोडे । तैसें कें गोमटें ॥ ९२५ ॥

तेवीं स्वधर्मु सांकडु । देखोनि केला जरी कडु ।

तरी मोक्षसुरवाडु । अंतरला कीं ॥ ९२६ ॥

आणि आपुली माये । कुब्ज जरी आहे ।

तरी जीये तें नोहे । स्नेह कुर्‍हें कीं ॥ ९२७ ॥

येरी जिया पराविया । रंभेहुनि बरविया ।

तिया काय कराविया । बाळकें तेणें ? ॥ ९२८ ॥

अगा पाणियाहूनि बहुवें । तुपीं गुण कीर आहे ।

परी मीना काय होये । असणें तेथ ॥ ९२९ ॥

पैं आघविया जगा जें विख । तें विख किडियाचें पीयूख ।

आणि जगा गूळ तें देख । मरण तया ॥ ९३० ॥

म्हणौनि जे विहित जया जेणें । फिटे संसाराचें धरणें ।

क्रिया कठोर तर्‍ही तेणें । तेचि करावी ॥ ९३१ ॥

येरा पराचारा बरविया । ऐसें होईल टेंकलया ।

पायांचें चालणें डोइया । केलें जैसें ॥ ९३२ ॥

यालागीं कर्म आपुले । जें जातिस्वभावें असे आलें ।

तें करी तेणें जिंतिलें । कर्मबंधातें ॥ ९३३ ॥

आणि स्वधर्मुचि पाळावा । परधर्मु तो गाळावा ।

हा नेमुही पांडवा । न कीजेचि पै गा ? ॥ ९३४ ॥

तरी आत्मा दृष्ट नोहे । तंव कर्म करणें कां ठाये ? ।

आणि करणें तेथ आहे । आयासु आधीं ॥ ९३५ ॥

सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत् ।

सर्वारम्भा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृताः ॥ ४८॥

म्हणौनि भलतिये कर्मीं । आयासु जर्‍ही उपक्रमीं ।

तरी काय स्वधर्मीं । दोषु । सांगें ? ॥ ९३६ ॥

आगा उजू वाटा चालावें । तर्‍ही पायचि शिणवावे ।

ना आडरानें धांवावें । तर्‍ही तेंचि ॥ ९३७ ॥

पैं शिळा कां सिदोरिया । दाटणें एक धनंजया ।

परी जें वाहतां विसांवया । मिळिजे तें घेपे ॥ ९३८ ॥

येर्‍हवीं कणा आणि भूसा । कांडितांही सोसु सरिसा ।

जेंचि रंधन श्वान मांसा । तेंचि हवी ॥ ९३९ ॥

दधी जळाचिया घुसळणा । व्यापार सारिखेचि विचक्षणा ।

वाळुवे तिळा घाणा । गाळणें एक ॥ ९४० ॥

पैं नित्य होम देयावया । कां सैरा आगी सुवावया ।

फुंकितां धू धनंजया । साहणें तेंचि ॥ ९४१ ॥

परी धर्मपत्नी धांगडी । पोसितां जरी एकी वोढी ।

तरी कां अपरवडी । आणावी आंगा ? ॥ ९४२ ॥

हां गा पाठीं लागला घाई । मरण न चुकेचि पाहीं ।

तरी समोरला काई । आगळें न कीजे ? ॥ ९४३ ॥

कुलस्त्री दांड्याचे घाये । परघर रिगालीहि जरी साहे ।

तरी स्वपतीतें वायें । सांडिलें कीं । ॥ ९४४ ॥

तैसें आवडतेंही करणें । न निपजे शिणल्याविणें ।

तरी विहित बा रे कोणें । बोलें भारी ? ॥ ९४५ ॥

वरी थोडेंचि अमृत घेतां । सर्वस्व वेंचो कां पंडुसुता ।

जेणें जोडे जीविता । अक्षयत्व ॥ ९४६ ॥

येर काह्यां मोलें वेंचूनि । विष पियावे घेऊनि ।

आत्महत्येसि निमोनि । जाइजे जेणें ॥ ९४७ ॥

तैसें जाचूनियां इंद्रियें । वेंचूनि आयुष्याचेनि दिये ।

सांचलें पापीं आन आहे । दुःखावाचूनि ? ॥ ९४८ ॥

म्हणौनि करावा स्वधर्मु । जो करितां हिरोनि घे श्रमु ।

उचित देईल परमु । पुरुषार्थराजु ॥ ९४९ ॥

याकारणें किरीटी । स्वधर्माचिये राहाटी ।

न विसंबिजे संकटीं । सिद्धमंत्र जैसा ॥ ९५० ॥

कां नाव जैसी उदधीं । महारोगी दिव्यौषधी ।

न विसंबिजे तया बुद्धी । स्वकर्म येथ ॥ ९५१ ॥

मग ययाचि गा कपिध्वजा । स्वकर्माचिया महापूजा ।

तोषला ईशु तमरजा । झाडा करुनी ॥ ९५२ ॥

शुद्धसत्त्वाचिया वाटा । आणी आपुली उत्कंठा ।

भवस्वर्ग काळकूटा । ऐसें दावी ॥ ९५३ ॥

जियें वैराग्य येणें बोलें । मागां संसिद्धी रूप केलें ।

किंबहुना तें आपुलें । मेळवी खागें ॥ ९५४ ॥

मग जिंतिलिया हे भोये । पुरुष सर्वत्र जैसा होये ।

कां जालाही जें लाहे । तें आतां सांगों ॥ ९५५ ॥

असक्तबुद्धिः सर्वत्र जितात्मा विगतस्पृहः ।

नैष्कर्म्यसिद्धिं परमां संन्यासेनाधिगच्छति ॥ ४९॥

तरी देहादिक हें संसारें । सर्वही मांडलेंसे जें गुंफिरें ।

तेथ नातुडे तो वागुरें । वारा जैसा ॥ ९५६ ॥

पैं परिपाकाचिये वेळे । फळ देठें ना देठु फळें ।

न धरे तैसें स्नेह खुळें । सर्वत्र होय ॥ ९५७ ॥

पुत्र वित्त कलत्र । हे जालियाही स्वतंत्र ।

माझें न म्हणे पात्र । विषाचें जैसें ॥ ९५८ ॥

हें असो विषयजाती । बुद्धि पोळली ऐसी माघौती ।

पाउलें घेऊनि एकांतीं । हृदयाच्या रिगे ॥ ९५९ ॥

ऐसया अंतःकरण । बाह्य येतां तयाची आण ।

न मोडी समर्था भेण । दासी जैसी ॥ ९६० ॥

तैसें ऐक्याचिये मुठी । माजिवडें चित्त किरीटी ।

करूनि वेधी नेहटीं । आत्मयाच्या ॥ ९६१ ॥

तेव्हां दृष्टादृष्ट स्पृहे । निमणें जालेंचि आहे ।

आगीं दडपलिया धुयें । राहिजे जैसें ॥ ९६२ ॥

म्हणौनि नियमिलिया मानसीं । स्पृहा नासौनि जाय आपैसीं ।

किंबहुना तो ऐसी । भूमिका पावे ॥ ९६३ ॥

पैं अन्यथा बोधु आघवा । मावळोनि तया पांडवा ।

बोधमात्रींचि जीवा । ठावो होय ॥ ९६४ ॥

धरवणी वेंचें सरे । तैसें भोगें प्राचीन पुरे ।

नवें तंव नुपकरे । कांहीचि करूं ॥ ९६५ ॥

ऐसीं कर्में साम्यदशा । होय तेथ वीरेशा ।

मग श्रीगुरु आपैसा । भेटेचि गा ॥ ९६६ ॥

रात्रीची चौपाहरी । वेंचलिया अवधारीं ।

डोळ्यां तमारी । मिळे जैसा ॥ ९६७ ॥

का येऊनि फळाचा घडु । पारुषवी केळीची वाढु ।

श्रीगुरु भेटोनि करी पाडु । बुभुत्सु तैसा ॥ ९६८ ॥

मग आलिंगिला पूर्णिमा । जैसा उणीव सांडी चंद्रमा ।

तैसें होय वीरोत्तमा । गुरुकृपा तया ॥ ९६९ ॥

तेव्हां अबोधुमात्र असे । तो तंव तया कृपा नासे ।

तेथ निशीसवें जैसें । आंधारें जाय ॥ ९७० ॥

तैसी अबोधाचिये कुशी । कर्म कर्ता कार्य ऐशी ।

त्रिपुटी असे ते जैसी । गाभिणी मारिली ॥ ९७१ ॥

तैसेंचि अबोधनाशासवें । नाशे क्रियाजात आघवें ।

ऐसा समूळ संभवे । संन्यासु हा ॥ ९७२ ॥

येणें मुळाज्ञानसंन्यासें । दृश्याचा जेथ ठावो पुसे ।

तेथ बुझावें तें आपैसें । तोचि आहे ॥ ९७३ ॥

चेइलियावरी पाहीं । स्वप्नींचिया तिये डोहीं ।

आपणयातें काई । काढूं जाइजे ? ॥ ९७४ ॥

तैं मी नेणें आतां जाणेन । हें सरलें तया दुःस्वप्न ।

जाला ज्ञातृज्ञेयाविहीन । चिदाकाश ॥ ९७५ ॥

मुखाभासेंसी आरिसा । परौता नेलिया वीरेशा ।

पाहातेपणेंवीण जैसा । पाहाता ठाके ॥ ९७६ ॥

तैसें नेणणें जें गेलें । तेणें जाणणेंही नेलें ।

मग निष्क्रिय उरलें । चिन्मात्रचि ॥ ९७७ ॥

तेथ स्वभावें धनंजया । नाहीं कोणीचि क्रिया ।

म्हणौनि प्रवादु तया । नैष्कर्म्यु ऐसा ॥ ९७८ ॥

तें आपुलें आपणपें । असे तेंचि होऊनि हारपे ।

तरंगु कां वायुलोपें । समुद्रु जैसा ॥ ९७९ ॥

तैसें न होणें निफजे । ते नैष्कर्म्यसिद्धि जाणिजे ।

सर्वसिद्धींत सहजें । परम हेचि ॥ ९८० ॥

देउळाचिया कामा कळसु । उपरम गंगेसी सिंधु प्रवेशु ।

कां सुवर्णशुद्धी कसु । सोळावा जैसा ॥ ९८१ ॥

तैसें आपुलें नेणणें । फेडिजे का जाणणें ।

तेंहि गिळूनि असणें । ऐसी जे दशा ॥ ९८२ ॥

तियेपरतें कांहीं । निपजणें आन नाहीं ।

म्हणौनि म्हणिपे पाहीं । परमसिद्धि ते ॥ ९८३ ॥

सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे ।

समासेनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा ॥ ५०॥

परी हेचि आत्मसिद्धि । जो कोणी भाग्यनिधि ।

श्रीगुरुकृपालब्धि\- । काळीं पावे ॥ ९८४ ॥

उदयतांचि दिनकरु । प्रकाशुचि आते आंधारु ।

कां दीपसंगें कापुरु । दीपुचि होय ॥ ९८५ ॥

तया लवणाची कणिका । मिळतखेंवो उदका ।

उदकचि होऊनि देखा । ठाके जेवीं ॥ ९८६ ॥

कां निद्रितु चेवविलिया । स्वप्नेंसि नीद वायां ।

जाऊनि आपणपयां । मिळे जैसा ॥ ९८७ ॥

तैसें जया कोण्हासि दैवें । गुरुवाक्यश्रवणाचि सवें ।

द्वैत गिळोनि विसंवे । आपणया वृत्ती ॥ ९८८ ॥

तयासी मग कर्म करणें । हें बोलिजैलचि कवणें ।

आकाशा येणें जाणें । आहे काई ? । ॥ ९८९ ॥

म्हणौनि तयासि कांहीं । त्रिशुद्धि करणें नाहीं ।

परी ऐसें जरी हें कांहीं । नव्हे जया ॥ ९९० ॥

कानावचनाचिये भेटी- । सरिसाचि पैं किरीटी ।

वस्तु होऊनि उठी । कवणि एकु जो ॥ ९९१ ॥

येर्‍हवीं स्वकर्माचेनि वन्ही । काम्यनिषिद्धाचिया इंधनीं ।

रजतमें कीर दोन्ही । जाळिलीं आधीं ॥ ९९२ ॥

पुत्र वित्त परलोकु । यया तिहींचा अभिलाखु ।

घरीं होय पाइकु । हेंही जालें ॥ ९९३ ॥

इंद्रियें सैरा पदार्थीं । रिगतां विटाळलीं होतीं ।

तिये प्रत्याहार तीर्थीं । न्हाणिलीं कीर ॥ ९९४ ॥

आणि स्वधर्माचें फळ । ईश्वरीं अर्पूनि सकळ ।

घेऊनि केलें अढळ । वैराग्यपद ॥ ९९५ ॥

ऐसी आत्मसाक्षात्कारीं । लाभे ज्ञानाची उजरी ।

ते सामुग्री कीर पुरी । मेळविली ॥ ९९६ ॥

आणि तेचि समयीं । सद्‍गुरु भेटले पाहीं ।

तेवींचि तिहीं कांहीं । वंचिजेना ॥ ९९७ ॥

परी वोखद घेतखेंवो । काय लाभे आपला ठावो ? ।

कां उदयजतांचि दिवो । मध्यान्ह होय ? ॥ ९९८ ॥

सुक्षेत्रीं आणि वोलटें । बीजही पेरिलें गोमटें ।

तरी आलोट फळ भेटे । परी वेळे कीं गा ॥ ९९९ ॥

जोडला मार्गु प्रांजळु । मिनला सुसंगाचाही मेळु ।

तरी पाविजे वांचूनि वेळु । लागेचि कीं ॥ १००० ॥

तैसा वैराग्यलाभु जाला । वरी सद्‍गुरुही भेटला ।

जीवीं अंकुरु फुटला । विवेकाचा ॥ १००१ ॥

तेणें ब्रह्म एक आथी । येर आघवीचि भ्रांती ।

हेही कीर प्रतीती । गाढ केली ॥ १००२ ॥

परी तेंचि जें परब्रह्म । सर्वात्मक सर्वोत्तम ।

मोक्षाचेंही काम । सरे जेथ ॥ १००३ ॥

यया तिन्ही अवस्था पोटीं । जिरवी जें गा किरीटी ।

तया ज्ञानासिही मिठी । दे जे वस्तु ॥ १००४ ॥

ऐक्याचें एकपण सरे । जेथ आनंदकणुही विरे ।

कांहींचि नुरोनि उरे । जें कांहीं गा ॥ १००५ ॥

तियें ब्रह्मीं ऐक्यपणें । ब्रह्मचि होऊनि असणें ।

तें क्रमेंचि करूनि तेणें । पाविजे पैं ॥ १००६ ॥

भुकेलियापासीं । वोगरिलें षड्रसीं ।

तो तृप्ति प्रतिग्रासीं । लाहे जेवीं ॥ १००७ ॥

तैसा वैराग्याचा वोलावा । विवेकाचा तो दिवा ।

आंबुथितां आत्मठेवा । काढीचि तो ॥ १००८ ॥

तरी भोगिजे आत्मऋद्धी । येवढी योग्यतेची सिद्धी ।

जयाच्या आंगीं निरवधी । लेणें जाली ॥ १००९ ॥

तो जेणें क्रमें ब्रह्म । होणें करी गा सुगम ।

तया क्रमाचें आतां वर्म । आईक सांगों ॥ १०१० ॥

बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च ।

शब्दादीन्विषयांस्त्यक्त्वा रागद्वेषौ व्युदस्य च ॥ ५१॥

तरी गुरु दाविलिया वाटा । येऊन विवेकतीर्थतटा ।

धुऊनियां मळकटा । बुद्धीचा तेणें ॥ १०११ ॥

मग राहूनें उगळिली । प्रभा चंद्रें आलिंगिली ।

तैसी शुद्धत्वें जडली । आपणयां बुद्धि ॥ १०१२ ॥

सांडूनि कुळें दोन्ही । प्रियासी अनुसरे कामिनी ।

द्वंद्वत्यागें स्वचिंतनीं । पडली तैसी ॥ १०१३ ॥

आणि ज्ञान ऐसें जिव्हार । नेवों नेवों निरंतर ।

इंद्रियीं केले थोर । शब्दादिक जे ॥ १०१४ ॥

ते रश्मिजाळ काढलेया । मृगजळ जाय लया ।

तैसें वृत्तिरोधें तयां । पांचांही केलें ॥ १०१५ ॥

नेणतां अधमाचिया अन्ना । खादलिया कीजे वमना ।

तैसीं वोकविली सवासना । इंद्रियें विषयीं ॥ १०१६ ॥

मग प्रत्यगावृत्ती चोखटें । लाविलीं गंगेचेनि तटें ।

ऐसीं प्रायश्चित्तें धुवटें । केलीं येणें ॥ १०१७ ॥

पाठीं सात्विकें धीरें तेणें । शोधारलीं तियें करणें ।

मग मनेंसीं योगधारणें । मेळविलीं ॥ १०१८ ॥

तेवींचि प्राचीनें इष्टानिष्टें । भोगेंसीं येउनी भेटे ।

तेथ देखिलियाही वोखटें । द्वेषु न करी ॥ १०१९ ॥

ना गोमटेंचि विपायें । तें आणूनि पुढां सूये ।

तयालागीं न होये । साभिलाषु ॥ १०२० ॥

यापरी इष्टानिष्टींंं । रागद्वेष किरीटी ।

त्यजूनि गिरिकपाटीं । निकुंजीं वसे ॥ १०२१ ॥

विविक्तसेवी लघ्वाशी यतवाक्कायमानसः ।

ध्यानयोगपरो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः ॥ ५२॥

गजबजा सांडिलिया । वसवी वनस्थळिया ।

अंगाचियाचि मांदिया । एकलेया ॥ १०२२ ॥

शमदमादिकीं खेळे । न बोलणेंचि चावळे ।

गुरुवाक्याचेनि मेळें । नेणे वेळु ॥ १०२३ ॥

आणि आंगा बळ यावें । नातरी क्षुधा जावें ।

कां जिभीचे पुरवावे । मनोरथ ॥ १०२४ ॥

भोजन करितांविखीं । ययां तिहींतें न लेखी ।

आहारीं मिती संतोषीं । माप न सूये ॥ १०२५ ॥

अशनाचेनि पावकें । हारपतां प्राणु पोखे ।

इतुकियाचि भागु मोटकें । अशन करी ॥ १०२६ ॥

आणि परपुरुषें कामिली । कुळवधू आंग न घाली ।

निद्रालस्या न मोकली । आसन तैसें ॥ १०२७ ॥

दंडवताचेनि प्रसंगें । भुयीं हन अंग लागे ।

वांचूनि येर नेघे । राभस्य तेथ ॥ १०२८ ॥

देहनिर्वाहापुरतें । राहाटवी हातांपायांतें ।

किंबहुना आपैतें । सबाह्य केलें ॥ १०२९ ॥

आणि मनाचा उंबरा । वृत्तीसी देखों नेदी वीरा ।

तेथ कें वाग्व्यापारा । अवकाशु असे ? ॥ १०३० ॥

ऐसेनि देह वाचा मानस । हें जिणौनि बाह्यप्रदेश ।

आकळिलें आकाश । ध्यानाचें तेणें ॥ १०३१ ॥

गुरुवाक्यें उठविला । बोधीं निश्चयो आपुला ।

न्याहाळीं हातीं घेतला । आरिसा जैसा ॥ १०३२ ॥

पैं ध्याता आपणचि परी । ध्यानरूप वृत्तिमाझारीं ।

ध्येयत्वें घे हे अवधारीं । ध्यानरूढी गा ॥ १०३३ ॥

तेथ ध्येय ध्यान ध्याता । ययां तिहीं एकरूपता ।

होय तंव पंडुसुता । कीजे तें गा ॥ १०३४ ॥

म्हणौनि तो मुमुक्षु । आत्मज्ञानीं जाला दक्षु ।

परी पुढां सूनि पक्षु । योगाभ्यासाचा ॥ १०३५ ॥

अपानरंध्रद्वया । माझारीं धनंजया ।

पार्ष्णीं पिडूनियां । कांवरुमूळ ॥ १०३६ ॥

आकुंचूनि अध । देऊनि तिन्ही बंध ।

करूनि एकवद । वायुभेदी ॥ १०३७ ॥

कुंडलिनी जागवूनि । मध्यमा विकाशूनि ।

आधारादि भेदूनि । आज्ञावरी ॥ १०३८ ॥

सहस्त्रदळाचा मेघु । पीयुषें वर्षोनि चांगु ।

तो मूळवरी वोघु । आणूनियां ॥ १०३९ ॥

नाचतया पुण्यगिरी । चिद्‍भैरवाच्या खापरीं ।

मनपवनाची खीच पुरी । वाढूनियां ॥ १०४० ॥

जालिया योगाचा गाढा । मेळावा सूनि हा पुढां ।

ध्यान मागिलीकडां । स्वयंभ केलें ॥ १०४१ ॥

आणि ध्यान योग दोन्ही । इयें आत्मतत्वज्ञानीं ।

पैठा होआवया निर्विघ्नीं । आधींचि तेणें ॥ १०४२ ॥

वीतरागतेसारिखा । जोडूनि ठेविला सखा ।

तो आघवियाचि भूमिका- । सवें चाले ॥ १०४३ ॥

पहावें दिसे तंववरी । दिठीतें न संडी दीप जरी ।

तरी कें आहे अवसरी । देखावया ॥ १०४४ ॥

तैसें मोक्षीं प्रवर्तलया । वृत्ती ब्रह्मीं जाय लया ।

तंव वैराग्य आथी तया । भंगु कैचा । ॥ १०४५ ॥

म्हणौनि सवैराग्यु । ज्ञानाभ्यासु तो सभाग्यु ।

करूनि जाला योग्यु । आत्मलाभा ॥ १०४६ ॥

ऐसी वैराग्याची आंगीं । बाणूनियां वज्रांगीं ।

राजयोगतुरंगीं । आरूढला ॥ १०४७ ॥

वरी आड पडिलें दिठी । सानें थोर निवटी ।

तें बळीं विवेकमुष्टीं । ध्यानाचें खांडें ॥ १०४८ ॥

ऐसेनि संसाररणाआंतु । आंधारीं सूर्य तैसा असे जातु ।

मोक्षविजयश्रीये वरैतु । होआवयालागीं ॥ १०४९ ॥

अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहम् ।

विमुच्य निर्ममः शान्तो ब्रह्मभूयाय कल्पते ॥ ५३॥

तेथ आडवावया आले । दोषवैरी जे धोपटिले ।

तयांमाजीं पहिलें । देहाहंकारु ॥ १०५० ॥

जो न मोकली मारुनी । जीवों नेदी उपजवोनि ।

विचंबवी खोडां घालुनी । हाडांचिया ॥ १०५१ ॥

तयाचा देहदुर्ग हा थारा । मोडूनि घेतला तो वीरा ।

आणि बळ हा दुसरा । मारिला वैरी ॥ १०५२ ॥

जो विषयाचेनि नांवें । चौगुणेंही वरी थांवे ।

जेणें मृतावस्था धांवे । सर्वत्र जगा ॥ १०५३ ॥

तो विषय विषाचा अथावो । आघविया दोषांचा रावो ।

परी ध्यानखड्गाचा घावो । साहेल कैंचा ? ॥ १०५४ ॥

आणि प्रिय विषयप्राप्ती । करी जया सुखाची व्यक्ती ।

तेचि घालूनि बुंथी । आंगीं जो वाजे ॥ १०५५ ॥

जो सन्मार्गा भुलवी । मग अधर्माच्या आडवीं ।

सूनि वाघां सांपडवी । नरकादिकां ॥ १०५६ ॥

तो विश्वासें मारितां रिपु । निवटूनि घातला दर्पु ।

आणि जयाचा अहा कंपु । तापसांसी ॥ १०५७ ॥

क्रोधा ऐसा महादोखु । जयाचा देखा परिपाकु ।

भरिजे तंव अधिकु । रिता होय जो ॥ १०५८ ॥

तो कामु कोणेच ठायीं । नसे ऐसें केलें पाहीं ।

कीं तेंचि क्रोधाही । सहजें आलें ॥ १०५९ ॥

मुळाचें तोडणें जैसें । होय कां शाखोद्देशें ।

कामु नाशलेनि नाशे । तैसा क्रोधु ॥ १०६० ॥

म्हणौनि काम वैरी । जाला जेथ ठाणोरी ।

तेथ सरली वारी । क्रोधाचीही ॥ १०६१ ॥

आणि समर्थु आपुला खोडा । शिसें वाहवी जैसा होडा ।

तैसा भुंजौनि जो गाढा । परीग्रहो ॥ १०६२ ॥

जो माथांचि पालाणवी । अंगा अवगुण घालवी ।

जीवें दांडी घेववी । ममत्वाची ॥ १०६३ ॥

शिष्यशास्त्रादिविलासें । मठादिमुद्रेचेनि मिसें ।

घातले आहाती फांसे । निःसंगा जेणें ॥ १०६४ ॥

घरीं कुटुंबपणें सरे । तरी वनीं वन्य होऊनि अवतरे ।

नागवीयाही शरीरें । लागला आहे ॥ १०६५ ॥

ऐसा दुर्जयो जो परीग्रहो । तयाचा फेडूनि ठावो ।

भवविजयाचा उत्साहो । भोगीतसे जो ॥ १०६६ ॥

तेथ अमानित्वादि आघवे । ज्ञानगुणाचे जे मेळावे ।

ते कैवल्यदेशींचे आघवे । रावो जैसे आले ॥ १०६७ ॥

तेव्हां सम्यक्‍ज्ञानाचिया । राणिवा उगाणूनि तया ।

परिवारु होऊनियां । राहत आंगें ॥ १०६८ ॥

प्रवृत्तीचिये राजबिदीं । अवस्थाभेदप्रमदीं ।

कीजत आहे प्रतिपदीं । सुखाचें लोण ॥ १०६९ ॥

पुढां बोधाचिये कांबीवरी । विवेकु दृश्याची मांदी सारी ।

योगभूमिका आरती करी । येती जैसिया ॥ १०७० ॥

तेथ ऋद्धिसिद्धींचीं अनेगें । वृंदें मिळती प्रसंगें ।

तिये पुष्पवर्षीं आंगें । नाहातसे तो ॥ १०७१ ॥

ऐसेनि ब्रह्मैक्यासारिखें । स्वराज्य येतां जवळिकें ।

झळंबित आहे हरिखें । तिन्ही लोक ॥ १०७२ ॥

तेव्हां वैरियां कां मैत्रियां । तयासि माझें म्हणावया ।

समानता धनंजया । उरेचिही ना ॥ १०७३ ॥

हें ना भलतेणें व्याजें । तो जयातें म्हणे माझें ।

तें नोडवेचि कां दुजें । अद्वितीय जाला ॥ १०७४ ॥

पैं आपुलिया एकी सत्ता । सर्वही कवळूनिया पंडुसुता ।

कहीं न लगती ममता । धाडिली तेणें ॥ १०७५ ॥

ऐसा जिंतिलिया रिपुवर्गु । अपमानिलिया हें जगु ।

अपैसा योगतुरंगु । स्थिर जाला ॥ १०७६ ॥

वैराग्याचें गाढलें । अंगी त्राण होतें भलें ।

तेंही नावेक ढिलें । तेव्हां करी ॥ १०७७ ॥

आणि निवटी ध्यानाचें खांडें । तें दुजें नाहींचि पुढें ।

म्हणौनि हातु आसुडें । वृत्तीचाही ॥ १०७८ ॥

जैसें रसौषध खरें । आपुलें काज करोनि पुरें ।

आपणही नुरे । तैसें होतसे ॥ १०७९ ॥

देखोनि ठाकिता ठावो । धांवता थिरावे पावो ।

तैसा ब्रह्मसामीप्यें थावो । अभ्यासु सांडी ॥ १०८० ॥

घडतां महोदधीसी । गंगा वेगु सांडी जैसी ।

कां कामिनी कांतापासीं । स्थिर होय ॥ १०८१ ॥

नाना फळतिये वेळे । केळीची वाढी मांटुळे ।

कां गांवापुढें वळे । मार्गु जैसा ॥ १०८२ ॥

तैसा आत्मसाक्षात्कारु । होईल देखोनि गोचरु ।

ऐसा साधनहतियेरु । हळुचि ठेवी ॥ १०८३ ॥

म्हणौनि ब्रह्मेंसी तया । ऐक्याचा समो धनंजया ।

होतसे तैं उपाया । वोहटु पडे ॥ १०८४ ॥

मग वैराग्याची गोंधळुक । जे ज्ञानाभ्यासाचें वार्धक्य ।

योगफळाचाही परिपाक । दशा जे कां ॥ १०८५ ॥

ते शांति पैं गा सुभगा । संपूर्ण ये तयाचिया आंगा ।

तैं ब्रह्म होआवया जोगा । होय तो पुरुषु ॥ १०८६ ॥

पुनवेहुनी चतुर्दशी । जेतुलें उणेपण शशी ।

कां सोळे पाऊनि जैसी । पंधरावी वानी ॥ १०८७ ॥

सागरींही पाणी वेगें । संचरे तें रूप गंगे ।

येर निश्चळ जें उगें । तें समुद्रु जैसा ॥ १०८८ ॥

ब्रह्मा आणि ब्रह्महोतिये । योग्यते तैसा पाडु आहे ।

तेंचि शांतीचेनि लवलाहें । होय तो गा ॥ १०८९ ॥

पैं तेंचि होणेंनवीण । प्रतीती आलें जें ब्रह्मपण ।

ते ब्रह्म होती जाण । योग्यता येथ ॥ १०९० ॥

ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा न शोचति न काण्‍क्षति ।

समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम् ॥ ५४॥

ते ब्रह्मभावयोग्यता । पुरुषु तो मग पंडुसुता ।

आत्मबोधप्रसन्नता\- । पदीं बैसे ॥ १०९१ ॥

जेणें निपजे रससोय । तो तापुही जैं जाय ।

तैं ते कां होय । प्रसन्न जैसी ॥ १०९२ ॥

नाना भरतिया लगबगा । शरत्काळीं सांडिजे गंगा ।

कां गीत रहातां उपांगा । वोहटु पडे ॥ १०९३ ॥

तैसा आत्मबोधीं उद्यमु । करितां होय जो श्रमु ।

तोही जेथें समु । होऊनि जाय ॥ १०९४ ॥

आत्मबोधप्रशस्ती । हे तिये दशेची ख्याती ।

ते भोगितसे महामती । योग्यु तो गा ॥ १०९५ ॥

तेव्हां आत्मत्वें शोचावें । कांहीं पावावया कामावें ।

हें सरलें समभावें । भरितें तया ॥ १०९६ ॥

उदया येतां गभस्ती । नाना नक्षत्रव्यक्ती ।

हारवीजती दीप्ती । आंगिका जेवीं ॥ १०९७ ॥

तेवीं उठतिया आत्मप्रथा । हे भूतभेदव्यवस्था ।

मोडीत मोडीत पार्था । वास पाहे तो ॥ १०९८ ॥

पाटियेवरील अक्षरें । जैसीं पुसतां येती करें ।

तैसीं हारपती भेदांतरें । तयाचिये दृष्टी ॥ १०९९ ॥

तैसेनि अन्यथा ज्ञानें । जियें घेपती जागरस्वप्नें ।

तियें दोन्ही केलीं लीनें । अव्यक्तामाजीं ॥ ११०० ॥

मग तेंही अव्यक्त । बोध वाढतां झिजत ।

पुरलां बोधीं समस्त । बुडोनि जाय ॥ ११०१ ॥

जैसी भोजनाच्या व्यापारीं । क्षुधा जिरत जाय अवधारीं ।

मग तृप्तीच्या अवसरीं । नाहींच होय ॥ ११०२ ॥

नाना चालीचिया वाढी । वाट होत जाय थोडी ।

मग पातला ठायीं बुडी । देऊनि निमे ॥ ११०३ ॥

कां जागृति जंव जंव उद्दीपे । तंव तंव निद्रा हारपे ।

मग जागीनलिया स्वरूपें । नाहींच होय ॥ ११०४ ॥

हें ना आपुलें पूर्णत्व भेटें । जेथ चंद्रासीं वाढी खुंटे ।

तेथ शुक्लपक्षु आटे । निःशेषु जैसा ॥ ११०५ ॥

तैसा बोध्यजात गिळितु । बोधु बोधें ये मज आंतु ।

मिसळला तेथ साद्यंतु । अबोधु गेला ॥ ११०६ ॥

तेव्हां कल्पांताचिये वेळे । नदी सिंधूचें पेंडवळें ।

मोडूनि भरलें जळें । आब्रह्म जैसें ॥ ११०७ ॥

नाना गेलिया घट मठ । आकाश ठाके एकवट ।

कां जळोनि काष्ठें काष्ठ । वन्हीचि होय ॥ ११०८ ॥

नातरी लेणियांचे ठसे । आटोनि गेलिया मुसे ।

नामरूप भेदें जैसें । सांडिजे सोनें ॥ ११०९ ॥

हेंही असो चेइलया । तें स्वप्न नाहीं जालया ।

मग आपणचि आपणयां । उरिजे जैसें ॥ १११० ॥

तैसी मी एकवांचूनि कांहीं । तया तयाहीसकट नाहीं ।

हे चौथी भक्ति पाहीं । माझी तो लाहे ॥ ११११ ॥

येर आर्तु जिज्ञासु अर्थार्थी । हे भजती जिये पंथीं ।

ते तिन्ही पावोनी चौथी । म्हणिपत आहे ॥ १११२ ॥

येर्‍हवीं तिजी ना चौथी । हे पहिली ना सरती ।

पैं माझिये सहजस्थिती । भक्ति नाम ॥ १११३ ॥

जें नेणणें माझें प्रकाशूनि । अन्यथात्वें मातें दाऊनि ।

सर्वही सर्वीं भजौनि । बुझावीतसे जे ॥ १११४ ॥

जो जेथ जैसें पाहों बैसे । तया तेथ तैसेंचि असे ।

हें उजियेडें कां दिसे । अखंडें जेणें ॥ १११५ ॥

स्वप्नाचें दिसणें न दिसणें । जैसें आपलेनि असलेपणें ।

विश्वाचें आहे नाहीं जेणें । प्रकाशें तैसें ॥ १११६ ॥

ऐसा हा सहज माझा । प्रकाशु जो कपिध्वजा ।

तो भक्ति या वोजा । बोलिजे गा ॥ १११७ ॥

म्हणौनि आर्ताच्या ठायीं । हे आर्ति होऊनि पाहीं ।

अपेक्षणीय जें कांहीं । तें मीचि केला ॥ १११८ ॥

जिज्ञासुपुढां वीरेशा । हेचि होऊनि जिज्ञासा ।

मी कां जिज्ञास्यु ऐसा । दाखविला ॥ १११९ ॥

हेंचि होऊनि अर्थना । मीचि माझ्या अर्थीं अर्जुना ।

करूनि अर्थाभिधाना । आणी मातें ॥ ११२० ॥

एवं घेऊनि अज्ञानातें । माझी भक्ति जे हे वर्ते ।

ते दावी मज द्रष्टयातें । दृश्य करूनि ॥ ११२१ ॥

येथें मुखचि दिसे मुखें । या बोला कांहीं न चुके ।

तरी दुजेपण हें लटिकें । आरिसा करी ॥ ११२२ ॥

दिठी चंद्रचि घे साचें । परी येतुलें हें तिमिराचें ।

जे एकचि असे तयाचे । दोनी दावी ॥ ११२३ ॥

तैसा सर्वत्र मीचि मियां । घेपतसें भक्ति इया ।

परी दृश्यत्व हें वायां । अज्ञानवशें ॥ ११२४ ॥

तें अज्ञान आतां फिटलें । माझें दृष्टृत्व मज भेटलें ।

निजबिंबीं एकवटलें । प्रतिबिंब जैसें ॥ ११२५ ॥

पैं जेव्हांही असे किडाळ । तेव्हांही सोनेंचि अढळ ।

परी तें कीड गेलिया केवळ । उरे जैसें ॥ ११२६ ॥

हां गा पूर्णिमे आधीं कायी । चंद्रु सावयवु नाहीं ? ।

परी तिये दिवशीं भेटे पाहीं । पूर्णता तया ॥ ११२७ ॥

तैसा मीचि ज्ञानद्वारें । दिसें परी हस्तांतरें ।

मग दृष्टृत्व तें सरे । मियांचि मी लाभें ॥ ११२८ ॥

म्हणौनि दृश्यपथा- । अतीतु माझा पार्था ।

भक्तियोगु चवथा । म्हणितला गा ॥ ११२९ ॥

भक्त्या मामभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वतः ।

ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनन्तरम् ॥ ५५॥

या ज्ञान भक्ति सहज । भक्तु एकवटला मज ।

मीचि केवळ हें तुज । श्रुतही आहे ॥ ११३० ॥

जे उभऊनियां भुजा । ज्ञानिया आत्मा माझा ।

हे बोलिलों कपिध्वजा । सप्तमाध्यायीं ॥ ११३१ ॥

ते कल्पादीं भक्ति मियां । श्रीभागवतमिषें ब्रह्मया ।

उत्तम म्हणौनि धनंजया । उपदेशिली ॥ ११३२ ॥

ज्ञानी इयेतें स्वसंवित्ती । शैव म्हणती शक्ती ।

आम्ही परम भक्ती । आपुली म्हणो ॥ ११३३ ॥

हे मज मिळतिये वेळे । तया क्रमयोगियां फळे ।

मग समस्तही निखिळें । मियांचि भरे ॥ ११३४ ॥

तेथ वैराग्य विवेकेंसी । आटे बंध मोक्षेंसीं ।

वृत्ती तिये आवृत्तीसीं । बुडोनि जाय ॥ ११३५ ॥

घेऊनि ऐलपणातें । परत्व हारपें जेथें ।

गिळूनि चार्‍ही भूतें । आकाश जैसें ॥ ११३६ ॥

तया परी थडथाद । साध्यसाधनातीत शुद्ध ।

तें मी होऊनि एकवद । भोगितो मातें ॥ ११३७ ॥

घडोनि सिंधूचिया आंगा । सिंधूवरी तळपे गंगा ।

तैसा पाडु तया भोगा । अवधारी जो ॥ ११३८ ॥

कां आरिसयासि आरिसा । उटूनि दाविलिया जैसा ।

देखणा अतिशयो तैसा । भोगणा तिये ॥ ११३९ ॥

हे असो दर्पणु नेलिया । तो मुख बोधुही गेलिया ।

देखलेंपण एकलेया । आस्वादिजे जेवीं ॥ ११४० ॥

चेइलिया स्वप्न नाशे । आपलें ऐक्यचि दिसे ।

ते दुजेनवीण जैसें । भोगिजे का ॥ ११४१ ॥

तोचि जालिया भोगु तयाचा । न घडे हा भावो जयांचा ।

तिहीं बोलें केवीं बोलाचा । उच्चारु कीजे ॥ ११४२ ॥

तयांच्या नेणों गांवीं । रवी प्रकाशी हन दिवी ।

कीं व्योमालागीं मांडवी । उभिली तिहीं ॥ ११४३ ॥

हां गा राजन्यत्व नव्हतां आंगीं । रावो रायपण काय भोगी ? ।

कां आंधारु हन आलिंगी । दिनकरातें ? ॥ ११४४ ॥

आणि आकाश जें नव्हे । तया आकाश काय जाणवे ? ।

रत्नाच्या रूपीं मिरवे । गुंजांचें लेणें ? ॥ ११४५ ॥

म्हणौनि मी होणें नाहीं । तया मीचि आहें केहीं ।

मग भजेल हें कायी । बोलों कीर ॥ ११४६ ॥

यालागीं तो क्रमयोगी । मी जालाचि मातें भोगी ।

तारुण्य कां तरुणांगीं । जियापरी ॥ ११४७ ॥

तरंग सर्वांगीं तोय चुंबी । प्रभा सर्वत्र विलसे बिंबीं ।

नाना अवकाश नभीं । लुंठतु जैसा ॥ ११४८ ॥

तैसा रूप होऊनि माझें । मातें क्रियावीण तो भजे ।

अलंकारु का सहजें । सोनयातें जेवीं ॥ ११४९ ॥

का चंदनाची द्रुती जैसी । चंदनीं भजे अपैसी ।

का अकृत्रिम शशीं । चंद्रिका ते ॥ ११५० ॥

तैसी क्रिया कीर न साहे । तर्‍ही अद्वैतीं भक्ति आहे ।

हें अनुभवाचिजोगें नव्हे । बोलाऐसें ॥ ११५१ ॥

तेव्हां पूर्वसंस्कार छंदें । जें कांहीं तो अनुवादे ।

तेणें आळविलेनि वो दें । बोलतां मीचि ॥ ११५२ ॥

बोलतया बोलताचि भेटे । तेथें बोलिलें हें न घटे ।

तें मौन तंव गोमटें । स्तवन माझें ॥ ११५३ ॥

म्हणौनि तया बोलतां । बोली बोलतां मी भेटतां ।

मौन होय तेणें तत्वतां । स्तवितो मातें ॥ ११५४ ॥

तैसेंचि बुद्धी का दिठी । जें तो देखों जाय किरीटी ।

तें देखणें दृश्य लोटी । देखतेंचि दावी ॥ ११५५ ॥

आरिसया आधीं जैसें । देखतेंचि मुख दिसेअ ।

तयाचें देखणें तैसें । मेळवी द्रष्टें ॥ ११५६ ॥

दृश्य जाउनियां द्रष्टें । द्रष्टयासीचि जैं भेटे ।

तैं एकलेपणें न घटे । द्रष्टेपणही ॥ ११५७ ॥

तेथ स्वप्नींचिया प्रिया । चेवोनि झोंबो गेलिया ।

ठायिजे दोन्ही न होनियां । आपणचि जैसें ॥ ११५८ ॥

का दोहीं काष्ठाचिये घृष्टी\- । माजीं वन्हि एक उठी ।

तो दोन्ही हे भाष आटी । आपणचि होय ॥ ११५९ ॥

नाना प्रतिबिंब हातीं । घेऊं गेलिया गभस्ती ।

बिंबताही असती । जाय जैसी ॥ ११६० ॥

तैसा मी होऊनि देखतें । तो घेऊं जाय दृश्यातें ।

तेथ दृश्य ने थितें । द्रष्टृत्वेंसीं ॥ ११६१ ॥

रवि आंधारु प्रकाशिता । नुरेचि जेवीं प्रकाश्यता ।

तेंवीं दृश्यीं नाही द्रष्टृता । मी जालिया ॥ ११६२ ॥

मग देखिजे ना न देखिजे । ऐसी जे दशा निपजे ।

ते तें दर्शन माझें । साचोकारें ॥ ११६३ ॥

तें भलतयाही किरीटी । पदार्थाचिया भेटी ।

द्रष्टृदृश्यातीता दृष्टी । भोगितो सदा ॥ ११६४ ॥

आणि आकाश हें आकाशें । दाटलें न ढळें जैसें ।

मियां आत्मेन आपणपें तैसें । जालें तया ॥ ११६५ ॥

कल्पांतीं उदक उदकें । रुंधिलिया वाहों ठाके ।

तैसा आत्मेनि मियां येकें । कोंदला तो ॥ ११६६ ॥

पावो आपणपयां वोळघे ? । केवीं वन्हि आपणपयां लागे ? ।

आपणपां पाणी रिघे । स्नाना कैसें ? ॥ ११६७ ॥

म्हणौनि सर्व मी जालेपणें । ठेलें तया येणें जाणें ।

तेंचि गा यात्रा करणें । अद्वया मज ॥ ११६८ ॥

पैं जळावरील तरंगु । जरी धाविन्नला सवेगु ।

तरी नाहीं भूमिभागु । क्रमिला तेणें ॥ ११६९ ॥

जें सांडावें कां मांडावें । जें चालणें जेणें चालावें ।

तें तोयचि एक आघवें । म्हणौनियां ॥ ११७० ॥

गेलियाही भलतेउता । उदकपणेंं पंडुसुता ।

तरंगाची एकात्मता । न मोडेचि जेवीं ॥ ११७१ ॥

तैसा मीपणें हा लोटला । तो आघवेंयाचि मजआंतु आला ।

या यात्रा होय भला । कापडी माझा ॥ ११७२ ॥

आणि शरीर स्वभाववशें । कांहीं येक करूं जरी बैसे ।

तरी मीचि तो तेणें मिषें । भेटे तया ॥ ११७३ ॥

तेथ कर्म आणि कर्ता । हें जाऊनि पंडुसुता ।

मियां आत्मेनि मज पाहतां । मीचि होय ॥ ११७४ ॥

पैं दर्पणातेंं दर्पणें । पाहिलिया होय न पाहणें ।

सोनें झांकिलिया सुवर्णें । ना झांकें जेवीं ॥ ११७५ ॥

दीपातें दीपें प्रकाशिजे । तें न प्रकाशणेंचि निपजे ।

तैसें कर्म मियां कीजे । तें करणें कैंचें ? ॥ ११७६ ॥

कर्मही करितचि आहे । जैं करावें हें भाष जाये ।

तैं न करणेंचि होये । तयाचें केलें ॥ ११७७ ॥

क्रियाजात मी जालेपणें । घडे कांहींचि न करणें ।

तयाचि नांव पूजणें । खुणेचें माझें ॥ ११७८ ॥

म्हणौनि करीतयाही वोजा । तें न करणें हेंचि कपिध्वजा ।

निफजे तिया महापूजा । पूजी तो मातें ॥ ११७९ ॥

एवं तो बोले तें स्तवन । तो देखे तें दर्शन ।

अद्वया मज गमन । तो चाले तेंचि ॥ ११८० ॥

तो करी तेतुली पूजा । तो कल्पी तो जपु माझा ।

तो असे तेचि कपिध्वजा । समाधी माझी ॥ ११८१ ॥

जैसें कनकेंसी कांकणें । असिजे अनन्यपणें ।

तो भक्तियोगें येणें । मजसीं तैसा ॥ ११८२ ॥

उदकीं कल्लोळु । कापुरीं परीमळु ।

रत्नीं उजाळु । अनन्यु जैसा ॥ ११८३ ॥

किंबहुना तंतूंसीं पटु । कां मृत्तिकेसीं घटु ।

तैसा तो एकवटु । मजसीं माझा ॥ ११८४ ॥

इया अनन्यसिद्धा भक्ती । या आघवाचि दृश्यजातीं ।

मज आपणपेंया सुमती । द्रष्टयातें जाण ॥ ११८५ ॥

तिन्ही अवस्थांचेनि द्वारें । उपाध्युपहिताकारें ।

भावाभावरूप स्फुरे । दृश्य जें हें ॥ ११८६ ॥

तें हें आघवेंचि मी द्रष्टा । ऐसिया बोधाचा माजिवटा ।

अनुभवाचा सुभटा । धेंडा तो नाचे ॥ ११८७ ॥

रज्जु जालिया गोचरु । आभासतां तो व्याळाकारु ।

रज्जुचि ऐसा निर्धारु । होय जेवीं ॥ ११८८ ॥

भांगारापरतें कांहीं । लेणें गुंजहीभरी नाहीं ।

हें आटुनियां ठायीं । कीजे जैसे ॥ ११८९ ॥

उदका येकापरतें । तरंग नाहींचि हें निरुतें ।

जाणोनि तया आकारातें । न घेपे जेवीं ॥ ११९० ॥

नातरी स्वप्नविकारां समस्तां । चेऊनियां उमाणें घेतां ।

तो आपणयापरौता । न दिसे जैसा ॥ ११९१ ॥

तैसें जें कांहीं आथी नाथी । येणें होय ज्ञेयस्फुर्ती ।

तें ज्ञाताचि मी हें प्रतीती । होऊनि भोगी ॥ ११९२ ॥

जाणे अजु मी अजरु । अक्षयो मी अक्षरु ।

अपूर्वु मी अपारु । आनंदु मी ॥ ११९३ ॥

अचळु मी अच्युतु । अनंतु मी अद्वैतु ।

आद्यु मी अव्यक्तु । व्यक्तुही मी ॥ ११९४ ॥

ईश्य मी ईश्वरु । अनादि मी अमरु ।

अभय मी आधारु । आधेय मी ॥ ११९५ ॥

स्वामी मी सदोदितु । सहजु मी सततु ।

सर्व मी सर्वगतु । सर्वातीतु मी ॥ ११९६ ॥

नवा मी पुराणु । शून्यु मी संपूर्णु ।

स्थुलु मी अणु । जें कांहीं तें मी ॥ ११९७ ॥

अक्रियु मी येकु । असंगु मी अशोकु ।

व्यापु मी व्यापकु । पुरुषोत्तमु मी ॥ ११९८ ॥

अशब्दु मी अश्रोत्रु । अरूपु मी अगोत्रु ।

समु मी स्वतंत्रु । ब्रह्म मी परु ॥ ११९९ ॥

ऐसें आत्मत्वें मज एकातें । इया अद्वयभक्ती जाणोनि निरुतें ।

आणि याही बोधा जाणतें । तेंही मीचि जाणें ॥ १२०० ॥

पैं चेइलेयानंतरें । आपुलें एकपण उरे ।

तेंही तोंवरी स्फुरे । तयाशींचि जैसें ॥ १२०१ ॥

कां प्रकाशतां अर्कु । तोचि होय प्रकाशकु ।

तयाही अभेदा द्योतकु । तोचि जैसा ॥ १२०२ ॥

तैसा वेद्यांच्या विलयीं । केवळ वीदकु उरे पाहीं ।

तेणें जाणवें तया तेंही । हेंही जो जाणे ॥ १२०३ ॥

तया अद्वयपणा आपुलिया । जाणती ज्ञप्ती जे धनंजया ।

ते ईश्वरचि मी हे तया । बोधासि ये ॥ १२०४ ॥

मग द्वैताद्वैतातीत । मीचि आत्मा एकु निभ्रांत ।

हें जाणोनि जाणणें जेथ । अनुभवीं रिघे ॥ १२०५ ॥

तेथ चेइलियां येकपण । दिसे जे आपुलया आपण ।

तेंही जातां नेणों कोण । होईजे जेवीं ॥ १२०६ ॥

कां डोळां देखतिये क्षणीं । सुवर्णपण सुवर्णीं ।

नाटितां होय आटणी । अळंकाराचीही ॥ १२०७ ॥

नाना लवण तोय होये । मग क्षारता तोयत्वें राहे ।

तेही जिरतां जेवीं जाये । जालेपण तें ॥ १२०८ ॥

तैसा मी तो हें जें असे । तें स्वानंदानुभवसमरसें ।

कालवूनिया प्रवेशे । मजचिमाजीं ॥ १२०९ ॥

आणि तो हे भाष जेथ जाये । तेथे मी हें कोण्हासी आहे ।

ऐसा मी ना तो तिये सामाये । माझ्याचि रूपीं ॥ १२१० ॥

जेव्हां कापुर जळों सरे । तयाचि नाम अग्नि पुरी ।

मग उभयतातीत उरे । आकाश जेवीं ॥ १२११ ॥

का धाडलिया एका एकु । वाढे तो शून्य विशेखु ।

तैसा आहे नाहींचा शेखु । मीचि मग आथी ॥ १२१२ ॥

तेथ ब्रह्मा आत्मा ईशु । यया बोला मोडे सौरसु ।

न बोलणें याही पैसु । नाहीं तेथ ॥ १२१३ ॥

न बोलणेंही न बोलोनी । तें बोलिजे तोंड भरुनी ।

जाणिव नेणिव नेणोनी । जाणिजे तें ॥ १२१४ ॥

तेथ बुझिजे बोधु बोधें । आनंंदु घेपे आनंदें ।

सुखावरी नुसधें । सुखचि भोगिजे ॥ १२१५ ॥

तेथ लाभु जोडला लाभा । प्रभा आलिंगिली प्रभा ।

विस्मयो बुडाला उभा । विस्मयामाजीं ॥ १२१६ ॥

शमु तेथ सामावला । विश्रामु विश्रांति आला ।

अनुभवु वेडावला । अनुभूतिपणें ॥ १२१७ ॥

किंबहुना ऐसें निखळ । मीपण जोडे तया फळ ।

सेवूनि वेली वेल्हाळ । क्रमयोगाची ते ॥ १२१८ ॥

पैं क्रमयोगिया किरीटी । चक्रवर्तीच्या मुकुटीं ।

मी चिद्रत्न तें साटोवाटीं । होय तो माझा ॥ १२१९ ॥

कीं क्रमयोगप्रासादाचा । कळसु जो हा मोक्षाचा ।

तयावरील अवकाशाचा । उवावो जाला तो ॥ १२२० ॥

नाना संसार आडवीं । क्रमयोग वाट बरवी ।

जोडिली ते मदैक्यगांवीं । पैठी जालीसे ॥ १२२१ ॥

हें असो क्रमयोगबोधें । तेणें भक्तिचिद्गांगें ।

मी स्वानंदोदधी वेगें । ठाकिला कीं गा ॥ १२२२ ॥

हा ठायवरी सुवर्मा । क्रमयोगीं आहे महिमा ।

म्हणौनि वेळोवेळां तुम्हां । सांगतों आम्ही ॥ १२२३ ॥

पैं देशें काळें पदार्थें । साधूनि घेइजे मातें ।

तैसा नव्हे मी आयतें । सर्वांचें सर्वही ॥ १२२४ ॥

म्हणौनि माझ्या ठायीं । जाचावें न लगे कांहीं ।

मी लाभें इयें उपायीं । साचचि गा ॥ १२२५ ॥

एक शिष्य एक गुरु । हा रूढला साच व्यवहारु ।

तो मत्प्राप्तिप्रकारु । जाणावया ॥ १२२६ ॥

अगा वसुधेच्या पोटीं । निधान सिद्ध किरीटी ।

वन्हि सिद्ध काष्ठीं । वोहां दूध ॥ १२२७ ॥

परी लाभे तें असतें । तया कीजे उपायातें ।

येर सिद्धचि तैसा तेथें । उपायीं मी ॥ १२२८ ॥

हा फळहीवरी उपावो । कां पां प्रस्तावीतसे देवो ।

हे पुसतां परी अभिप्रावो । येथिंचा ऐसा ॥ १२२९ ॥

जे गीतार्थाचें चांगावें । मोक्षोपायपर आघवें ।

आन शास्त्रोपाय कीं नव्हे । प्रमाणसिद्ध ॥ १२३० ॥

वारा आभाळचि फेडी । वांचूनि सूर्यातें न घडी ।

कां हातु बाबुळी धाडी । तोय न करी ॥ १२३१ ॥

तैसा आत्मदर्शनीं आडळु । असे अविद्येचा जो मळु ।

तो शास्त्र नाशी येरु निर्मळु । मी प्रकाशें स्वयें ॥ १२३२ ॥

म्हणौनि आघवींचि शास्त्रें । अविद्याविनाशाचीं पात्रें ।

वांचोनि न होतीं स्वतंत्रें । आत्मबोधीं ॥ १२३३ ॥

तया अध्यात्मशास्त्रांसीं । जैं साचपणाची ये पुसी ।

तैं येइजे जया ठायासी । ते हे गीता ॥ १२३४ ॥

भानुभूषिता प्राचिया । सतेजा दिशा आघविया ।

तैसी शास्त्रेश्वरा गीता या । सनाथें शास्त्रें ॥ १२३५ ॥

हें असो येणें शास्त्रेश्वरें । मागां उपाय बहुवे विस्तारें ।

सांगितला जैसा करें । घेवों ये आत्मा ॥ १२३६ ॥

परी प्रथमश्रवणासवें । अर्जुना विपायें हें फावे ।

हा भावो सकणवे । धरूनि श्रीहरी ॥ १२३७ ॥

तेंचि प्रमेय एक वेळ । शिष्यीं होआवया अढळ ।

सांगतसे मुकुल । मुद्रा आतां ॥ १२३८ ॥

आणि प्रसंगें गीता । ठावोही हा संपता ।

म्हणौनि दावी आद्यंता । एकार्थत्व ॥ १२३९ ॥

जे ग्रंथाच्या मध्यभागीं । नाना अधिकारप्रसंगीं ।

निरूपण अनेगीं । सिद्धांतीं केलें ॥ १२४० ॥

तरी तेतुलेही सिद्धांत । इयें शास्त्रीं प्रस्तुत ।

हे पूर्वापर नेणत । कोण्ही जैं मानी ॥ १२४१ ॥

तैं महासिद्धांताचा आवांका । सिद्धांतकक्षा अनेका ।

भिडऊनि आरंभु देखा । संपवीतु असे ॥ १२४२ ॥

एथ अविद्यानाशु हें स्थळ । तेणें मोक्षोपादान फळ ।

या दोहीं केवळ । साधन ज्ञान ॥ १२४३ ॥

हें इतुलेंचि नानापरी । निरूपिलें ग्रंथविस्तारीं ।

तें आतां दोहीं अक्षरीं । अनुवादावें ॥ १२४४ ॥

म्हणौनि उपेयही हातीं । जालया उपायस्थिती ।

देव प्रवर्तले तें पुढती । येणेंचि भावें ॥ १२४५ ॥

सर्वकर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रयः ।

मत्प्रसादादवाप्नोति शाश्वतं पदमव्ययम् ॥ ५६॥

मग म्हणे गा सुभटा । तो क्रमयोगिया निष्ठा ।

मी हौनी होय पैठा । माझ्या रूपीं ॥ १२४६ ॥

स्वकर्माच्या चोखौळीं । मज पूजा करूनि भलीं ।

तेणें प्रसादें आकळी । ज्ञाननिष्ठेतें ॥ १२४७ ॥

ते ज्ञाननिष्ठा जेथ हातवसे । तेथ भक्ति माझी उल्लासे ।

तिया भजन समरसें । सुखिया होय ॥ १२४८ ॥

आणि विश्वप्रकाशितया । आत्मया मज आपुलिया ।

अनुसरे जो करूनियां । सर्वत्रता हे ॥ १२४९ ॥

सांडूनि आपुला आडळ । लवण आश्रयी जळ ।

कां हिंडोनि राहे निश्चळ । वायु व्योमीं ॥ १२५० ॥

तैसा बुद्धी वाचा कायें । जो मातें आश्रऊनि ठाये ।

तो निषिद्धेंही विपायें । कर्में करूं ॥ १२५१ ॥

परी गंगेच्या संबंधीं । बिदी आणि महानदी ।

येक तेवीं माझ्या बोधीं । शुभाशुभांसी ॥ १२५२ ॥

कां बावनें आणि धुरें । हा निवाडु तंवचि सरे ।

जंव न घेपती वैश्वानरें । कवळूनि दोन्ही ॥ १२५३ ॥

ना पांचिकें आणि सोळें । हें सोनया तंवचि आलें ।

जंव परिसु आंगमेळें । एकवटीना ॥ १२५४ ॥

तैसें शुभाशुभ ऐसें । हें तंवचिवरी आभासे ।

जंव येकु न प्रकाशे । सर्वत्र मी ॥ १२५५ ॥

अगा रात्री आणि दिवो । हा तंवचि द्वैतभावो ।

जंव न रिगिजे गांवो । गभस्तीचा ॥ १२५६ ॥

म्हणौनि माझिया भेटी । तयाचीं सर्व कर्में किरीटी ।

जाऊनि बैसे तो पाटीं । सायुज्याच्या ॥ १२५७ ॥

देशें काळें स्वभावें । वेंचु जया न संभवे ।

तें पद माझें पावे । अविनाश तो ॥ १२५८ ॥

किंबहुना पंडुसुता । मज आत्मयाची प्रसन्नता ।

लाहे तेणें न पविजतां । लाभु कवणु असे ॥ १२५९ ॥

चेतसा सर्वकर्माणि मयि संन्यस्य मत्परः ।

बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्तः सततं भव ॥ ५७॥

याकारणें गा तुवां इया । सर्व कर्मा आपुलिया ।

माझ्या स्वरूपीं धनंजया । संन्यासु कीजे ॥ १२६० ॥

परी तोचि संन्यासु वीरा । करणीयेचा झणें करा ।

आत्मविवेकीं धरा । चित्तवृत्ति हे ॥ १२६१ ॥

मग तेणें विवेकबळें । आपणपें कर्मावेगळें ।

माझ्या स्वरूपीं निर्मळें । देखिजेल ॥ १२६२ ॥

आणि कर्माचि जन्मभोये । प्रकृति जे का आहे ।

ते आपणयाहूनि बहुवे । देखसी दूरी ॥ १२६३ ॥

तेथ प्रकृति आपणयां । वेगळी नुरे धनंजया ।

रूपेंवीण का छाया । जियापरी ॥ १२६४ ॥

ऐसेनि प्रकृतिनाशु । जालया कर्मसंन्यासु ।

निफजेल अनायासु । सकारणु ॥ १२६५ ॥

मग कर्मजात गेलया । मी आत्मा उरें आपणपयां ।

तेथ बुद्धि घापे करूनियां । पतिव्रता ॥ १२६६ ॥

बुद्धि अनन्य येणें योगें । मजमाजीं जैं रिगे ।

तैं चित्त चैत्यत्यागें । मातेंचि भजे ॥ १२६७ ॥

ऐसें चैत्यजातें सांडिलें । चित्त माझ्या ठायीं जडलें ।

ठाके तैसें वहिलें । सर्वदा करी ॥ १२६८ ॥

No comments:

Post a Comment