Tuesday, May 5, 2009

अध्याय सातवा । ।

। ज्ञनविज्ञानयोगः ।

श्रीभगवानुवाच ।

मय्यासक्तमनाः पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः ।

असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु ॥ १॥

ज्ञानं तेऽहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषतः ।

यज्ञात्वा नेह भूयोऽन्यज्ञातव्यमवशिष्यते ॥ २॥

आइका मग तो श्रीअनंतु । पार्थातें असे म्हणतु ।

पैं गा तूं योगयुक्तु । जालासि आतां ॥१ ॥

मज समग्रातें जाणसी ऐसें । आपुलिया तळहातींचें रत्‍न जैसें ।

तुज ज्ञान सांगेन तैसें । विज्ञानेंसीं ॥ २ ॥

एथ विज्ञानें काय करावें । ऐसें घेसी जरी मनोभावें ।

तरी पैं आधीं जाणावें । तेंचि लागे ॥ ३ ॥

मग ज्ञानाचिये वेळे । झांकती जाणिवेचे डोळे ।

जैसी तीरीं नाव न ढळे । टेकलीसांती ॥ ४ ॥

तैसी जाणीव जेथ न रिघे । विचार मागुता पाउलीं निघे ।

तर्कु आयणी नेघे । आंगीं जयांच्या ॥ ५ ॥

अर्जुना तया नांव ज्ञान । येर प्रपंचु हें विज्ञान ।

तेथ सत्यबुद्धि तें अज्ञान । हेंही जाण ॥ ६ ॥

आतां अज्ञान अवघें हरपे । विज्ञान निःशेष करपे ।

आणि ज्ञान तें स्वरूपें । होऊनि जाइजे ॥ ७ ॥

जेणें सांगतयाचें बोलणें खुंटे । ऐकतयाचें व्यसन तुटे ।

हें जाणणें सानें मोठें । उरों नेदी ॥ ८ ॥

ऐसें वर्म जें गूढ । तें किजेल वाक्यारूढ ।

जेणें थोडेन पुरे कोड । बहुत मनींचें ॥ ९ ॥

मनुष्याणां सहस्त्रेषु कश्चिद्यतति सिद्धये ।

यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः ॥ ३॥

पैं गा मनुष्यांचिया सहस्रशां- । माजीं विपाइले याचि धिंवसा ।

तैसें या धिंवसेकरां बहुवसां । माजीं विरळा जाणे ॥ १० ॥

जैसा भरलेया त्रिभुवना- । आंतु एक‍एकु चांगु अर्जुना ।

निवडूनि कीजे सेना । लक्षवरी ॥ ११ ॥

कीं तयाही पाठीं । जे वेळीं लोह मांसातें घांटी ।

ते वेळीं विजयश्रियेच्या पाटीं । एकुची बैसे ॥ १२ ॥

तैसें आस्थेच्या महापुरीं । रिघताती कोटिवरी ।

परी प्राप्तीच्या पैलतीरीं । विपाइला निगे ॥ १३ ॥

म्हणौनि सामान्य गा नोहे । हें सांगतां वडिल गोठी आहे ।

परी तें बोलों येईल पाहें । आता प्रस्तुत ऐकें ॥ १४ ॥

भूमिरापोऽनलो वायुः खं मनो बुद्धिरेव च ।

अहंकार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा ॥ ४॥

तरी अवधारीं गा धनंजया । हे महदादिक माझी माया ।

जैसी प्रतिबिंबे छाया । निजांगाची ॥ १५ ॥

आणि इयेतें प्रकृति म्हणिजे । जे अष्टधा भिन्न जाणिजे ।

लोकत्रय निपजे । इयेस्तव ॥ १६ ॥

हे अष्टधा भिन्न कैसी । ऐसा ध्वनि धरिसी जरी मानसीं ।

तरी तेचि गा आतां परियेसीं । विवंचना ॥ १७ ॥

आप तेज गगन । मही मारुत मन ।

बुद्धि अहंकारु हे भिन्न । आठै भाग ॥ १८ ॥

अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे पराम् ।

जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत् ॥ ५॥

या आठांची जे साम्यावस्था । ते माझी परम प्रकृति पार्था ।

तिये नाम व्यवस्था । जीवु ऐसी ॥ १९ ॥

जे जडातें जीववी । चेतनेतें चेतवी ।

मना करवीं मानवी । शोक मोहो ॥ २० ॥

पैं बुद्धीच्या अंगीं जाणणें । तें जिये जवळिकेचें करणें ।

जिया अहंकाराचेनि विंदाणें । जगचि धरिजे ॥ २१ ॥

एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय ।

अहं कृत्स्‍नस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा ॥ ६॥

ते सूक्ष्म प्रकृति कोडें । जैं स्थूळाचिया आंगा घडे ।

तैं भूतसृष्टीची पडे । टांकसाळ ॥ २२ ॥

चतुर्विध ठसा । उमटों लागे आपैसा ।

मोला तरी सरसा । परी थरचि आनान ॥ २३ ॥

होती चौयांशीं लक्ष थरा । येरा मिती नेणिजे भांडारा ।

भरे आदिशून्याचा गाभारा । नाणेयांसी ॥ २४ ॥

ऐसें एकतुके पांचभौतिक । पडती बहुवस टांक ।

मग तिये समृद्धीचे लेख । प्रकृतीचि धरी ॥ २५ ॥

जे आखूनि नाणें विस्तारी । पाठी तयाची आटणी करी ।

माजीं कर्माकर्माचिया व्यवहारीं । प्रवर्तु दावी ॥ २६ ॥

हें रूपक परी असो । सांगों उघड जैसें परियेसों ।

तरी नामरूपाचा अतिसो । प्रकृतीच कीजे ॥ २७ ॥

आणि प्रकृति तंव माझ्या ठायीं । बिंबे येथें आन नाहीं ।

म्हणौनि आदि मध्य अवसान पाहीं । जगासि मी ॥ २८ ॥

मत्तः परतरं नान्यत्किंचिदस्ति धनंजय ।

मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव ॥ ७॥

हें रोहिणीचें जळ । तयाचें पाहतां येइजे मूळ ।

तैं रश्मि नव्हती केवळ । होय तें भानु ॥ २९ ॥

तयाचिपरी किरीटी । इया प्रकृती जालिये सृष्टी ।

जैं उपसंहरूनि कीजेल ठी । तैं मीचि आहें ॥ ३० ॥

ऐसें होय दिसे न दिसे । हें मजचि माजीं असे ।

मियां विश्व धरिजे जैसें । सूत्रें मणि ॥ ३१ ॥

सुवर्णाचे मणी केले । ते सोनियाचे सुतीं वोविले ।

तैसें म्यां जग धरिलें । सबाह्याभ्यंतरीं ॥ ३२ ॥

रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः ।

प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषं नृषु ॥ ८॥

पुण्यो गन्धः पृथिव्यां च तेजश्चास्मि विभावसौ ।

जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु ॥ ९॥

म्हणौनि उदकीं रसु । कां पवनीं जो स्पर्शु ।

शशिसूर्यीं जो प्रकाशु । तो मीचि जाण ॥ ३३ ॥

तैसाचि नैसर्गिकु शुद्धु । मी पृथ्वीच्या ठायीं गंधु ।

गगनीं मी शब्दु । वेदीं प्रणवु ॥ ३४ ॥

नराच्या ठायीं नरत्व । जें अहंभाविये सत्त्व ।

तें पौरुष मी हें तत्त्व । बोलिजत असे ॥ ३५ ॥

अग्नि ऐसें आहाच । तेज नामाचें आहे कवच ।

तें परतें केलिया साच । निजतेज तें मी ॥ ३६ ॥

आणि नानाविध योनी । जन्मोनि भूतें त्रिभुवनीं ।

वर्तत आहाति जीवनीं । आपुलाल्या ॥ ३७ ॥

एकें पवनेंचि पिती । एकें तृणास्तव जिती ।

एकें अन्नाधारें राहती । जळें एकें ॥ ३८ ॥

ऐसें भूतांप्रति आनान । जें प्रकृतिवशें दिसे जीवन ।

तें आघवाठायीं अभिन्न । मीचि एक ॥ ३९ ॥

बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम् ।

बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम् ॥ १०॥

बलं बलवतां चाहं कामरागविवर्जितम् ।

धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ ॥ ११॥

पैं आदिचेनि अवसरें । विरूढे गगनाचेनि अंकुरें ।

जे अंतीं गिळी अक्षरें । प्रणवपीठींचीं ॥ ४० ॥

जंव हा विश्वाकारु असे । तंव जें विश्वाचिसारिखें दिसे ।

मग महाप्रळयदशे । कैसेंही नव्हे ॥ ४१ ॥

ऐसें अनादि जें सहज । तें मी गा विश्वबीज ।

हें हातातळीं तुज । देइजत असे ॥ ४२ ॥

मग उघड करूनि पांडवा । जैं हे आणिसील सांख्याचिया गांवा ।

तैं ययाचा उपेगु बरवा । देखशील ॥ ४३ ॥

परी हे अप्रासंगिक आलाप । आतां असतु न बोलों संक्षेप ।

जाण तपियांच्या ठायीं तप । तें रूप माझें ॥ ४४ ॥

बळियांमाजीं बळ । तें मी जाणें अढळ ।

बुद्धिमंतीं केवळ । बुद्धि तें मी ॥ ४५ ॥

भूतांच्या ठायीं कामु । तो मी म्हणे आत्मारामु ।

जेणें अर्थास्तव धर्मु । थोरु होय ॥ ४६ ॥

एर्‍हवीं विकाराचेनि पैसे । करी कीर इंद्रियांचि ऐसें ।

परी धर्मासि वेखासें । जावों नेदी ॥ ४७ ॥

जो अप्रवृत्तीचा अव्हांटा । सांडूनि विधीचिया निघे वाटा ।

तेवींचि नियमाचा दिवटा । सवें चाले ॥ ४८ ॥

कामु ऐसिया वोजा प्रवर्ते । म्हणौनि धर्मासि होय पुरतें ।

मोक्षतीर्थींचे मुक्तें । संसार भोगी ॥ ४९ ॥

जो श्रुतिगौरवाच्या मांडवीं । काम सृष्टीचा वेलु वाढवी ।

जंव कर्मफळेंसि पालवी । अपवर्गीं टेंके ॥ ५० ॥

ऐसा नियुत कां कंदर्पु । जो भूतां या बीजरूपु ।

तो मी म्हणे बापु । योगियांचा ॥ ५१ ॥

हें एकेक किती सांगावें । आतां वस्तुजातचि आघवें ।

मजपासूनि जाणावें । विकारलें असे ॥ ५२ ॥

ये चैव सात्त्विका भावा राजसास्तामसाश्च ये ।

मत्त एवेति तान्विद्धि न त्वहं तेषु ते मयि ॥ १२॥

जे सात्त्विक हन भाव । कां रजतमादि सर्व ।

तें ममरूपसंभव । वोळखें तूं ॥ ५३ ॥

हे जाले तरी माझ्या ठायीं । परी तयामाजीं मी नाहीं ।

जैसी स्वप्नींच्या डोहीं । जागृति न बुडे ॥ ५४ ॥

जैसी रसाचीच सुघट । बीजकणिका घनवट ।

परी तियेस्तव होय काष्ठ । अंकुरद्वारें ॥ ५५ ॥

मग तया काष्ठाच्या ठायीं । सांग पां बीजपण असे काई ? ।

तैसा मी विकारीं नाहीं । जरी विकारला दिसे ॥ ५६ ॥

पैं गगनीं उपजे आभाळ । परी तेथ गगन नाहीं केवळ ।

अथवा आभाळीं होय सलिल । तेथ अभ्र नाहीं ॥ ५७ ॥

मग त्या उदकाचेनि आवेशें । प्रगटलें तेज जें लखलखीत दिसे ।

तिये विजूमाजीं असे । सलिल कायी ? ॥ ५८ ॥

सांगें अग्नीस्तव धूम होये । तिये धूमीं काय अग्नि आहे ? ।

तैसा विकारु हा मी नोहें । जरी विकारला असे ॥ ५९ ॥

त्रिभिर्गुणमयैर्भावैरेभिः सर्वमिदं जगत् ।

मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम् ॥ १३॥

परी उदकीं जाली बाबुळी । ते उदकातें जैसी झांकोळी ।

कां वायांचि आभाळीं । आकाश लोपे ॥ ६० ॥

हां गा स्वप्न लटिकें म्हणों ये । परि निद्रावशें बाणलें होये ।

तंव आठवु काय देत आहे । आपणपेयां ? ॥ ६१ ॥

हें असो डोळ्यांचें । डोळांचि पडळ रचे ।

तेणें देखणेंपण डोळ्यांचे । न गिळजे कायी ? ॥ ६२ ॥

तैसी हे माझीच बिंबली । त्रिगुणात्मक साउली ।

कीं मजचि आड वोडवली । जवनिका जैसी ॥ ६३ ॥

म्हणौनि भूतें मातें नेणती । माझींच परी मी नव्हती ।

जैसी जळींचि जळीं न विरती । मुक्ताफळें ॥ ६४ ॥

पैं पृथ्वीयेचा घटु कीजे । सवेंचि पृथ्वीसि मिळे तरी मेळविजे ।

एर्‍हवीं तोचि अग्निसंगें सिजे । तरी वेगळा होय ॥ ६५ ॥

तैसें भूतजात सर्व । हे माझेचि कीर अवयव ।

परि मायायोगें जीव- । दशे आले ॥ ६६ ॥

म्हणौनि माझेचि मी नव्हती । माझेचि मज नोळखती ।

अहंममताभ्रांती । विषयांध जाले ॥ ६७ ॥

दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया ।

मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते ॥ १४॥

आतां महदादि हे माझी माया । उतरोनियां धनंजया ।

मी होईजे हें आया । कैसेनि ये ? ॥ ६८ ॥

जिये ब्रह्माचळाचा आधाडा । पहिलिया संकल्पजळाचा उभडा ।

सवेंचि महाभूतांचा बुडबुडा । साना आला ॥ ६९ ॥

जे सृष्टिविस्ताराचेनि वोघें । चढत काळकळनेचेनि वेगें ।

प्रवृत्तिनिवृत्तीचीं तुंगें । तटें सांडी ॥ ७० ॥

जे गुणघनाचेनि वृष्टिभरें । भरली मोहाचेनि महापूरें ।

घेऊनि जात नगरें । यमनियमांचीं ॥ ७१ ॥

जे द्वेषाच्या आवर्तीं दाटत । मत्सराचे वळसे पडत ।

माजीं प्रमादादि तळपत । महामीन ॥ ७२ ॥

जेथ प्रपंचाचीं वळणें । कर्माकर्मांचीं वोभाणें ।

वरी तरताती वोसाणें । सुखदुःखांचीं ॥ ७३ ॥

रतीचिया बेटा । आदळती कामाचिया लाटा ।

जेथ जीवफेन संघटा । सैंघ दिसे ॥ ७४ ॥

अहंकाराचिया चळिया । वरि मदत्रयाचिया उकळिया ।

जेथ विषयोर्मीच्या आकळिया । उल्लाळ घेती ॥ ७५ ॥

उदयास्ताचे लोंढे । पाडीत जन्ममरणाचे चोंढे ।

जेथ पांचभौतिक बुडबुडे । होती जाती ॥ ७६ ॥

सम्मोह विभ्रम मासे । गिळिताती धैर्याचीं आविसें ।

तेथ देव्हडे भोंवत वळसे । अज्ञानाचे ॥ ७७ ॥

भ्रांतीचेनि खडुळें । रेवले आस्थेचे अवगाळें ।

रजोगुणाचेनि खळाळें । स्वर्गु गाजे ॥ ७८ ॥

तमाचे धारसे वाड । सत्त्वाचें स्थिरपण जाड ।

किंबहुना हे दुवाड । मायानदी ॥ ७९ ॥

पैं पुनरावृत्तीचेनि उभडें । झळंबती सत्यलोकींचे हुडे ।

घायें गडबडती धोंडे । ब्रह्मगोळकाचे ॥ ८० ॥

तया पाणियाचेनि वहिलेपणें । अझुनी न धरिती वोभाणें ।

ऐसा मायापूर हा कवणें । तरिजेल गा ? ॥ ८१ ॥

येथ एक नवलावो । जो जो कीजे तरणोपावो ।

तो तो अपावो । होय तें एक ॥ ८२ ॥

एक स्वयंबुद्धीच्या बाहीं । रिगाले तयांची शुद्धीचि नाहीं ।

एक जाणिवेचे डोहीं । गर्वेंचि गिळिले ॥ ८३ ॥

एकीं वेदत्रयाचिया सांगडी । घेतल्या अहंभावाचिया धोंडी ।

ते मदमीनाच्या तोंडीं । सगळेचि गेले ॥ ८४ ॥

एकीं वयसेचें जाड बांधले । मग मन्मथाचिये कांसे लागले ।

ते विषयमगरीं सांडिले । चघळूनियां ॥ ८५ ॥

आतां वार्धक्याच्या तरंगा- । माजीं मतिभ्रंशाचा जरंगा ।

तेणें कवळिजताती पैं गा । चहूंकडे ॥ ८६ ॥

आणि शोकाचा कडा उपडत । क्रोधाच्या आवर्तीं दाटत ।

आपदागिधीं चुंबिजत । उधवला ठायीं ॥ ८७ ॥

मग दुःखाचेनि बरबटें बोंबले । पाठीं मरणाचिये रेवे रेवले ।

ऐसे कामाचे कांसे लागले । ते गेले वायां ॥ ८८ ॥

एकीं यजनक्रियेची पेटी । बांधोनि घातली पोटीं ।

ते स्वर्गसुखाच्या कपाटीं । शिरकोनि ठेले ॥ ८९ ॥

एकीं मोक्षीं लागावयाचिया आशा । केला कर्मबाह्यांचा भरंवसा ।

परी ते पडिले वळसां । विधिनिषेधांच्या ॥ ९० ॥

जेथ वैराग्याची नाव न रिगे । विवेकाचा तागा न लगे ।

वरि कांहीं तरों ये योगें । तरी विपाय तो ॥ ९१ ॥

ऐसें तरी जीवाचिये आंगवणें । इये मायानदीचें तरणें ।

हें कासयासारिखें बोलणें । म्हणावें पां ॥ ९२ ॥

जरी अपथ्यशीळा व्याधी । कळे साधूसी दुर्जनाची बुद्धी ।

कीं रागी सांडी रिद्धी । आली सांती ॥ ९३ ॥

जरी चोरां सभा दाटे । अथवा मीनां गळु घोटे ।

ना तरी भेडा उलटे । विवसी जरी ॥ ९४ ॥

पाडस वागुर करांडी । कां मुंगी मेरु वोलांडी ।

तरी मायेची पैलथडी । देखती जीव ॥ ९५ ॥

म्हणौनि गा पंडुसुता । जैसी सकामा न जिणवेचि वनिता ।

तेवीं मायामय हे सरिता । न तरवें जीवां ॥ ९६ ॥

येथ एकचि लीला तरले । जे सर्वभावें मज भजले ।

तयां ऐलीच थडी सरलें । मायाजळ ॥ ९७ ॥

जयां सद्‍गुरुतारूं फुडें । जे अनुभवाचे कांसे गाढे ।

जयां आत्मनिवेदन तरांडे । आकळलें ॥ ९८ ॥

जे अहंभावाचें वोझें सांडुनी । विकल्पाचिया झुळका चुकाउनी ।

अनुरागाचा निरुता हौनि । पाणिढाळु ॥ ९९ ॥

जया ऐक्याचिया उतारा । बोधाचा जोडला तारा ।

मग निवृत्तीचिया पैल तीरा । झेंपावले जे ॥ १०० ॥

ते उपरतीच्या वांवीं सेलत । सोऽहंभावाचेनि थावें पेलत ।

मग निघाले अनकळित । निवृत्तितटीं ॥ १०१ ॥

येणें उपायें मज भजले । ते हे माझी माया तरले ।

परि ऐसे भक्त विपाइले । बहुवस नाहीं ॥ १०२ ॥

न मां दुष्कृतिनो मूढाः प्रपद्यन्ते नराधमाः ।

माययापहृतज्ञाना आसुरं भावमाश्रिताः ॥ १५॥

चतुर्विधा भजन्ते मां जनाः सुकृतिनोऽर्जुन ।

आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ ॥ १६॥

जे बहुतां एकां अव्हांतरु । अहंकाराचा भूतसंचारु ।

जाहला म्हणौनि विसरु । आत्मबोधाचा ॥ १०३ ॥

ते वेळीं नियमाचें वस्त्र नाठवे । पुढील अधोगतीची लाज नेणवे ।

आणि करिताति जें न करावें । वेदु म्हणे ॥ १०४ ॥

पाहें पां शरीराचिया गांवा । जयालागीं आले पांडवा ।

तो कार्यार्थु आघवा । सांडूनियां ॥ १०५ ॥

इंद्रियग्रामींचे राजबिदीं । अहंममतेचिया जल्पवादीं ।

विकारांतरांचि मांदीं । मेळवूनियां ॥ १०६ ॥

दुःखशोकांच्या घाईं । मारिलियाची सेचि नाहीं ।

हे सांगावया कारण काई । जे ग्रासिले माया ॥ १०७ ॥

म्हणौनि ते मातें चुकले । ऐका चतुर्विध मज भजले ।

जिहीं आत्महित केलें । वाढतें गा ॥ १०८ ॥

तो पहिला आर्तु म्हणिजे । दुसरा जिज्ञासु बोलिजे ।

तिजा अर्थार्थी जाणिजे । ज्ञानिया चौथा ॥ १०९ ॥

तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते ।

प्रियो हि ज्ञानिनोऽत्यर्थमहं स च मम प्रियः ॥ १७॥

तेथ आर्तु तो आर्तीचेनि व्याजें । जिज्ञासु तो जाणावयालागीं भजे ।

तिजेनि तेणें इच्छिजे । अर्थसिद्धि ॥ ११० ॥

मग चौथियाच्या ठायीं । कांहींचि करणें नाहीं ।

म्हणौनि भक्तु एकु पाहीं । ज्ञानिया जो ॥ १११ ॥

जे तया ज्ञानाचेनि प्रकाशें । फिटलें भेदाभेदांचें कडवसें ।

मग मीचि जाहला समरसें । आणि भक्तुही तेवींचि ॥ ११२ ॥

परि आणिकांचिये दिठी नावेक । जैसा स्फटिकुचि आभासे उदक ।

तैसा ज्ञानी नव्हे कौतुक । सांगतां तो ॥ ११३ ॥

जैसा वारा कां गगनीं विरे । मग वारेपण वेगळें नुरे ।

तेवीं भक्त हे पैज न सरे । जरी ऐक्या आला ॥ ११४ ॥

जरी पवनु हालवूनि पाहिजे । तरी गगनावेगळा देखिजे ।

एर्‍हवीं गगन तो सहजें । असे जैसें ॥ ११५ ॥

तैसें शरीरीं हन कर्में । तो भक्तु ऐसा गमे ।

परी अंतरप्रतीतिधर्मे । मीचि जाहला ॥ ११६ ॥

आणि ज्ञानाचेनि उजिडलेपणें । मी आत्मा ऐसें तो जाणें ।

म्हणौनि मीही तैसेंचि म्हणें । उचंबळला सांता ॥ ११७ ॥

हां गा जीवापैलीकडिलीये खुणे । जो पावोनि वावरों जाणें ।

तो देहाचेनि वेगळेपणें । काय वेगळा होय ? ॥ ११८ ॥

उदाराः सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम् ।

आस्थितः स हि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम् ॥ १८॥

म्हणौनि आपुलाल्या हिताचेनि लोभें । मज आवडे तोहि भक्त झोंबे ।

परी मीचि करी वालभें । ऐसा ज्ञानिया एकु ॥ ११९ ॥

पाहें पां दुभतयाचिया आशा । जगचि धेनूसि करीतसे फांसा ।

परि दोरेंवीण कैसा । वत्साचा बळी ॥ १२० ॥

कां जे तनुमनुप्राणें । तें आणिक कांहींचि नेणें ।

देखे तयातें म्हणे । हे माय माझी ॥ २१ ॥

तें येणें मानें अनन्यगती । म्हणौनि धेनुही तैसीचि प्रीति ।

यालागीं लक्ष्मीपती । बोलिले साचें ॥ १२२ ॥

हें असो मग म्हणितलें । जे कां तुज सांगितलें ।

तेही भक्त भले । पढियंते आम्हां ॥ १२३ ॥

परि जाणोनियां मातें । जे पाहों विसरले मागौतें ।

जैसें सागरा येऊनि सरितें । मुरडावें ठेलें ॥ १२४ ॥

तैसी अंतःकरणकुहरीं जन्मली । जयाची प्रतीतिगंगा मज मीनली ।

तो मी हे काय बोली । फार करूं ? ॥ १२५ ॥

एर्‍हवीं ज्ञानिया जो म्हणिजे । तो चैतन्यचि केवळ माझें ।

हें न म्हणावें परि काय कीजे । न बोलणें बोलों ॥ १२६ ॥

बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान्मां प्रपद्यते ।

वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः ॥ १९॥

जे तो विषयांची दाट झाडी- । माजीं कामक्रोधांचीं सांकडीं ।

चुकावूनि आला पाडीं । सद्वासनेचिया ॥ १२७ ॥

मग साधुसंगें सुभटा । उजू सत्कर्माचिया वाटा ।

अप्रवृत्तीचा अव्हांटा । डावलूनि ॥ १२८ ॥

आणि जन्मशतांचा वाहतवणा । तेविंची आशेचिया न लेचि वाहणा ।

तेथ फलहेतूचा उगाणा । कवणु चाळी ॥ १२९ ॥

ऐसा शरीरसंयोगाचिये राती- । माजीं धांवतां सडिया आयती ।

तंव कर्मक्षयाची पाहाती । पाहांट जाली ॥ १३० ॥

तैसीच गुरुकृपा उखा उजळली । ज्ञानाची वोतपली पडली ।

तेथ साम्याची ऋद्धि उघडली । तयाचिये दिठी ॥ १३१ ॥

ते वेळीं जयाकडे वास पाहे । तेउता मीचि तया एकु आहे ।

अथवा निवांत जरी राहे । तर्‍ही मीचि तया ॥ १३२ ॥

हें असो आणिक कांहीं । तया सर्वत्र मीवांचूनि नाहीं ।

जैसें सबाह्य जळ डोहीं । बुडालिया घटा ॥ १३३ ॥

तैसा तो मजभीतरीं । मी तया आंतुबाहेरी ।

हें सांगिजेल बोलवरी । तैसें नव्हे ॥ १३४ ॥

म्हणौनि असो हें इयापरी । तो देखे ज्ञानाची वाखारी ।

तेणें संसरलेनि करी । आपु विश्व ॥ १३५ ॥

हें समस्तही श्रीवासुदेवो । ऐसा प्रतीतिरसाचा वोतला भावो ।

म्हणौनि भक्तांमाजीं रावो । आणि ज्ञानिया तोचि ॥ १३६ ॥

जयाचिये प्रतीतीचा वाखारां । पवाडु होय चराचरा ।

तो महात्मा धनुर्धरा । दुर्लभु आथी ॥ १३७ ॥

येर बहुत जोडती किरीटी । जयांचीं भजनें भोगासाठीं ।

जे आशातिमिरें दृष्टी । विषयांध जाले ॥ १३८ ॥

कामैस्तैस्तैर्हृज्ञानाः प्रपद्यन्तेऽन्यदेवताः ।

तं तं नियममास्थाय प्रकृत्या नियताः स्वया ॥ २०॥

आणि फळाचिया हांवा । हृदयीं कामा जाला रिगावा ।

कीं तयाचिये घसणी दिवा । ज्ञानाचा गेला ॥ १३९ ॥

ऐसे उभयतां आंधारीं पडले । म्हणौनि पासींचि मातें चुकले ।

मग सर्वभावें अनुसरले । देवतांतरां ॥ १४० ॥

आधींच प्रकृतीचे पाइक । वरी भोगालागीं तंव रंक ।

मग तेणें लोलुपत्वें कौतुक । कैसेनि भजती ॥ १४१ ॥

कवणीं तिया नियमबुद्धि । कैसिया हन उपचारसमृद्धि ।

कां अर्पण यथाविधि । विहित करणें ॥ १४२ ॥

यो यो यां यां तनुं भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति ।

तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम् ॥ २१॥

पैं जो जिये देवतांतरीं । भजावयाची चाड करी ।

तयाची ते चाड पुरी । पुरविता मी ॥ १४३ ॥

देवोदेवीं मीचि पाहीं । हाही निश्चयो त्यासि नाहीं ।

भावो ते ते ठायीं । वेगळा धरिती ॥ १४४ ॥

स तया श्रद्धया युक्तस्तस्याराधनमीहते ।

लभते च ततः कामान्मयैव विहितान्हि तान् ॥ २२॥

मग तिया श्रद्धायुक्त । तेथिंचें आराधन जें उचित ।

तें सिद्धिवरी समस्त । वर्तो लागे ॥ १४५ ॥

ऐसें जेणें जें भाविजे । तें फळ तेणें पाविजे ।

परी तेंही सकळ निपजे । मजचिस्तव ॥ १४६ ॥

अन्तवत्तु फलं तेषां तद्‍भवत्यल्पमेधसाम् ।

देवान्देवयजो यान्ति मद्‍भक्ता यान्ति मामपि ॥ २३॥

परी ते भक्त मातें नेणती । जे कल्पनेबाहेरी न निघती ।

म्हणौनि कल्पित फळ पावती । अंतवंत ॥ १४७ ॥

किंबहुना ऐसें जें भजन । तें संसाराचेंचि साधन ।

येर फळभोग तो स्वप्न । नावभरी दिसे ॥ १४८ ॥

हें असो परौंते । मग हो कां आवडे तें ।

परी यजी जो देवतांतें । तो देवत्वासीचि ये ॥ १४९ ॥

येर तनुमनुप्राणी । जे अनुसरले माझेयाचि वाहणीं ।

ते देहाच्या निर्वाणीं । मीचि होती ॥ १५० ॥

अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते मामबुद्धयः ।

परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम् ॥ २४॥

परी तैसें न करिती प्राणिये । वायां आपुलिया हितीं वाणिये ।

जें पोहताती पाणियें । तळहातींचेनि ॥ १५१ ॥

नाना अमृताच्या सागरीं बुडिजे । मग तोंडा कां वज्रमिठी पाडिजे ? ।

आणि मनीं तरी आठविजे । थिल्लरोदकातें ? ॥ १५२ ॥

हें ऐसें कासया करावें । जे अमृतींही रिगोनि मरावें ।

तें सुखें अमृत होऊनि कां नसावें । अमृतामाजीं ? ॥ १५३ ॥

तैसा फळहेतूचा पांजरा । सांडूनियां धनुर्धरा ।

कां प्रतीतिपाखीं चिदंबरा । गोसाविया नोहावें ? ॥ १५४ ॥

जेथ उंचावलेनि पवाडें । सुखाचा पैसारु जोडे ।

आपुलेनि सुरवाडें । उडों ये ऐसा ॥ १५५ ॥

तया उमपा माप कां सुवावें । मज अव्यक्ता व्यक्त कां मानावें ।

सिद्ध असतां कां निमावें । साधनवरी ? ॥ १५६ ॥

परी हा बोल आघवा । जरी विचारीजतसे पांडवा ।

तरी विशेषें या जीवां । न चोजवे गा ॥ १५७ ॥

नाहं प्रकाशः सर्वस्य योगमायासमावृतः ।

मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम् ॥ २५॥

कां जे योगमायापडळें । हे जाले आहाति आंधळे ।

म्हणौनि प्रकाशाचेनि देहबळें । न देखती मातें ॥ १५८ ॥

एर्‍हवीं मी नसें ऐसें । काय वस्तुजात असे ? ।

पाहें पां कणव जळ रसें- । रहित आहे ? ॥ १५९ ॥

पवनु कवणातें न शिवेचि । आकाश कें न समायेचि ।

हें असो एकु मीचि । विश्वीं आहें ॥ १६० ॥

वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन ।

भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन ॥ २६॥

येथें भूतें जियें अतीतलीं । तियें मीचि होऊनि ठेलीं ।

आणि वर्तत आहाति जेतुलीं । तींही मीचि ॥ १६१ ॥

कां भविष्यमाणें जियें हीं । तींहीं मजवेगळीं नाहीं ।

हा बोलचि एर्‍हवीं कांहीं । होय ना जाय ॥ १६२ ॥

दोराचिया सापासी । डोंबा बडिया ना गव्हाळा ऐसी ।

संख्या न करवे कोण्हासी । तेवीं भूतांसि मिथ्यत्वें ॥ १६३ ॥

मी ऐसा पंडुसुता । अनुस्यूतु सदा असतां ।

या संसार जो भूतां । तो आनें बोलें ॥ १६४ ॥

तरी तेचि आतां थोडीसी । गोठी सांगिजेल परियेसीं ।

जै अहंकारा तनूंसीं । वालभ पडिलें ॥ १६५ ॥

इच्छाद्वेषसत्मुत्थेन द्वंद्वमोहेन भारत ।

सर्वभूतानि संमोहं सर्गे यान्ति परंतप ॥ २७॥

तेथ इच्छा हे कुमारी जाली । मग ते कामाचिया तारुण्या आली ।

तेथ द्वेषेंसीं मांडिली । वर्‍हाडिक ॥ १६६ ॥

तया दोघांस्तव जन्मला । ऐसा द्वंद्वमोहो जाला ।

मग तो आजेयानें वाढविला । अहंकारें ॥ १६७ ॥

जो धृतीसी सदां प्रतिकूळु । नियमाही नागवे सळु ।

आशारसें दोंदिलु । जाला सांता ॥ १६८ ॥

असंतुष्टीचिया मदिरा । मत्त होऊनि धनुर्धरा ।

विषयांचे वोवरां । विकृतीशीं ॥ १६९ ॥

तेणें भावशुद्धीचिये वाटे । विखुरले विकल्पाचे कांटे ।

मग चिरिलें आव्हांटे । अप्रवृत्तीचे ॥ १७० ॥

तेणें भूतें भांबावलीं । म्हणौनि संसाराचिया आडवामाजीं पडिलीं ।

मग महादुःखाच्या घेतलीं । दांडे वरी ॥ १७१ ॥

येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणाम् ।

ते द्वंद्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः ॥ २८ ॥

ऐसे विकल्पाचे वांयाणे । कांटे देखोनि सणाणे ।

जे मतिभ्रमाचे पासवणें । घेतीचिना ॥ १७२ ॥

उजू एकनिष्ठेच्या पाउलीं । रगडूनि विकल्पाचिया भालीं ।

महापातकाची सांडिली । अटवीं जिहीं ॥ १७३ ॥

मग पुण्याचे धांवा घेतले । आणि माझी जवळीक पातले ।

किंबहुना चुकले । वाटवधेयां ॥ १७४ ॥

जरामरणमोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये ।

ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्‍नमध्यात्मं कर्म चाखिलम् ॥ २९॥

एर्‍हवीं तरी पार्था । जन्ममरणाची निमे कथा ।

ऐसिया प्रयत्‍नातें आस्था । विये जयांची ॥ १७५ ॥

तयां तो प्रयत्‍नुचि एके वेळे । मग समग्र परब्रह्में फळे ।

जया पिकलेया रसु गळे । पूर्णतेचा ॥ १७६ ॥

ते वेळीं कृतकृत्यता जग भरे । तेथ अध्यात्माचें नवलपण पुरे ।

कर्माचें काम सरे । विरमे मन ॥ १७७ ॥

ऐसा अध्यात्मलाभु तया । होय गा धनंजया ।

भांडवल जया । उद्यमीं मी ॥ १७८ ॥

तयातें साम्याचिये वाढी । ऐक्याची सांदे कुळवाडी ।

तेथ भेदाचिया दुबळवाडी । नेणिजे तया ॥ १७९ ॥

साधिभूताधिदैवं मां साधियज्ञं च ये विदुः ।

प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतसः ॥ ३०॥

ॐ तत्सदिति श्रीमद्‍भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे

श्रीकृष्णार्जुनसंवादो ज्ञानविज्ञानयोगो नाम सप्तमोऽध्यायः ॥ ७ ॥

जिहीं साधिभूता मातें । प्रतीतीचेनि हातें ।

धरूनि अधिदैवातें । शिवतले गा ॥ १८० ॥

जया जाणिवेचेनि वेगें । मी अधियज्ञुही दृष्टी रिगें ।

ते तनूचेनि वियोगें । विर्‍हये नव्हती ॥ १८१ ॥

एर्‍हवीं आयुष्याचें सूत्र विघडतां । भूतांची उमटे खडाडता ।

काय न मरतयाचियाहि चित्ता । युगांतु नोहे ? ॥ १८२ ॥

परी नेणों कैसे पैं गा । जे जडोनि गेले माझिया आंगा ।

ते प्रयाणींचिया लगबगा । न सांडितीच मातें ॥ १८३ ॥

एर्‍हवी तरीं जाण । ऐसे जे निपुण ।

तेचि अंतःकरण- । युक्त योगी ॥ १८४ ॥

तंव इये शब्दकुपिकेतळीं । नोडवेचि अवधानाची अंजुळी ।

जे नावेक अर्जुन तये वेळीं । मागांचि होता ॥ १८५ ॥

जेथ तद्‍ब्रह्मवाक्यफळें । जिये नानार्थरसें रसाळें ।

बहकताती परिमळें । भावाचेनि ॥ १८६ ॥

सहज कृपामंदानिळें । कृष्णद्रुमाची वचनफळें ।

अर्जुन श्रवणाचिये खोळे । अवचित पडिलीं ॥ १८७ ॥

तियें प्रमेयाची हो कां वळलीं । कीं ब्रह्मरसाच्या सागरीं चुबुकळिलीं ।

मग तैसीचि कां घोळिलीं । परमानंदें ॥ १८८ ॥

तेणें बरवेपणें निर्मळें । अर्जुना उन्मेषाचे डोहळे ।

घेताति गळाळे । विस्मयामृताचे ॥ १८९ ॥

तिया सुखसंपत्ती जोडलिया । मग स्वर्गा वाती वांकुलिया ।

हृदयाच्या जीवीं गुतकुलिया । होत आहाती ॥ १९० ॥

ऐसें वरचिलीचि बरवा । सुख जावों लागलें फावा ।

तंव रसस्वादाचिया हांवा । लाहो केला ॥ १९१ ॥

झडकरी अनुमानाचेनि करतळें । घेऊनि तियें वाक्यफळें ।

प्रतीतिमुखीं एके वेळे । घालूं पाहे ॥ १९२ ॥

तंव विचाराचिया रसना न दाटती । परी हेतूच्या दशनीं न फुटती ।

ऐसें जाणौनि सुभद्रापती । चुंबिचिना ॥ १९३ ॥

मग चमत्कारला म्हणे । इयें जळींचीं मा तारांगणें ।

कैसा झकविलों असलगपणें । अक्षरांचेनि ॥ १९४ ॥

इयें पदें नव्हती फुडिया । गगनाचिया घडिया ।

येथ आमुची मति बुडालिया । थावो न निघे ॥ १९५ ॥

वांचूनि जाणावयाची कें गोठी । ऐसें जीवीं कल्पूनि किरीटी ।

तिया पुनरपि केली दृष्टी । यादवेंद्रा ॥ १९६ ॥

मग विनविलें सुभटें । हां हो जी ये एकवाटे ।

सातही पदें अनुच्छिष्टें । नवलें आहाती ॥ १९७ ॥

एर्‍हवीं अवधानाचेनि वहिलेपणें । नाना प्रमेयांचें उगाणें ।

काय श्रवणाचेनि आंगवणें । बोंलों लाहाती ? ॥ १९८ ॥

परी तैसें हें नोहेचि देवा । देखिला अक्षरांचा मेळावा ।

आणि विस्मयाचिया जीवा । विस्मयो जाला ॥ १९९ ॥

कानाचेनि गवाक्षद्वारें । बोलाचे रश्मी अभ्यंतरें ।

पाहेना तंव चमत्कारें । अवधान ठकलें ॥ २०० ॥

तेवींचि अर्थाची चाड मज आहे । तें सांगतांही वेळु न साहे ।

म्हणौनि निरूपण लवलाहें । कीजो देवा ॥ २०१ ॥

ऐसा मागील पडताळा घेउनी । पुढां अभिप्राय दृष्टी सूनी ।

तेवींचि माजीं शिरौनी । आर्ती आपुली ॥ २०२ ॥

कैसी पुसती पाहें पां जाणिव । भिडेचि तरी लंघों नेदीं शिंव ।

एर्‍हवीं श्रीकृष्ण हृदयासि खेंव । देवों सरला ॥ २०३ ॥

अहो श्रीगुरूतें जैं पुसावें । तैं येणें मानें सावध होआवें ।

हें एकचि जाणें आघवें । सव्यसाची ॥ २०४ ॥

आतां तयाचें तें प्रश्न करणें । वरी सर्वज्ञ श्रीहरीचें बोलणें ।

संजयो आवडलेपणें । सांगैल कैसें ॥ २०५ ॥

तिये अवधान द्यावें गोठी । बोलिजेल नीट मर्‍हाटी ।

जैसी कानाचे आधीं दिठी । उपेगा जाये ॥ २०६ ॥

बुद्धीचिया जिभा । बोलाचा न चाखतां गाभा ।

अक्षरांचिया भांबा । इंद्रियें जिती ॥ २०७ ॥

पहा पां मालतीचे कळे । घ्राणासि कीर वाटले परिमळें ।

परि वरचिला बरवा काइ डोळे । सुखिये नव्हती ? ॥ २०८ ॥

तैसें देशियेचिया हवावा । इंद्रियें करिती राणिवा ।

मग प्रमेयाचिया गांवा । लेसां जाइजे ॥ २०९ ॥

ऐसेनि नागरपणें । बोलु निमे तें बोलणें ।

ऐका ज्ञानदेवो म्हणे । निवृत्तीचा ॥ २१० ॥

इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां सप्तमोध्यायः ॥

No comments:

Post a Comment