Tuesday, May 5, 2009

अध्याय नववा । ।

। राजविद्याराजगुह्ययोगः ।

तरी अवधान एकलें दीजे । मग सर्वसुखासि पात्र होईजे ।

हें प्रतिज्ञोत्तर माझें । उघड ऐका ॥ १ ॥

परी प्रौढी न बोलों हो जी । तुम्हां सर्वज्ञांच्या समाजीं ।

देयावें अवधान हे माझी । विनवणी सलगीची ॥ २ ॥

कां जे लळेयांचे लळे सरती । मनोरथांचे मनोरथ पुरती ।

जरी माहेरें श्रीमंतें होती । तुम्हां ऐसीं ॥ ३ ॥

तुमचे या दिठिवेयाचिये वोलें । सासिन्नले प्रसन्नतेचे मळे ।

ते साउली देखोनि लोळें । श्रांतु जी मी ॥ ४ ॥

प्रभू तुम्ही सुखामृताचे डोहो । म्हणौनि आम्हीं आपुलिया स्वेच्छा वोलावो लाहों ।

येथही जरी सलगी करूं बिहों । तरी निवों कें पां ? ॥ ५ ॥

नातरी बालक बोबडां बोलीं । कां वांकुडा विचुका पाउलीं ।

ते चोज करूनि माउली । रिझे जेवीं ॥ ६ ॥

तेवीं तुम्हां संतांचा पढियावो । कैसेनि तरी आम्हांवरी हो ।

या बहुवा आळुकिया जी आहों । सलगी करीत ॥ ७ ॥

वांचूनि माझिये बोलतिये योग्यते । सर्वज्ञ भवादृश श्रोते ।

काय धड्यावरी सारस्वतें । पढों सिकिजे ॥ ८ ॥

अवधारा आवडे तेसणा धुंधुरु । परि महातेजीं न मिरवे काय करूं ।

अमृताचिया ताटीं वोगरूं । ऐसी रससोय कैंची ? ॥ ९ ॥

हां हो हिमकरासी विंजणें । कीं नादापुढें आइकवणें ।

लेणियासी लेणें । हें कहीं आथी ? ॥ १० ॥

सांगा परिमळें काय तुरंबावें । सागरें कवणें ठायीं नाहावें ? ।

हें गगनचि आडे आघवें । ऐसा पवाडु कैंचा ? ॥ ११ ॥

तैसें तुमचें अवधान धाये । आणि तुम्ही म्हणा हें होये ।

ऐसें वक्तृत्व कवणा आहे । जेणें रिझा तुम्ही ? ॥ १२ ॥

तरी विश्वप्रगटितिया गभस्ती । काय हातिवेन न कीजे आरती ? ।

कां चुळोदकें आपांपती । अर्घ्यु नेदिजे ? ॥ १३ ॥

प्रभू तुम्ही महेशाचिया मूर्ती । आणि मी दुबळा अर्चितुसें भक्ती ।

म्हणौनि बोल जर्‍ही गंगावती । तर्‍ही स्वीकाराल कीं ॥ १४ ॥

बाळक बापाचिये ताटीं रिगे । आणि बापातेंचि जेवऊं लागे ।

कीं तो संतोषिलेनि वेगें । मुखचि वोढवी ॥ १५ ॥

तैसा मीं जरी तुम्हांप्रती । चावटी करीतसें बाळमती ।

तरी तुम्ही संतोषिजे ऐसी जाती । प्रेमाची असे ॥ १६ ॥

आणि तेणें आपुलेपणाचेनि मोहें । तुम्हीं संत घेतले असा बहुवें ।

म्हणौनि केलिये सलगीचा नोहे । आभारु तुम्हां ॥ १७ ॥

अहो तान्हयाचें लागतां झटें । तेणें अधिकचि पान्हा फुटे ।

रोषें प्रेम दुणवटे । पढियंतयाचेनि ॥ १८ ॥

म्हणौनि मज लेंकुरवाचेनि बोलें । तुमचें कृपाळूपण निदैलें ।

तें चेइलें ऐसें जी जाणवलें । यालागीं बोलिलो मीं ॥ १९ ॥

एर्‍हवीं चांदिणें पिकविजत आहे चेपणीं ? । कीं वारया घापत आहे वाहणी ? ।

हां हो गगनासि गंवसणी । घालिजे केवीं ? ॥ २० ॥

आइका पाणी वोथिजावें न लगे । नवनीतीं माथुला न रिगे ।

तेवीं लाजिलें व्याख्यान निगे । देखोनि जयातें ॥ २१ ॥

हें असो शब्दब्रह्म जिये बाजे । शब्द मावळलेया निवांतु निजे ।

तो गीतार्थु मर्‍हाठिया बोलिजे । हा पाडु काई ? ॥ २२ ॥

परि ऐसियाही मज धिंवसा । तो पुढति याचि येकी आशा ।

जे धिटींवा करूनि भवादृशां । पढियंतया होआवें ॥ २३ ॥

तरि आतां चंद्रापासोनि निववितें । जें अमृताहूनि जीववितें ।

तेणें अवधानें कीजो वाढतें । मनोरथां माझिया ॥ २४ ॥

कां जैं दिठिवा तुमचा वरुषे । तैं सकळार्थ सिद्धि मती पिके ।

एर्‍हवीं कोंभेला उन्मेषु सुके । जरी उदास तुम्ही ॥ २५ ॥

सहजें तरी अवधारा । वक्तृत्वा अवधानाचा होय चारा ।

तरी दोंदें पेलती अक्षरां । प्रमेयाचीं ॥ २६ ॥

अर्थ बोलाची वाट पाहे । तेथ अभिप्रावोचि अभिप्रायातें विये ।

भावाचा फुलौरा होत जाये । मतिवरी ॥ २७ ॥

म्हणौनि संवादाचा सुवावो ढळे । तर्‍ही हृदयाकाश सारस्वतें वोळे ।

आणि श्रोता दुश्चिता तरि वितुळे । मांडला रसु ॥ २८ ॥

अहो चंद्रकांतु द्रवता कीर होये । परि ते हातवटी चंद्रीं कीं आहे ।

म्हणौनि वक्ता तो वक्ता नोहे । श्रोतेनिविण ॥ २९ ॥

परि आतां आमुतें गोड करावें । ऐसें तांदुळीं कायसा विनवावें ? ।

साइखडियानें काइ प्रार्थावें । सूत्रधारातें ? ॥ ३० ॥

तो काय बाहुलियांचिया काजा नाचवी ? । कीं आपुलिये जाणिवेची कळा वाढवी ।

म्हणौनि आम्हां या ठेवाठेवी । काय काज ॥ ३१ ॥

तवं श्रीगुरू म्हणती काइ जाहलें । हें समस्तही आम्हां पावलें ।

आतां सांगैं जें निरोपिलें । नारायणें ॥ ३२ ॥

येथ संतोषोनि निवृत्तिदासें । जी जी म्हणौनि उल्हासें ।

अवधारा श्रीकृष्ण ऐसें । बोलते जाहले ॥ ३३ ॥

श्रीभगवानुवाच ।

इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ।

ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात् ॥ १॥

नातरि अर्जुना हें बीज । पुढती सांगिजेल तुज ।

जें हें अंतःकरणींचें गुज । जिवाचिये ॥ ३४ ॥

येणें मानें जीवाचें हिये फोडावें । मग गुज कां पां मज सांगावें ? ।

ऐसें कांहीं स्वभावें । कल्पिशी जरी ॥ ३५ ॥

तरी परियेसी गा प्राज्ञा । तूं आस्थेचीच संज्ञा ।

बोलिलिये गोष्टीची अवज्ञा । नेणसी करूं ॥ ३६ ॥

म्हणौनि गूढपण आपुलें मोडो । वरि न बोलणेंही बोलावें घडो ।

परि आमुचिये जीवींचें पडो । तुझ्या जीवीं ॥ ३७ ॥

अगा थानीं कीर दूध गूढ । परि थानासीचि नव्हे कीं गोड ।

म्हणौनि सरो कां सेवितयाची चाड । जरी अनन्यु मिळे ॥ ३८ ॥

मुडांहूनि बीज काढिलें । मग निर्वाळलिये भूमीं पेरिलें ।

तरि तें सांडीविखुरीं गेलें । म्हणों ये कायी ? ॥ ३९ ॥

यालागीं सुमनु आणि शुद्धमती । जो अनिंदकु अनन्यगती ।

पैं गा गौप्यही परी तयाप्रती । चावळिजे सुखें ॥ ४० ॥

तरि प्रस्तुत आतां गुणीं इहीं । तूं वांचून आणिक नाहीं ।

म्हणौनि गुज तरी तुझ्या ठायीं । लपऊं नये ॥ ४१ ॥

आतां किती नावानावा गुज । म्हणतां कानडें वाटेल तुज ।

तरी ज्ञान सांगेन सहज । विज्ञानेंसी ॥ ४२ ॥

परि तेंचि ऐसेनि निवाडें । जैसें भेसळलें खरें कुडें ।

मग काढिजे फाडोवाडें । पारखूनियां ॥ ४३ ॥

कां चांचूचेनि सांडसें । खांडिजे पय पाणी राजहंसें ।

तुज ज्ञान विज्ञान तैसें । वांटूनि देऊं ॥ ४४ ॥

मग वारयाचिया धारसा । पडिन्नला कोंडा कां नुरेचि जैसा ।

आणि कणांचा आपैसा । राशिवा जोडे ॥ ४५ ॥

तैसें जें जाणितलेयासाठीं । संसार संसाराचिये गांठीं ।

लाऊनि बैसवी पाटीं । मोक्षश्रियेच्या ॥ ४६ ॥

राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमम् ।

प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम् ॥ २॥

जे जाणणेया आघवेयांच्या गांवीं । गुरुत्वाची आचार्य पदवी ।

जें सकळ गुह्यांचा गोसावी । पवित्रां रावो ॥ ४७ ॥

आणि धर्माचें निजधाम । तेवींची उत्तमाचें उत्तम ।

पैं जया येतां नाहीं काम । जन्मांतराचें ॥ ४८ ॥

मोटकें गुरुमुखें उदैजत दिसे । आणि हृदयीं स्वयंभचि असे ।

प्रत्यक्ष फावों लागे तैसें । आपैसयाचि ॥ ४९ ॥

तेवींचि गा सुखाच्या पाउटीं । चढतां येइजे जयाच्या भेटी ।

मग भेटल्या कीर मिठी । भोगणेंयाही पडे ॥ ५० ॥

परि भोगाचिये एलीकडिलिये मेरे । चित्त उभें ठेलें सुखा भरे ।

ऐसें सुलभ आणि सोपारें । वरि परब्रह्म ॥ ५१ ॥

पैं गा आणिकही एक याचें । जें हातां आलिया तरी न वचे ।

आणि अनुभवितां कांही न वेचे । वरि विटेहि ना ॥ ५२ ॥

येथ जरी तूं तर्किका । ऐसी हन घेसी शंका ।

ना येवढी वस्तु हे लोकां । उरली केविं पां ? ॥ ५३ ॥

जे एकोत्तरेयाचिया वाढी । जळतिये आगीं घालिती उडी ।

ते अनायासें स्वगोडी । सांडिती केवीं ? ॥ ५४ ॥

तरी पवित्र आणि रम्य । तेवींचि सुखोपाय गम्य ।

आणि स्वसुख परम धर्म्य । वरि आपणपां जोडे ॥ ५५ ॥

ऐसा अवघाचि हा सुरवाडु आहे । तरी जना हातीं केविं उरों लाहे ।

हा शंकेचा ठावो कीर होये । परि न धरावी तुवां ॥ ५६ ॥

अश्रद्दधानाः पुरुषा धर्मस्यास्य परंतप ।

अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्युसंसारवर्त्मनि ॥ ३॥

पाहे पां दूध पवित्र आणि गोड । पासी त्वचेचिया पदराआड ।

परि तें अव्हेरूनि गोचिड । अशुद्ध काय न सेविती ? ॥ ५७ ॥

कां कमलकंदा आणि दर्दुरीं । नांदणूक एकेचि घरीं ।

परि परागु सेविजे भ्रमरीं । येरां चिखलुचि उरे ॥ ५८ ॥

नातरी निदैवाच्या परिवरीं । लोह्या रुतलिया आहाति सहस्रवरी ।

परि तेथ बैसोनि उपवासु करी । कां दरिद्रें जिये ॥ ५९ ॥

तैसा हृदयामध्यें मी रामु । असतां सर्वसुखाचा आरामु ।

कीं भ्रांतासी कामु । विषयावरी ॥ ६० ॥

बहु मृगजळ देखोनि डोळां । थुंकिजे अमृताचा गिळितां गळाळा ।

तोडिला परिसु बांधिला गळां । शुक्तिकालाभें ॥ ६१ ॥

तैसी अहंममतेचिये लवडसवडी । मातें न पवतीचि बापुडीं ।

म्हणौनि जन्ममरणाची दुथडीं । डहुळितें ठेलीं ॥ ६२ ॥

एर्‍हवीं मी तरी कैसा । मुखाप्रति भानु कां जैसा ।

कहीं दिसे न दिसे ऐसा । वाणीचा नोहे ॥ ६३ ॥

मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना ।

मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्ववस्थितः ॥ ४॥

माझेया विस्तारलेपणा नांवें । हें जगचि नोहे आघवें ? ।

जैसें दूध मुरालें स्वभावें । तरि तेंचि दहीं ॥ ६४ ॥

कां बीजचि जाहलें तरु । अथवा भांगारचि अळंकारु ।

तैसा मज एकाचा विस्तारु । तें हें जग ॥ ६५ ॥

हें अव्यक्तपणें थिजलें । तेंचि मग विश्वाकारें वोथिजलें ।

तैसें अमूर्तमूर्ति मियां विस्तारलें । त्रैलोक्य जाणें ॥ ६६ ॥

महदादि देहांतें । इयें अशेषेंही भूतें ।

परी माझ्या ठायीं बिंबतें । जैसें जळीं फेण ॥ ६७ ॥

परि तया फेणांआंतु पाहतां । जेवीं जळ न दिसे पंडुसुता ।

नातरी स्वप्नींची अनेकता । चेइलिया नोहिजे ॥ ६८ ॥

तैसीं भूतें इयें माझ्या ठायीं । बिंबती तयांमाजीं मी नाहीं ।

इया उपपत्ती तुज पाहीं । सांगितलिया मागां ॥ ६९ ॥

म्हणौनि बोलिलिया बोलाचा अतिसो । न कीजे यालागीं हें असो ।

परी मज आंत पैसो । दिठी तुझी ॥ ७० ॥

न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम् ।

भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः ॥ ५॥

आमुचा प्रकृतीपैलीकडील भावो । जरी कल्पनेवीण लागसी पाहों ।

तरी मजमाजीं भूतें हेंही वावो । जें मी सर्व म्हणौनी ॥ ७१ ॥

एर्‍हवीं संकल्पाचिये सांजवेळे । नावेक तिमिरेजती बुद्धीचे डोळे ।

म्हणौनि अखंडितचि परि झांवळे । भूतभिन्न ऐसें देखे ॥ ७२ ॥

तेचि संकल्पाची सांज जैं लोपे । तैं अखंडितचि आहे स्वरूपें ।

जैसें शंका जातखेंवो लोपे । सापपण माळेचें ॥ ७३ ॥

एर्‍हवीं तरी भूमीआंतूनि स्वयंभ । काय घडेयागाडगेयाचे निघती कोंभ ? ।

परि ते कुलालमतीचे गर्भ । उमटले कीं ॥ ७४ ॥

नातरी सागरींच्या पाणी । काय तरंगाचिया आहाती खाणी ? ।

ते अवांतर करणी । वारयाची नव्हे ? ॥ ७५ ॥

पाहें पां कापसाच्या पोटीं । काय कापडाची होती पेटी ? ।

तो वेढितयाचिया दिठी । कापड जाहला ॥ ७६ ॥

जरी सोनें लेणें हौनी घडे । तरी तयाचें सोनेंपण न मोडे ।

येर अळंकार हे वरचिलीकडे । लेतयाचेनि भावें ॥ ७७ ॥

सांगें पडिसादाचीं प्रत्युत्तरें । कां आरिसां जें आविष्करें ।

तें आपलें कीं साचोकारें । तेथेंचि होतें ? ॥ ७८ ॥

तैसी इये निर्मळे माझ्या स्वरूपीं । जो भूतभावना आरोपी ।

तयासी तयाच्या संकल्पीं । भूताभासु असे ॥ ७९ ॥

तेचि कल्पिती प्रकृती पुरे । तरि भूताभासु आधींचि सरे ।

मग स्वरूप उरे एकसरें । निखळ माझें ॥ ८० ॥

हें असो आंगीं भरलिया भवंडी । जैशा भोंवत दिसती अरडीदरडी ।

तैशी आपुलिया कल्पना अखंडीं । गमती भूतें ॥ ८१ ॥

तेचि कल्पना सांडूनि पाहीं । तरि मी भूतीं भूतें माझिया ठायीं ।

हें स्वप्नींही परि नाहीं । कल्पावयाजोगें ॥ ८२ ॥

आतां मीच एक भूतांतें धर्ता । अथवा भूतांमाजीं मी असता ।

या संकल्पसन्निपाता- । आंतुलिया बोलिया ॥ ८३ ॥

म्हणौनि परियेसी गा प्रियोत्तमा । यापरी मी विश्वेंसीं विश्वात्मा ।

जो इया लटकिया भूतग्रामा । भाव्यु सदा ॥ ८४ ॥

रश्मीचेनि आधारें जैसें । नव्हे तेंचि मृगजळ आभासे ।

माझ्या ठायीं भूतजात तैसें । आणि मातेंहीं भावी ॥ ८५ ॥

मी ये परीचा भूतभावनु । परि सर्व भूतांसि अभिन्नु ।

जैसी प्रभा आणि भानु । एकचि ते ॥ ८६ ॥

हा आमुचा ऐश्वर्ययोगु । तुवां देखिला कीं चांगु ? ।

आतां सांगे कांहीं एथ लागु । भूतभेदाचा असे ? ॥ ८७ ॥

यालागीं मजपासूनि भूतें । आनें नव्हती हें निरुतें ।

आणि भूतांवेगळिया मातें । कहींच न मनीं हो \! ॥ ८८ ॥

यथाकाशस्थितो नित्यं वायुः सर्वत्रगो महान् ।

तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानीत्युपधारय ॥ ६॥

पैं गगन जेवढें जैसें । पवनुहि गगनीं तेवढाचि असे ।

सहजें हालविलिया वेगळा दिसे । एर्‍हवीं गगन तेंचि तो ॥ ८९ ॥

तैसें भूतजात माझ्या ठायीं । कल्पिजे तरी आभासे कांहीं ।

निर्विकल्पीं तरी नाहीं । तेथ मीचि मी आघवें ॥ ९० ॥

म्हणौनि नाहीं आणि असे । हें कल्पनेचेनि सौरसें ।

जें कल्पनालोपें भ्रंशे । आणि कल्पनेसवें होय ॥ ९१ ॥

तेंचि कल्पितें मुद्दल जाये । तैं असे नाहीं हें कें आहे ? ।

म्हणौनि पुढती तूं पाहे । हा ऐश्वर्ययोगु ॥ ९२ ॥

ऐसिया प्रतीतिबोधसागरीं । तूं आपणेयातें कल्लोळु एक करीं ।

मग जंव पाहासी चराचरीं । तंव तूंचि आहासी ॥ ९३ ॥

या जाणणेयाचा चेवो । तुज आला ना ? म्हणती देवो ।

तरी आतां द्वैत स्वप्न वावो । जालें कीं ना ? ॥ ९४ ॥

तरी पुढती जरी विपायें । बुद्धीसी कल्पनेची झोंप ये ।

तरी अभेदबोधु जाये । जैं स्वप्नीं पडिजे ॥ ९५ ॥

म्हणौनि ये निद्रेची वाट मोडे । निखळ उद्‍बोधाचेंचि आपणपें घडे ।

ऐसें वर्म जें आहे फुडें । तें दावों आतां ॥ ९६ ॥

तरी धनुर्धरा धैर्या । निकें अवधान देईं बा धनंजया ।

पैं सर्व भूतांतें माया । करी हरी गा ॥ ९७ ॥

सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकाम् ।

कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम् ॥ ७॥

जिये नांव गा प्रकृती । जे द्विविधा सांगितली तुजप्रती ।

एकी अष्टधा भेदव्यक्ती । दुजी जीवरूपा ॥ ९८ ॥

हा प्रकृतीविखो आघवा । तुवां मागां परिसिलासी पांडवा ।

म्हणौनि असो काई सांगावा । पुढतपुढती ॥ ९९ ॥

तरी ये माझिये प्रकृती । महाकल्पाच्या अंतीं ।

सर्व भूतें अव्यक्तीं । ऐक्यासि येती ॥ १०० ॥

ग्रीष्माच्या अतिरसीं । सबीजें तृणें जैसीं ।

मागुती भूमीसी । सुलीनें होतीं ॥ १०१ ॥

कां वार्षिये ढेंढें फिटे । जेव्हां शारदीयेचा अनुघडु फुटे ।

तेव्हां घनजात आटे । गगनींचे गगनीं ॥ १०२ ॥

नातरी आकाशाचे खोंपे । वायु निवांतुचि लोपे ।

कां तरंगता हारपे । जळीं जेवीं ॥ १०३ ॥

अथवा जागिनलिये वेळे । स्वप्न मनींचें मनीं मावळे ।

तैसें प्राकृत प्रकृतीं मिळे । कल्पक्षयीं ॥ १०४ ॥

मग कल्पादीं पुढती । मीचि सृजीं ऐसी वदंती ।

तरी इयेविषयीं निरुती । उपपत्ती आइक ॥ १०५ ॥

प्रकृतिं स्वामवष्टाभ्य विसृजामि पुनः पुनः ।

भूतग्राममिमं कृत्स्‍नमवशं प्रकृतेर्वशात् ॥ ८॥

तरी हेचि प्रकृती किरीटी । मी स्वकीया सहजें अधिष्ठीं ।

तेथ तंतूसमवाय पटी । जेंवि विणावणी दिसे ॥ १०६ ॥

मग तिये विणावणीचेनि आधारें । लहाना चौकडिया पटत्व भरे ।

तैसीं पंचात्मकें आकारें । प्रकृतीचि होय ॥ १०७ ॥

जैसें विरजणियाचेनि संगें । दूधचि आटेजों लागे ।

तैशी प्रकृती आंगा रिगे । सृष्टीपणाचिया ॥ १०८ ॥

बीज जळाची जवळीक लाहे । आणि तेंचि शाखोपशाखीं होये ।

तैसें मज करणें आहे । भूतांचें हें ॥ १०९ ॥

अगा नगर हें रायें केंलें । या म्हणणया साचपण कीर आलें ।

परि निरुतें पाहतां काय सिणलें । रायाचे हात ? ॥ ११० ॥

आणि मी प्रकृती अधिष्ठीं तें कैसें । जैसा स्वप्नीं जो असे ।

मग तोचि प्रवेशे । जागृतावस्थे ॥ १११ ॥

तरी स्वप्नौनि जागृती येतां । काय पाय दुखती पंडुसुता ।

कीं स्वप्नामाजीं असतां । प्रवासु होय ? ॥ ११२ ॥

या आघवियाचा अभिप्रावो कायी । जे हें भूतसृष्टीचें कांहीं ।

मज एकही करणें नाहीं । ऐसाचि अर्थु ॥ ११३ ॥

जैसी रायें अधिष्ठिली प्रजा । व्यापारें आपुलालिया काजा ।

तैसा प्रकृतिसंगु हा माझा । येर करणें तें इयेचें ॥ ११४ ॥

पाहे पां पूर्णचंद्राचिये भेटी । समुद्रीं अपार भरतें दाटी ।

तेथ चंद्रासि काय किरीटी । उपखा पडे ? ॥ ११५ ॥

जड परि जवळिका । लोह चळे तरी चळो कां ।

तरि कवणु शीणु भ्रामका । सन्निधानाचा ? ॥ ११६ ॥

किंबहुना यापरी । मी निजप्रकृति अंगिकारीं ।

आणि भूतसृष्टी एकसरी । प्रसवोंचि लागे ॥ ११७ ॥

जो हा भूतग्रामु आघवा । असे प्रकृतीआधीन पांडवा ।

जैसी बीजाचिया वेलपालवा । समर्थ भूमी ॥ ११८ ॥

नातरी बाळादिकां वयसा । गोसावी देहसंगु जैसा ।

अथवा घनावळी आकाशा । वार्षिये जेवीं ॥ ११९ ॥

कां स्वप्नासि कारण निद्रा । तैसी प्रकृती हे नरेंद्रा ।

या अशेषाहि भूतसमुद्रा । गोसाविणी गा ॥ १२० ॥

स्थावरा आणि जंगमा । स्थूळा अथवा सूक्ष्मा ।

हे असो भूतग्रामा । प्रकृतिचि मूळ ॥ १२१ ॥

म्हणौनि भूतें हन सृजावीं । कां सृजिलीं प्रतिपाळावीं ।

इयें करणीं न येती आघवीं । आमुचिया आंगा ॥ १२२ ॥

जळीं चंद्रिकेचिया पसरती वेली । ते वाढी चंद्रें नाहीं वाढविली ।

तेविं मातें पावोनि ठेलीं । दूरी कर्में ॥ १२३ ॥

न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनंजय ।

उदासीनवदासीनमसक्तं तेषु कर्मसु ॥ ९॥

आणि सुटलिया सिंधुजळाचा लोटु । न शके धरूं सैंधवाचा घाटु ।

तेविं सकळ कर्मा मीचि शेवटु । तीं काय बांधती मातें ? ॥ १२४ ॥

धूम्ररजांची पिंजरीं । वाजतिया वायूतें जरी होकारी ।

कां सूर्यबिंबामाझारीं । आंधारें शिरे ? ॥ १२५ ॥

हें असो पर्वताचिये हृदयींचें । जेविं पर्जन्यधारास्तव न खोंचें ।

तेविं कर्मजात प्रकृतीचें । न लगे मज ॥ १२६ ॥

एर्‍हवीं इये प्रकृतिविकारीं । एकु मीचि असे अवधारीं ।

परि उदासीनाचिया परी । करीं ना करवीं ॥ १२७ ॥

जैसा दीपु ठेविला परिवरीं । कवणातें नियमी ना निवारी ।

आणि कवण कवणिये व्यापारीं । राहाटे तेंहि नेणें ॥ १२८ ॥

तो जैसा कां साक्षिभूतु । गृहव्यापारप्रवृत्तिहेतु ।

तैसा भूतकर्मीं अनासक्तु । मी भूतीं असें ॥ १२९ ॥

हा एकचि अभिप्रावो पुढतपुढती । काय सांगों बहुतां उपपत्ती ।

येथ एकहेळां सुभद्रापती । येतुलें जाण पां ॥ १३० ॥

मयाध्यक्षेण प्रकृतिः सूयते सचराचरम् ।

हेतुनानेन कौन्तेय जगद्विपरिवर्तते ॥ १०॥

जे लोकचेष्टां समस्तां । जैसा निमित्तमात्र कां सविता ।

तैसा जगत्प्रभवीं पंडुसुता । हेतु मी जाणें ॥ १३१ ॥

कां जें मियां अधिष्ठिलिया प्रकृती । होती चराचराचिया संभूती ।

म्हणौनि मी हेतु हे उपपत्ती । घडे यया ॥ १३२ ॥

आतां येणें उजिवडें निरुतें । न्याहाळीं पां ऐश्वर्ययोगातें ।

जे माझ्या ठायीं भूतें । परी भूतीं मी नसें ॥ १३३ ॥

अथवा भूतें ना माझ्या ठायीं । आणि भूतांमाजीं मी नाहीं ।

या खुणा तूं कहीं । चुकों नको ॥ १३४ ॥

हें सर्वस्व आमुचें गूढ । परि दाविलें तुज उघड ।

आतां इंद्रियां देऊनि कवाड । हृदयीं भोगीं ॥ १३५ ॥

हा दंशु जंव नये हातां । तंव माझें साचोकारपण पार्था ।

न संपडे गा सर्वथा । जेविं तुषीं कणु ॥ १३६ ॥

एर्‍हवीं अनुमानाचेनि पैसें । आवडे कीर कळलें ऐसें ।

परि मृगजळाचेनि वोलांशें । काय भूमि तिमे ? ॥ १३७ ॥

जें जाळ जळीं पांगिलें । तेथ चंद्रबिंब दिसे आंतुडलें ।

परि थडिये काढूनि झाडिलें । तेव्हां बिंब कें सांगैं ? ॥ १३८ ॥

तैसें बोलवरी वाचाबळें । वायांचि झकविजती प्रतीतीचें डोळे ।

मग साचोकारें बोधावेळे । आथि ना होइजे ॥ १३९ ॥

अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम् ।

परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम् ॥ ११॥

किंबहुना भवा बिहाया । आणि साचें चाड आथि जरी मियां ।

तरि तूं गा उपपत्ती इया । जतन कीजे ॥ १४० ॥

एर्‍हवीं दिठी वेधली कवळें । तैं चांदणियातें म्हणे पिंवळें ।

तेंविं माझ्या स्वरूपीं निर्मळें । देखती दोष ॥ १४१ ॥

नातरी ज्वरें विटाळलें मुख । तें दुधातें म्हणे कडू विख ।

तेविं अमानुषा मानुष । मानिती मातें ॥ १४२ ॥

म्हणौनि पुढतपुढती धनंजया । झणें विसंबसी या अभिप्राया ।

जे इया स्थूलदृष्टी वायां । जाइजेल गा ॥ १४३ ॥

पैं स्थूलदृष्टी देखती मातें । तेंचि न देखणें जाण निरुतें ।

जैसें स्वप्नींचेनि अमृतें । अमरा नोहिजे ॥ १४४ ॥

एर्‍हवीं स्थूलदृष्टी मूढ । मातें जाणती कीर दृढ ।

परि तें जाणणेचि जाणणेया आड । रिगोनि ठाके ॥ १४५ ॥

जैसा नक्षत्राचिया आभासा- । साठीं घातु झाला तया हंसा ।

माजीं रत्‍नबुद्धीचिया आशा । रिगोनियां ॥ १४६ ॥

सांगैं गंगा या बुद्धी मृगजळ । ठाकोनि आलियाचें कवण फळ ।

काय सुरतरु म्हणौनि बाबुळ । सेविली करी ? ॥ १४७ ॥

हार निळयाचाचि दुसरा । या बुद्धी हातु घातला विखारा ।

कां रत्‍नें म्हणौनि गारा । वेंचि जेंवीं ॥ १४८ ॥

अथवा निधान हें प्रगटलें । म्हणौनि खदिरांगार खोळे भरिले ।

कां साउली नेणतां घातलें । कुहा सिंहें ॥ १४९ ॥

तेवीं मी म्हणौनि प्रपंचीं । जिहीं बुडी दिधली कृतनिश्चयाची ।

तिहीं चंद्रासाठीं जेवीं जळींची । प्रतिभा धरिली ॥ १५० ॥

तैसा कृतनिश्चयो वायां गेला । जैसा कोण्ही एकु कांजी प्याला ।

मग परिणाम पाहों लागला । अमृताचा ॥ १५१ ॥

तैसें स्थूलाकारी नाशिवंतें । भरंवसा बांधोनि चित्तें ।

पाहती मज अविनाशातें । तरी कैंचा दिसें ? ॥ १५२ ॥

आगा काई पश्चिमसमुद्राचिया तटा । निघिजत आहे पूर्विलिया वाटा ।

कां कोंडा कांडतां सुभटा । कणु आतुडे ? ॥ १५३ ॥

तैसें विकारलें हें स्थूळ । जाणितले या मी जाणवतसें केवळ ।

काई फेण पितां जळ । सेविलें होय ? ॥ १५४ ॥

म्हणौनि मोहिलेंनि मनोधर्में । हेंचि मी मानूनि संभ्रमें ।

मग येथिंची जियें जन्मकर्में । तियें मजचि म्हणती ॥ १५५ ॥

येतुलेनि अनामा नाम । मज अक्रियासि कर्म ।

विदेहासि देहधर्म । आरोपिती ॥ १५६ ॥

मज आकारशून्या आकारु । निरुपाधिका उपचारु ।

मज विधिवर्जिता व्यवहारु । आचारादिक ॥ १५७ ॥

मज वर्णहीना वर्णु । गुणातीतासि गुणु ।

मज अचरणा चरणु । अपाणिया पाणी ॥ १५८ ॥

मज अमेया मान । सर्वगतासी स्थान ।

जैसें सेजेमाजीं वन । निदेला देखे ॥ १५९ ॥

तैसें अश्रवणा श्रोत्र । मज अचक्षूसी नेत्र ।

अगोत्रा गोत्र । अरूपा रूप ॥ १६० ॥

मज अव्यक्तासी व्यक्ती । अनार्तासी आर्ती ।

स्वयंतृप्ता तृप्ती । भाविती गा ॥ १६१ ॥

मज अनावरणा प्रावरण । भूषणातीतासि भूषण ।

मज सकळ कारणा कारण । देखती ते ॥ १६२ ॥

मज सहजातें करिती । स्वयंभातें प्रतिष्ठिती ।

निरंतरातें आव्हानिती । विसर्जिती गा ॥ १६३ ॥

मी सर्वदा स्वतःसिद्धु । तो कीं बाळ तरुण वृद्धु ।

मज एकरूपा संबंधु । जाणती ऐसे ॥ १६४ ॥

मज अद्वैतासि दुजें । मज अकर्तयासि काजें ।

मी अभोक्ता कीं भुंजें । ऐसें म्हणती ॥ १६५ ॥

मज अकुळाचें कुळ वानिती । मज नित्याचेनि निधनें शिणती ।

मज सर्वांतरातें कल्पिती । अरि मित्र गा ॥ १६६ ॥

मी स्वानंदाभिरामु । तया मज अनेक सुखांचा कामु ।

आघवाचि मी असे समु । कीं म्हणती एकदेशी ॥ १६७ ॥

मी आत्मा एक चराचरीं । म्हणती एकाचा कैंपक्ष करीं ।

आणि कोपोनि एकातें मारीं । हेंचि वाढविती ॥ १६८ ॥

किंबहुना ऐसें समस्त । जे हे मानुषधर्म प्राकृत ।

तयाचि नांव मी ऐसें विपरीत । ज्ञान तयांचें ॥ १६९ ॥

जंव आकारु एक पुढां देखती । तंव हा देव येणें भावें भजती ।

मग तोचि विघडलिया टाकिती । नाहीं म्हणौनि ॥ १७० ॥

मातें येणें येणें प्रकारें । जाणती मनुष्य ऐसेनि आकारें ।

म्हणौनि ज्ञानचि तें आंधारें । ज्ञानासि करी ॥ १७१ ॥

मोघाशा मोघकर्माणो मोघज्ञाना विचेतसः ।

राक्षसीमासुरीं चैव प्रकृतिं मोहिनीं श्रिताः ॥ १२॥

यालागीं जन्मलेचि ते मोघ । जैसें वार्षियेवीण मेघ ।

कां मृगजळाचे तरंग । दुरूनीचि पाहावें ॥ १७२ ॥

अथवा कोल्हेरीचे असिवार । नातरी वोडंबरीचे अळंकार ।

कीं गंधर्वनगरीचे आवार । आभासती कां ॥ १७३ ॥

साबरी वाढिन्नल्या सरळा । वरी फळ ना आंतु पोकळा ।

कां स्तन जाले गळां । शेळिये जैसें ॥ १७४ ॥

तैसें मूर्खाचें तया जियालें । आणि धिग् कर्म तयांचें निपजलें ।

जैसें साबरी फळ आलें । घेपे ना दीजे ॥ १७५ ॥

मग जें कांहीं ते पढिन्नले । तें मर्कटें नारळ तोडिले ।

कां आंधळ्या हातीं पडिलें । मोतीं जैसें ॥ १७६ ॥

किंबहुना तयांचीं शास्त्रें । जैशीं कुमारीं हातीं दिधलीं शस्त्रें ।

कां अशौच्या मंत्रें । बीजें कथिलीं ॥ १७७ ॥

तैसें ज्ञानजात तयां । आणि जें कांहीं आचरलें गा धनंजया ।

तें आघवेंचि गेलें वायां । जें चित्तहीन ॥ १७८ ॥

पैं तमोगुणाची राक्षसी । जे सद्‍बुद्धीतें ग्रासी ।

विवेकाचा ठावोचि पुसी । निशाचरी जे ॥ १७९ ॥

तिये प्रकृती वरपडे जाले । म्हणौनि चिंतेचेनि कपोलें गेले ।

वरि तामसीयेचिये पडिले । मुखामाजीं ॥ १८० ॥

जेथ आशेचिये लाळे । आंतु हिंसा जीभ लोळे ।

तेवींचि असंतोषाचे चाकळे । अखंड चघळी ॥ १८१ ॥

जे अनर्थाचे कानवेरी । आवाळुवें चाटीत निघे बाहेरी ।

जे प्रमादपर्वतींची दरी । सदाचि मातली ॥ १८२ ॥

जेथ द्वेषाचिया दाढा । खसखसां ज्ञानाचा करिती रगडा ।

जे अगस्ती गवसणी मूढां । स्थूल बुद्धि ॥ १८३ ॥

ऐसे आसुरिये प्रकृतीचे तोंडीं । जे जाले गा भूतोंडीं ।

ते बुडोनि गेले कुंडीं । व्यामोहाच्या ॥ १८४ ॥

एवं तमाचिये पडिले गर्तें । न पविजतीचि विचाराचेनि हातें ।

हें असो ते गेले जेथें । ते शुद्धीचि नाहीं ॥ १८५ ॥

म्हणौनि असोतु इयें वायाणीं । कायशीं मूर्खांचीं बोलणीं ।

वायां वाढवितां वाणी । शिणेल हन ॥ १८६ ॥

ऐसें बोलिलें देवें । तेथ जी जी म्हणितलें पांडवें ।

आइकें जेथ वाचा विसवे । ते साधुकथा ॥ १८७ ॥

महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतीमाश्रिताः ।

भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम् ॥ १३॥

तरी जयाचे चोखटे मानसीं । मी होऊनि असें क्षेत्रसंन्यासी ।

जया निजेलियातें उपासी । वैराग्य गा ॥ १८८ ॥

जयाचिया आस्थेचिया सद्‍भावा । आंतु धर्म करी राणिवा ।

जयाचें मन ओलावा । विवेकासी ॥ १८९ ॥

जे ज्ञानगंगे नाहाले । पूर्णता जेऊनि धाले ।

जे शांतीसी आले । पालव नवे ॥ १९० ॥

जे परिणामा निघाले कोंभ । जे धैर्यमंडपाचे स्तंभ ।

जे आनंदसमुद्रीं कुंभ । चुबकळोनि भरिले ॥ १९१ ॥

जया भक्तीची येतुली प्राप्ती । जे कैवल्यातें परौतें सर म्हणती ।

जयांचिये लीलेमाजीं नीति । जियाली दिसे ॥ १९२ ॥

जे आघवांचि करणीं । लेईले शांतीचीं लेणीं ।

जयांचें चित्त गवसणी । व्यापका मज ॥ १९३ ॥

ऐसें जे महानुभाव । दैविये प्रकृतीचें दैव ।

जे जाणोनियां सर्व । स्वरूप माझें ॥ १९४ ॥

मग वाढतेनि प्रेमें । मातें भजती जे महात्मे ।

परि दुजेपण मनोधर्में । शिवतलें नाहीं ॥ १९५ ॥

ऐसें मीच होऊनि पांडवा । करिती माझी सेवा ।

परि नवलावो तो सांगावा । असे आइक ॥ १९६ ॥

सततं किर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः ।

नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते ॥ १४॥

तरी कीर्तनाचेनि नटनाचे । नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे ।

जें नामचि नाहीं पापाचें । ऐसें केलें ॥ १९७ ॥

यमदमा अवकळा आणिली । तीर्थें ठायावरूनि उठविलीं ।

यमलोकींची खुंटिली । राहाटी आघवी ॥ १९८ ॥

यमु म्हणे काय यमावें । दमु म्हणे कवणातें दमावें ।

तीर्थें म्हणतीं काय खावें । दोष ओखदासि नाहीं ॥ १९९ ॥

ऐसें माझेनि नामघोषें । नाहींचि करिती विश्वाचीं दुःखें ।

अवघें जगचि महासुखें । दुमदुमित भरलें ॥ २०० ॥

ते पाहांटेवीण पाहावित । अमृतेंवीण जीववित ।

योगेंवीण दावित । कैवल्य डोळां ॥ २०१ ॥

परी राया रंका पाड धरूं । नेणती सानेयां थोरां कडसणी करूं ।

एकसरें आनंदाचें आवारु । होत जगा ॥ २०२ ॥

कहीं एकाधेनि वैकुंठा जावें । तें तिहीं वैकुंठचि केलें आघवें ।

ऐसें नामघोषगौरवें । धवळलें विश्व ॥ २०३ ॥

तेजें सूर्य तैसें सोज्वळ । परि तोहि अस्तवे हें किडाळ ।

चंद्र संपूर्ण एखादे वेळ । हे सदा पुरते ॥ २०४ ॥

मेघ उदार परी वोसरे । म्हणौनि उपमेसी न पुरे ।

हे निःशंकपणें सपांखरे । पंचानन ॥ २०५ ॥

जयांचे वाचेपुढां भोजें । नाम नाचत असे माझें ।

जें जन्मसहस्रीं वोळगिजे । एकवेळ यावया ॥ २०६ ॥

तो मी वैकुंठीं नसें । वेळु एक भानुबिंबींही न दिसें ।

वरी योगियांचींही मानसें । उमरडोनि जाय ॥ २०७ ॥

परी तयांपाशीं पांडवा । मी हारपला गिंवसावा ।

जेथ नामघोषु बरवा । करिती माझा ॥ २०८ ॥

कैसे माझ्या गुणीं धाले । देशकालातें विसरले ।

कीर्तनें सुखी झाले । आपणपांचि ॥ २०९ ॥

कृष्ण विष्णु हरि गोविंद । या नामाचे निखळ प्रबंध ।

माजी आत्मचर्चा विशद । उदंड गाती ॥ २१० ॥

हे बहु असो यापरी । कीर्तित मातें अवधारीं ।

एक विचरती चराचरीं । पंडुकुमरा ॥ २११ ॥

मग आणिक ते अर्जुना । साविया बहुवा जतना ।

पंचप्राण मना । पाढाऊ घेउनी ॥ २१२ ॥

बाहेरी यमनियमांची कांटी लाविली । आंतु वज्रासनाची पौळी पन्नासिली ।

वरी प्राणायामाचीं मांडिलीं । वाहातीं यंत्रें ॥ २१३ ॥

तेथ उल्हाट शक्तीचेनि उजिवडें । मन पवनाचेनि सुरवाडें ।

सतरावियेचें पाणियाडें । बळियाविलें ॥ २१४ ॥

तेव्हां प्रत्याहारें ख्याती केली । विकारांची सपिली बोहलीं ।

इंद्रियें बांधोनि आणिली । हृदयाआंतु ॥ २१५ ॥

तंव धारणावारु दाटिन्नले । महाभूतांतें एकवटिलें ।

मग चतुरंग सैन्य निवटिलें । संकल्पाचें ॥ २१६ ॥

तयावरी जैत रे जैत । म्हणौनि ध्यानाचें निशाण वाजत ।

दिसे तन्मयाचें झळकत । एकछत्र ॥ २१७ ॥

पाठीं समाधीश्रियेचा अशेखा । आत्मानुभव राज्यसुखा ।

पट्टाभिषेकु देखा । समरसें जाहला ॥ २१८ ॥

ऐसें हें गहन । अर्जुना माझें भजन ।

आतां ऐकें सांगेन । जे करिती एक ॥ २१९ ॥

तरी दोन्ही पालववेरी । जैसा एक तंतू अंबरीं ।

तैसा मीवांचूनि चराचरीं । जाणती ना ॥ २२० ॥

आदि ब्रह्मा करूनी । शेवटीं मशक धरूनी ।

माजी समस्त हें जाणोनि । स्वरूप माझें ॥ २२१ ॥

मग वाड धाकुटें न म्हणती । सजीव निर्जीव नेणती ।

देखिलिये वस्तु उजू लुंटिती । मीचि म्हणौनि ॥ २२२ ॥

आपुलें उत्तमत्व नाठवे । पुढील योग्यायोग्य नेणवे ।

एकसरें व्यक्तिमात्राचेनि नांवें । नमूंचि आवडे ॥ २२३ ॥

जैसें उंचीं उदक पडिलें । ते तळवटवरी ये उगेलें ।

तैसें नमिजे भूतजात देखिलें । ऐसा स्वभावोचि तयांचा ॥ २२४ ॥

कां फळलिया तरूची शाखा । सहजें भूमीसी उतरे देखा ।

तैसें जीवमात्रां अशेखां । खालावती ते ॥ २२५ ॥

अखंड अगर्वता होऊनि असती । तयांची विनय हेचि संपत्ती ।

जे जयजय मंत्रें अर्पिती । माझ्याचि ठायीं ॥ २२६ ॥

नमितां मानापमान गळाले । म्हणौनि अवचितां मीचि जहाले ।

ऐसे निरंतर मिसळले । उपासिती ॥ २२७ ॥

अर्जुना हे गुरुवी भक्ती । सांगितली तुजप्रती ।

आतां ज्ञानयज्ञें यजिती । ते भक्त आइकें ॥ २२८ ॥

परि भजन करिती हातवटी । तूं जाणत आहासि किरीटी ।

जे मागां इया गोष्टी । केलिया आम्हीं ॥ २२९ ॥

तंव आथि जी अर्जुन म्हणे । हें दैविकिया प्रसादाचें करणें ।

तरि काय अमृताचें आरोगणें । पुरे म्हणवे ? ॥ २३० ॥

या बोला श्रीअनंतें । लागटा देखिलें तयांतें ।

कीं सुखावलेनि चित्तें । डोलतु असे ॥ २३१ ॥

म्हणे भलें केलें पार्था । एर्‍हवीं हा अनवसरु सर्वथा ।

परि बोलवितसे आस्था । तुझी मातें ॥ २३२ ॥

तंव अर्जुन म्हणे हे कायी । चकोरेंवीण चांदणेंचि नाहीं ।

जगचि निवविजे हा तयाच्या ठायीं । स्वभावो कीं जी ॥ २३३ ॥

येरें चकोरें तिये आपुलिये चाडे । चांचू करिती चंद्राकडे ।

तेवीं आम्ही विनवूं तें थोकडें । देवो कृपासिंधु ॥ २३४ ॥

जी मेघु आपुलिये प्रौढी । जगाची आर्ती दवडी ।

वांचूनि चातकाची ताहान केवढी । तो वर्षावो पाहुनी ? ॥ २३५ ॥

परि चुळा एकाचिया चाडे । जेवीं गंगेतेंचि ठाकणें पडे ।

तेवीं आर्त बहु कां थोडे । तरी सांगावें देवें ॥ २३६ ॥

तेथें देवें म्हणितलें राहें । जो संतोषु आम्हां जाहला आहे ।

तयावरी स्तुति साहे । ऐसें उरलें नाहीं ॥ २३७ ॥

पैं परिसतु आहासि निकियापरी । तेंचि वक्तृत्वा वर्‍हाडीक करी ।

ऐसें पुरस्करोनि श्रीहरी । आदरिलें बोलों ॥ २३८ ॥

ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजन्तो मामुपासते ।

एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतोमुखम् ॥ १५॥

तरी ज्ञानयज्ञु तो एवं रूपु । तेथ आदिसंकल्पु हा यूपु ।

महाभूतें मंडपु । भेदु तो पशु ॥ २३९ ॥

मग पांचांचे जे विशेष गुण । अथवा इंद्रियें आणि प्राण ।

हेचि यज्ञोपचारभरण । अज्ञान घृत ॥ २४० ॥

तेथ मनबुद्धीचिया कुंडा । आंतु ज्ञानाग्नि धडफुडा ।

साम्य तेचि सुहाडा । वेदिका जाणें ॥ २४१ ॥

सविवेकमतिपाटव । तेचि मंत्र विद्यागौरव ।

शांति स्रुक्-स्रुव । जीवु यज्वा ॥ २४२ ॥

तो प्रतीतीचेनि पात्रें । विवेकमहामंत्रें ।

ज्ञानाग्निहोत्रें । भेदु नाशी ॥ २४३ ॥

तेथ अज्ञान सरोनि जाये । आणि यजिता यजन हें ठाये ।

आत्मसमरसीं न्हाये । अवभृथीं जेव्हां ॥ २४४ ॥

तेव्हां भूतें विषय करणें । हें वेगळालें कांहीं न म्हणे ।

आघवें एकचि ऐसें जाणें । आत्मबुद्धि ॥ २४५ ॥

जैसा चेइला तो अर्जुना । म्हणे स्वप्नींची हे विचित्र सेना ।

मीचि जाहालों होतों ना । निद्रावशें ? ॥ २४६ ॥

आतां सेना ते सेना नव्हे । हें मीच एक आघवें ।

ऐसें एकत्वें मानवें । विश्व तयां ॥ २४७ ॥

मग तो जीवु हे भाष सरे । आब्रह्म परमात्मबोधें भरे ।

ऐसे भजती ज्ञानाध्वरें । एकत्वें येणें ॥ २४८ ॥

अथवा अनादि हें अनेक । जें आनासारिखें एका एक ।

आणि नामरूपादिक । तेंही विषम ॥ २४९ ॥

म्हणौनि विश्व भिन्न । परि न भेदे तयाचें ज्ञान ।

जैसे अवयव तरि आन आन । परि एकेचि देहींचे ॥ २५० ॥

कां शाखा सानिया थोरा । परि आहाति एकाचिया तरुवरा ।

बहु रश्मि परि दिनकरा । एकाचे जेवीं ॥ २५१ ॥

तेवीं नानाविधा व्यक्ती । आनानें नामें आनानी वृत्ती ।

ऐसें जाणती भेदलां भूतीं । अभेदा मातें ॥ २५२ ॥

येणें वेगळालेपणें पांडवा । करिती ज्ञानयज्ञु बरवा ।

जे न भेदती जाणिवा । जाणते म्हणौनि ॥ २५३ ॥

ना तरी जेधवां जिये ठायीं । देखती कां जें जें कांहीं ।

तें मीवांचूनि नाहीं । ऐसाचि बोधु ॥ २५४ ॥

पाहें पां बुडबुडा जेउता जाये । तेउतें जळचि एक तया आहे ।

मग विरे अथवा राहे । तर्‍ही जळाचिमाजीं ॥ २५५ ॥

कां पवनें परमाणु उचलले । ते पृथ्वीपणावेगळे नाहीं केले ।

आणि माघौते जरी पडले । तरी पृथ्वीचिवरी ॥ २५६ ॥

तैसें भलतेथ भलतेणें भावें । भलतेंही हो अथवा नोहावें ।

परि तें मी ऐसें आघवें । होऊनि ठेले ॥ २५७ ॥

अगा हे जेव्हडी माझी व्याप्ती । तेव्हडीचि तयांची प्रतीती ।

ऐसें बहुधाकारीं वर्तती । बहुचि हौनि ॥ २५८ ॥

हें भानुबिंब आवडे तया । सन्मुख जैसें धनंजया ।

तैसे ते विश्वा यया । समोर सदा ॥ २५९ ॥

अगा तयांचिया ज्ञाना । पाठी पोट नाहीं अर्जुना ।

वायु जैसा गगना । सर्वांगीं असे ॥ २६० ॥

तैसा मी जेतुला आघवा । तेंचि तुक तयांचिया सद्‍भावा ।

तरी न करितां पांडवा । भजन जहालें ॥ २६१ ॥

एर्‍हवीं तरी सकळ मीचि आहें । तरी कवणीं कें उपासिला नोहें ? ।

एथ एकें जाणणेवीण ठाये । अप्राप्तासी ॥ २६२ ॥

परि तें असो येणें उचितें । ज्ञानयज्ञें यजितसांते ।

उपासिती मातें । ते सांगितलें ॥ २६३ ॥

अखंड सकळ हें सकळां मुखीं । सहज अर्पत असे मज एकीं ।

कीं नेणणें यासाठीं मूर्खीं । न पविजेचि मातें ॥ २६४ ॥

अहं क्रतुरहं यज्ञः स्वधाहमहमौषधम् ।

मन्त्रोऽहमहमेवाज्यमहमग्निरहं हुतम् ॥ १६॥

तोचि जाणिवेचा जरी उदयो होये । तरी मुद्दल वेदु मीचि आहें ।

आणि तो विधानातें जया विये । तो क्रतुही मीचि ॥ २६५ ॥

मग तया कर्मापासूनि बरवा । जो सांगोपांगु आघवा ।

यज्ञु प्रकटे पांडवा । तोही मी गा ॥ २६६ ॥

स्वाहा मी स्वधा । सोमादि औषधी विविधा ।

आज्य मी समिधा । मंत्रु मी हवि ॥ २६७ ॥

होता मी हवन कीजे । तेथ अग्नी तो स्वरूप माझें ।

आणि हुतक वस्तु जें जें । तेही मीचि ॥ २६८ ॥

पिताहमस्य जगतो माता धाता पितामहः ।

वेद्यं पवित्रमोंकार ऋक्साम यजुरेव च ॥ १७॥

पैं जयाचेनि अंगसंगें । इये प्रकृतीस्तव अष्टांगें ।

जन्म पाविजत असे जगें । तो पिता मी गा ॥ २६९ ॥

अर्धनारीनटेश्वरीं । जो पुरुष तोचि नारी ।

तेवीं मी चराचरीं । माताही होय ॥ २७० ॥

आणि जाहाले जग जेथ राहे । जेणें जीवित वाढत आहे ।

तें मी वांचूनि नोहे । आन निरुतें ॥ २७१ ॥

इयें प्रकृतिपुरुषें दोन्हीं । उपजलीं जयाचिया अमनमनीं ।

तो पितामह त्रिभुवनीं । विश्वाचा मी ॥ २७२ ॥

आणि आघवेया जाणणेयाचिया वाटा । जया गांवा येती गा सुभटा ।

वेदांचिया चोहटां । वेद्य जें म्हणिजे ॥ २७३ ॥

जेथ नानामतां बुझावणी जाहाली । एकमेकां शास्त्रांची अनोळखी फिटली ।

चुकलीं ज्ञानें जेथ मिळों आलीं । जें पवित्र म्हणिजे ॥ २७४ ॥

पैं ब्रह्मबीजा जाहला अंकुरु । घोषध्वनीनादाकारु ।

तयाचें गा भुवन जो ॐकारु । तोही मी गा ॥ २७५ ॥

जया ॐकाराचिये कुशीं । अक्षरें होतीं औमकारेंसीं ।

जियें उपजत वेदेंसीं । उठलीं तिन्हीं ॥ २७६ ॥

म्हणौनि ऋग्यजुःसामु । हे तीन्ही म्हणे मी आत्मारामु ।

एवं मीचि कुलक्रमु । शब्दब्रह्माचा ॥ २७७ ॥

गतिर्भर्ता प्रभुः साक्षी निवासः शरणं सुहृत् ।

प्रभवः प्रलयः स्थानं निधानं बीजमव्ययम् ॥ १८॥

हें चराचर आघवें । जिये प्रकृती आंत सांठवे ।

ते शिणली जेथ विसवे । ते परमगती मी ॥ २७८ ॥

आणि जयाचेनि प्रकृति जिये । जेणें अधिष्ठिली विश्व विये ।

जो येऊनि प्रकृती इये । गुणातें भोगी ॥ २७९ ॥

तो विश्वश्रियेचा भर्ता । मीचि गा एथ पंडुसुता ।

मी गोसावी असे समस्ता । त्रैलोक्याचा ॥ २८० ॥

आकाशें सर्वत्र वसावें । वायूनें नावभरी उगे नसावें ।

पावकें दाहावें । वर्षावें जळें ॥ २८१ ॥

पर्वतीं बैसका न संडावी । समुद्रीं रेखा नोलांडावी ।

पृथ्वीया भूतें वाहावीं । हे आज्ञा माझी ॥ २८२ ॥

म्यां बोलिविल्या वेदु बोले । म्यां चालविल्या सूर्यु चाले ।

म्यां हालविल्या प्राणु हाले । जो जगातें चाळिता ॥ २८३ ॥

मियांचि नियमिलासांता । काळु ग्रासितसे भूतां ।

इयें म्हणियागतें पंडुसुता । सकळें जयाचीं ॥ २८४ ॥

जो ऐसा समर्थु । तो मी जगाचा नाथु ।

आणि गगना{ऐ}सा साक्षिभूतु । तोही मीचि ॥ २८५ ॥

इहीं नामरूपीं आघवा । जो भरला असे पांडवा ।

आणि नामरूपांचाही वोल्हावा । आपणचि जो ॥ २८६ ॥

जैसे जळाचे कल्लोळ । आणि कल्लोळीं आथी जळ ।

ऐसेनि वसवीतसे सकळ । तो निवासु मी ॥ २८७ ॥

जो मज होय अनन्य शरण । त्याचें निवारी मी जन्ममरण ।

यालागीं शरणागता शरण्य । मीचि एकु ॥ २८८ ॥

मीचि एक अनेकपणें । वेगळालेनि प्रकृतीगुणें ।

जीत जगाचेनि प्राणें । वर्तत असें ॥ २८९ ॥

जैसा समुद्र थिल्लर न म्हणतां । भलतेथ बिंबे सविता ।

तैसा ब्रह्मादि सर्वा भूतां । सुहृद तो मी ॥ २९० ॥

मीचि गा पांडवा । या त्रिभुवनासि वोलावा ।

सृष्टिक्षयप्रभवा । मूळ तें मी ॥ २९१ ॥

बीज शाखांतें प्रसवे । मग तें रूखपण बीजीं सामावे ।

तैसें संकल्पें होय आघवें । पाठीं संकल्पीं मिळे ॥ २९२ ॥

ऐसें जगाचें बीज जो संकल्पु । अव्यक्त वासनारूपु ।

तया कल्पांतीं जेथ निक्षेपु । होय तें स्थान मी ॥ २९३ ॥

इयें नामरूपे लोटती । वर्णव्यक्ती आटती ।

जातीचे भेद फिटती । जैं आकारू नाहीं ॥ २९४ ॥

तैं संकल्पवासनासंस्कार । माघौतें रचावया चराचर ।

जेथ राहोनि असती अमर । तें निधान मी ॥ २९५ ॥

तपाम्यहमहं वर्षं निगृह्णाम्युत्सृजामि च ।

अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन ॥ १९॥

मी सूर्याचेनि वेषें । तपें तैं हें शोषे ।

पाठीं इंद्र होऊनि वर्षें । तैं पुढति भरे ॥ २९६ ॥

अग्नि काष्ठें खाये । तें काष्ठचि अग्नि होये ।

तैसें मरतें मारितें पाहें । स्वरूप माझें ॥ २९७ ॥

यालागीं मृत्यूच्या भागीं जें जें । तेंही पैं रूप माझें ।

आणि न मरतें तंव सहजें । मीचि आहें ॥ २९८ ॥

आतां बहु बोलोनि सांगावें । तें एकिहेळां घे पां आघवें ।

तरी सतासतही जाणावें । मीचि पैं गा ॥ २९९ ॥

म्हणौनि अर्जुना मी नसें । ऐसा कवणु ठाव असे ? ।

परि प्राणियांचें दैव कैसें । जे न देखती मातें ? ॥ ३०० ॥

तरंग पाणियेवीण सुकती । रश्मि वातीवीण न देखती ।

तैसे मीचि ते मी नव्हती । विस्मो देखें ॥ ३०१ ॥

हें आंतबाहेर मियां कोंदलें । जग निखिल माझेंचि वोतिलें ।

कीं कैसें कर्म तयां आड आलें । जें मीचि नाहीं म्हणती ? ॥ ३०२ ॥

परि अमृतकुहां पडिजे । कां आपणयांतें कडिये काढिजे ।

ऐसे आथी काय कीजे । अप्राप्तासी ॥ ३०३ ॥

ग्रासा एका अन्नासाठीं । अंधु धांवताहे किरीटी ।

आढळला चिंतामणि पायें लोटी । आंधळेपणें ॥ ३०४ ॥

तैसें ज्ञान जैं सांडूनि जाये । तैं ऐसी हे दशा आहे ।

म्हणौनि कीजे तें केलें नोहे । ज्ञानेंवीण ॥ ३०५ ॥

आंधळेया गरुडाचे पांख आहाती । ते कवणा उपेगा जाती ? ।

तैसें सत्कर्माचे उपखे ठाती । ज्ञानेंवीण ॥ ३०६ ॥

त्रैविद्या मां सोमपाः पूतपापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ।

ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोकमश्नन्ति दिव्यान्दिवि देवभोगान् ॥ २०॥

देख पां गा किरीटी । आश्रमधर्माचिया राहाटी ।

विधिमार्गां कसवटी । जे आपणचि होती ॥ ३०७ ॥

यजन करितां कौतुकें । तिहीं वेदांचा माथा तुके ।

क्रिया फळेंसि उभी ठाके । पुढां जयां ॥ ३०८ ॥

ऐसे दीक्षित जे सोमप । जे आपणचि यज्ञाचें स्वरूप ।

तींहीं तया पुण्याचेनि नांवें पाप । जोडिलें देखें ॥ ३०९ ॥

श्रुतित्रयांतें जाणोनी । शतवरी यज्ञ करुनी ।

यजिलिया मातें चुकोनी । स्वर्गा वरिती ॥ ३१० ॥

जैसें कल्पतरूतळवटीं । बैसोनि झोळिये देतसे गांठी ।

मग निदैव निघे किरीटी । दैन्यचि करूं ॥ ३११ ॥

तैसे शतक्रतु यजिलें मातें । कीं ईप्सिताति स्वर्गसुखातें ।

आतां पुण्य कीं हें निरुतें । पाप नोहे ? ॥ ३१२ ॥

म्हणौनि मजवीण पाविजे स्वर्गु । तो अज्ञानाचा पुण्यमार्गु ।

ज्ञानिये तयातें उपसर्गु । हानि म्हणती ॥ ३१३ ॥

एर्‍हवीं तरी नरकींचें दुःख । पावोनि स्वर्गा नाम कीं सुख ।

वांचूनि नित्यानंद गा निर्दोख । तें स्वरूप माझें ॥ ३१४ ॥

मज येतां पैं सुभटा । या द्विविधा गा आव्हांटा ।

स्वर्गु नरकु या वाटा । चोरांचिया ॥ ३१५ ॥

स्वर्गा पुण्यात्मकें पापें येइजे । पापात्मकें पापें नरका जाइजे ।

मग मातें जेणें पाविजे । तें शुद्ध पुण्य ॥ ३१६ ॥

आणि मजचिमाजीं असतां । जेणें मी दुर्‍हावें पंडुसुता ।

तें पुण्य ऐसें म्हणतां । जीभ न तुटे काई ? ॥ ३१७ ॥

परि हें असो आतां प्रस्तुत । ऐकें यापरि ते दीक्षित ।

यजूनि मातें याचित । स्वर्गभोगु ॥ ३१८ ॥

मग मी न पविजे ऐसें । जें पापरूप पुण्य असे ।

तेणें लाधलेनि सौरसें । स्वर्गा येती ॥ ३१९ ॥

जेथ अमरत्व हें सिंहासन । ऐरावतासारिखें वाहन ।

राजधानीभुवन । अमरावती ॥ ३२० ॥

जेथ महासिद्धींचीं भांडारें । अमृताचीं कोठारें ।

जिये गांवीं खिल्लारें । कामधेनूंचीं ॥ ३२१ ॥

जेथ वोळगे देव पाइका । सैंघ चिंतामणीचिया भूमिका ।

विनोदवनवाटिका । सुरतरूंचिया ॥ ३२२ ॥

गंधर्व गात गाणीं । जेथ रंभे ऐसिया नाचणी ।

उर्वसी मुख्य विलासिनी । अंतौरिया ॥ ३२३ ॥

मदन वोळगे शेजारें । जेथ चंद्र शिंपे सांबरें ।

पवना ऐसे म्हणियारे । धांवणें जेथ ॥ ३२४ ॥

पैं बृहस्पती मुख्य आपण । ऐसे स्वस्तीश्रियेचे ब्राह्मण ।

ताटियेचे सुरगण । बहुवस जेथें ॥ ३२५ ॥

लोकपाळ रांगेचे । राउत जिये पदवीचे ।

उच्चैःश्रवा खांचे । खोळणिये ॥ ३२६ ॥

हे असो बहु ऐसे । भोग इंद्रसुखासरिसे ।

ते भोगिजती जंव असे । पुण्यलेशु ॥ ३२७ ॥

ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति ।

एवं त्रयीधर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते ॥ २१॥

मग तया पुण्याची पाउटी सरे । सवेंचि इंद्रपणाची उटी उतरे ।

आणि येऊं लागती माघारे । मृत्युलोका ॥ ३२८ ॥

जैसा वेश्याभोगी कवडा वेंचे । मग दारही चेपूं नये तियेचें ।

तैसें लाजिरवाणें दीक्षितांचें । काय सांगों ? ॥ ३२९ ॥

एवं थितिया मातें चुकले । जींहीं पुण्यें स्वर्ग कामिलें ।

तयां अमरपण तें वावों जालें । अंतीं मृत्युलोकु ॥ ३३० ॥

मातेचिया उदरकुहरीं । पचूनि विष्ठीच्या दाथरीं ।

उकडूनि नवमासवरी । जन्मजन्मोनि मरती ॥ ३३१ ॥

अगा स्वप्नीं निधान फावे । परि चेइलिया हारपे आघवें ।

तैसें स्वर्गसुख जाणावें । वेदज्ञाचें ॥ ३३२ ॥

अर्जुना वेदविद जर्‍ही जाहला । तरी मातें नेणता वायां गेला ।

कणु सांडूनि उपणिला । कोंडा जैसा ॥ ३३३ ॥

म्हणौनि मज एकेंविण । हे त्रयीधर्म अकारण ।

आतां मातें जाणोनि कांहीं नेण । तूं सुखिया होसी ॥ ३३४ ॥

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते ।

तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥ २२॥

पैं सर्वभावेसीं उखितें । जे वोपिलें मज चित्तें ।

जैसा गर्भगोळु उद्यमातें । कोणाही नेणें ॥ ३३५ ॥

तैसा मीवांचूनि कांहीं । आणीक गोमटेंचि नाहीं ।

मजचि नाम पाहीं । जिणेंया ठेविलें ॥ ३३६ ॥

ऐसे अनन्यगतिकें चित्तें । चिंतितसांतें मातें ।

जे उपासिति तयांतें । मीचि सेवीं ॥ ३३७ ॥

ते एकवटूनि जिये क्षणीं । अनुसरले गा माझिये वाहणीं ।

तेव्हांचि तयांची चिंतवणी । मजचि पडली ॥ ३३८ ॥

मग तींहीं जें जें करावें । तें मजचि पडिलें आघवें ।

जैसी अजातपक्षाचेनि जीवें । पक्षिणी जिये ॥ ३३९ ॥

आपुली तहान भूक नेणें । तान्हया निकें तें माउलीसीचि करणें ।

तैसें अनुसरले जे मज प्राणें । तयांचें सर्व मी करीं ॥ ३४० ॥

तया माझिया सायुज्याची चाड । तरि तेंचि पुरवीं कोड ।

कां सेवा म्हणती तरी आड । प्रेम सूयें ॥ ३४१ ॥

ऐसा मनीं जो जो धरिती भावो । तो तो पुढां पुढां लागे तयां देवों ।

आणि दिधलियाचा निर्वाहो । तोही मीचि करीं ॥ ३४२ ॥

हा योगक्षेमु आघवा । तयांचा मजचि पडिला पांडवा ।

जयांचिया सर्वभावा । आश्रयो मी ॥ ३४३ ॥

येऽप्यन्यदेवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः ।

तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्यविधीपूर्वकम् ॥ २३॥

आतां आणिकही संप्रदायें । परी मातें नेणती समवायें ।

जें अग्निइंद्रसूर्यसोमाये । म्हणौनि यजिती ॥ ३४४ ॥

तेही कीर मातेंचि होये । कां जें हें आघवें मीचि आहें ।

परि ते भजती उजरी नव्हे । विषम पडे ॥ ३४५ ॥

पाहें पां शाखा पल्लव रुखाचें । हे काय नव्हती एकाचि बीजाचें ? ।

परी पाणी घेणें मुळाचें । तें मुळींचि घापे ॥ ३४६ ॥

कां दहाही इंद्रियें आहाती । इयें जरी एकेचि देहींचीं होती ।

आणि इहीं सेविले विषयो जाती । एकाचि ठायीं ॥ ३४७ ॥

तरि करोनि रससोय बरवी । कानीं केवीं भरावी ? ।

फुलें आणोनि बांधावीं । डोळां केवीं ? ॥ ३४८ ॥

तेथ रसु तो मुखेंचि सेवावा । परिमळु तो घ्राणेंचि घ्यावा ।

तैसा मी तो यजावा । मीचि म्हणौनि ॥ ३४९ ॥

येर मातें नेणोनि भजन । तें वायांचि गा आनेंआन ।

म्हणौनि कर्माचे डोळे ज्ञान । तें निर्दोष होआवें ॥ ३५० ॥

अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च ।

न तु मामभिजान्ति तत्त्वेनातश्च्यवन्ति ते ॥ २४॥

एर्‍हवीं पाहे पां पंडुसुता । या यज्ञोपहारां समस्तां ।

मीवांचूनि भोक्ता । कवणु आहे ? ॥ ३५१ ॥

मी सकळां यज्ञांचा आदि । आणि यजना या मीचि अवधि ।

कीं मातें चुकोनि दुर्बुद्धि । देवां भजले ॥ ३५२ ॥

गंगेचें उदक गंगें जैसें । अर्पिजे देवपितरोद्देशें ।

माझें मज देती तैसें । परि आनानीं भावी ॥ ३५३ ॥

म्हणौनि ते पार्था । मातें न पवतीचि सर्वथा ।

मग मनीं वाहिली जे आस्था । तेथ आले ॥ ३५४ ॥

यान्ति देवव्रता देवान्पितृन्यान्ति पितृव्रता ।

भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम् ॥ २५॥

मनें वाचा करणीं । जयांचीं भजनें देवांचिया वाहणीं ।

ते शरीर जातिये क्षणीं । देवचि जाले ॥ ३५५ ॥

अथवा पितरांचीं व्रतें । वाहती जयांचीं चित्तें ।

जीवित सरलिया तयांतें । पितृत्व वरी ॥ ३५६ ॥

कां क्षुद्रदेवतादि भूतें । तियेचि जयांचि परमदैवतें ।

जिहीं अभिचारिकीं तयांतें । उपासिलें ॥ ३५७ ॥

तयां देहाची जवनिका फिटली । आणि भूतत्वाची प्राप्ती जाहली ।

एवं संकल्पवशें फळलीं । कर्में तयां ॥ ३५८ ॥

मग मीचि डोळां देखिला । जिहीं कानीं मीचि ऐकिला ।

मीचि मनीं भविला । वानिला वाचा ॥ ३५९ ॥

सर्वांगीं सर्वांठायीं । मीचि नमस्करिला जिहीं ।

दानपुण्यादिकें जें कांहीं । तें माझियाचि मोहरां ॥ ३६० ॥

जिहीं मातेंचि अध्ययन केलें । जे आंतबाहेरि मियांचि धाले ।

जयांचें जीवित्व जोडलें । मजचिलागीं ॥ ३६१ ॥

जे अहंकारु वाहत आंगीं । आम्ही हरीचे भूषावयालागीं ।

जे लोभिये एकचि जगीं । माझेनि लोभें ॥ ३६२ ॥

जे माझेनि कामें सकाम । जे माझेनि प्रेमें सप्रेम ।

जे माझिया भुली सभ्रम । नेणती लोक ॥ ३६३ ॥

जयांचीं जाणती मजचि शास्त्रें । मी जोडें जयांचेनि मंत्रें ।

ऐसें जे चेष्टामात्रें । भजले मज ॥ ३६४ ॥

ते मरणा ऐलीचकडे । मज मिळोनि गेले फुडे ।

मग मरणीं आणिकीकडे । जातील केवीं ? ॥ ३६५ ॥

म्हणौनि मद्याजी जे जाहाले । ते माझियाचि सायुज्या आले ।

जिहीं उपचारमिषें दिधलें । आपणपें मज ॥ ३६६ ॥

पैं अर्जुना माझे ठायीं । आपणपेंवीण सौरसु नाहीं ।

मी उपचारें कवणाही । नाकळें गा ॥ ३६७ ॥

एथ जाणीव करी तोचि नेणें । आथिलेंपण मिरवी तेंचि उणें ।

आम्ही जाहलों ऐसें जो म्हणे । तो कांहींचि नव्हे ॥ ३६८ ॥

अथवा यज्ञदानादि किरीटी । कां तपें हन जे हुटहुटी ।

ते तृणा एकासाठीं । न सरे एथ ॥ ३६९ ॥

पाहें पां जाणिवेचेनि बळें । कोण्ही वेदांपासूनि असे आगळें ? ।

कीं शेषाहूनि तोंडाळें । बोलकें आथी ? ॥ ३७० ॥

तोही आंथरुणातळवटीं दडे । येरु नेति नेति म्हणौनि बहुडे ।

एथ सनकादिक वेडे । पिसे जाहले ॥ ३७१ ॥

करितां तापसांची कडसणी । कवणु जवळां ठेविजे शूळपाणी ।

तोही अभिमानु सांडूनि पायवणी । माथां वाहे ॥ ३७२ ॥

नातरी आथिलेपणें सरिशी । कवणी आहे लक्ष्मिये ऐसी ? ।

श्रियेसारिखिया दासी । घरीं जियेतें ॥ ३७३ ॥

तिया खेळतां करिती घरकुलीं । तयां नामें अमरपुरें जरी ठेविलीं ।

तरि न होती काय बाहुलीं । इंद्रादिक तयांचीं ? ॥ ३७४ ॥

तिया नावडोनि जेव्हां मोडिती । तेव्हां महेंद्राचे रंक होती ।

तिया झाडा जेउते पाहती । ते कल्पवृक्ष ॥ ३७५ ॥

ऐसिया जियेचिया जवळिका । सामर्थ्य घरींचिया पाइका ।

ते लक्ष्मी मुख्यनायका । न मनेचि एथ ॥ ३७६ ॥

मग सर्वस्वें करूनि सेवा । अभिमानु सांडूनि पांडवा ।

ते पाय धुवावयाचिया दैवा । पात्र जाहाली ॥ ३७७ ॥

म्हणौनि थोरपण पर्‍हां सांडिजे । एथ व्युत्पत्ति आघवी विसरिजे ।

जैं जगा धाकुटें होईजे । तैं जवळीक माझी ॥ ३७८ ॥

अगा सहस्रकिरणांचिये दिठी- । पुढां चंद्रही लोपे किरीटी ।

तेथ खद्योत कां हुटहुटी । आपुलेनि तेजें ? ॥ ३७९ ॥

तैसें लक्ष्मियेचें थोरपण न सरे । जेथ शंभूचेंही तप न पुरे ।

तेथ येर प्राकृत हेंदरें । केवीं जाणों लाहे ? ॥ ३८० ॥

यालागीं शरीरसांडोवा कीजे । सकळ गुणांचें लोण उतरिजे ।

संपत्तिमदु सांडिजे । कुरवंडी करुनी ॥ ३८१ ॥

पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति ।

तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः ॥ २६॥

मग निस्सीमभाव उल्हासें । मज अर्पावयाचेनि मिसें ।

फळ आवडे तैसें । भलतयाचें हो ॥ ३८२ ॥

भक्तु माझियाकडे दावी । आणि मी दोन्हीं हात वोडवीं ।

मग देंठु न फेडितां सेवीं । आदरेंशी ॥ ३८३ ॥

पैं गा भक्तीचेनि नांवें । फूल एक मज द्यावें ।

तें लेखें तरि म्यां तुरंबावें । परि मुखींचि घालीं ॥ ३८४ ॥

हें असो कायसीं फुलें । पानचि एक आवडे तें जाहलें ।

तें साजुकही न हो सुकलें । भलतैसें ॥ ३८५ ॥

परि सर्वभावें भरलें देखें । आणि भुकेला अमृतें तोखें ।

तैसें पत्रचि परि तेणें सुखें । आरोगूं लागें ॥ ३८६ ॥

अथवा ऐसेंहीं एक घडे । जे पालाही परी न जोडे ।

तरि उदकाचें तंव सांकडें । नव्हेल कीं ? ॥ ३८७ ॥

तें भलतेथ निमोलें । न जोडितां आहे जोडलें ।

तेंचि सर्वस्व करूनि अर्पिलें । जेणें मज ॥ ३८८ ॥

तेणें वैकुंठांपासोनि विशाळें । मजलागीं केली राऊळें ।

कौस्तुभाहोनि निर्मळें । लेणीं दिधलीं ॥ ३८९ ॥

दुधाचीं सेजारें । क्षीराब्धी ऐसीं मनोहरें ।

मजलागीं अपारें । सृजिलीं तेणें ॥ ३९० ॥

कर्पूर चंदन अगरु । ऐसेया सुगंधाचा महामेरु ।

मज हातीवा लाविला दिनकरु । दीपमाळे ॥ ३९१ ॥

गरुडासारिखीं वाहनें । मज सुरतरूंचीं उद्यानें ।

कामधेनूंचीं गोधनें । अर्पिलीं तेणें ॥ ३९२ ॥

मज अमृताहूनि सुरसें । बोनीं वोगरिली बहुवसें ।

ऐसा भक्तांचेनि उदकलेशें । परितोषें गा ॥ ३९३ ॥

हें सांगावें काय किरीटी । तुवांचि देखिलें आपुलिया दिठी ।

मी सुदामाचिया सोडीं गांठीं । पव्हयांलागीं ॥ ३९४ ॥

पैं भक्ति एकी मी जाणें । तेथ सानें थोर न म्हणे ।

आम्ही भावाचे पाहुणे । भलतेया ॥ ३९५ ॥

येर पत्र पुष्प फळ । हें भजावया मिस केवळ ।

वांचूनि आमुचा लाग निष्कळ । भक्तितत्त्व ॥ ३९६ ॥

म्हणौनि अर्जुना अवधारीं । तूं बुद्धी एकी सोपारी करीं ।

तरि सहजें आपुलिया मनोमंदिरीं । न विसंबें मातें ॥ ३९७ ॥

यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् ।

यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम् ॥ २७॥

जे जे कांहीं व्यापार करिसी । कां भोग हन भोगिसी ।

अथवा यज्ञीं यजिसी । नानाविधीं ॥ ३९८ ॥

नातरी पात्रविशेषें दानें । कां सेवकां देसी जीवनें ।

तपादि हन साधनें । व्रतें करिसी ॥ ३९९ ॥

तें क्रियाजात आघवें । जें जैसें निपजेल स्वभावें ।

तें भावना करोनि करावें । माझिया मोहरा ॥ ४०० ॥

परि सर्वथा आपुले जीवीं । केलियाची से कांहींचि नुरवीं ।

ऐसीं धुवोनि कर्में द्यावीं । माझियां हातीं ॥ ४०१ ॥

शुभाशुभफलैरेवं मोक्ष्यसे कर्मबन्धनैः ।

संन्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि ॥ २८॥

मग अग्निकुंडीं बीजें घातलीं । तियें अंकुरदशे जेवीं मुकलीं ।

तेवीं न फळतीचि मज अर्पिलीं । शुभाशुभें ॥ ४०२ ॥

अगा कर्में जैं उरावें । तैं तिहीं सुखदुःखीं फळावें ।

आणि तयातें भोगावया यावें । देहा एका ॥ ४०३ ॥

ते उगाणिलें मज कर्म । तेव्हांचि पुसिलें मरण जन्म ।

जन्मासवें श्रम । वरचिलही गेले ॥ ४०४ ॥

म्हणौनि अर्जुना यापरी । पाहेचा वेळु नव्हेल भारी ।

हे संन्यासयुक्ति सोपारी । दिधली तुज ॥ ४०५ ॥

या देहाचिया बांदोडी न पडिजे । सुखदुःखांचियां सागरीं न बुडिजे ।

सुखें सुखरूपा घडिजे । माझियाचि आंगा ॥ ४०६ ॥

समोहं सर्वभूतेषु न मे द्वेष्यो~स्ति न प्रियः ।

ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम् ॥ २९॥

तो मी पुससी कैसा । तरि जो सर्वभूतीं सदा सरिसा ।

जेथ आपपरु ऐसा । भागु नाहीं ॥ ४०७ ॥

जे ऐसिया मातें जाणोनि । अहंकाराचा कुरुठा मोडोनि ।

जे जीवें कर्में करूनि । मातें भजलें ॥ ४०८ ॥

ते वर्तत दिसती देहीं । परि ते देहीं ना माझ्या ठायीं ।

आणि मी तयांच्या हृदयीं । समग्र असे ॥ ४०९ ॥

सविस्तर वटत्व जैसें । बीजकणिकेमाजीं असे ।

आणि बीजकणु वसे । वटीं जेवीं ॥ ४१० ॥

तेवीं आम्हां तयां परस्परें । बाहेरी नामाचींचि अंतरें ।

वांचूनि आंतुवट वस्तुविचारें । मी तेचि ते ॥ ४११ ॥

आतां जायांचें जैसें लेणें । आंगावरी आहाचवाणें ।

तैसें देहधरणें । उदास तयांचें ॥ ४१२ ॥

परिमळु निघालिया पवनापाठीं । मागें वोस फूल राहे देंठीं ।

तैसें आयुष्याचिये मुठी । केवळ देह ॥ ४१३ ॥

येर अवष्टंभु जो आघवा । तो आरूढोनि मद्‍भावा ।

मजचि आंतु पांडवा । पैठा जाहला ॥ ४१४ ॥

अपि चेत् सुदुराचारो भजते मामनन्यभाक् ।

साधुरेव स मन्तव्यः सम्यग्व्यवसितो हि सः ॥ ३०॥

ऐसे भजतेनि प्रेमभावें । जयां शरीरही पाठीं न पवे ।

तेणें भलतया व्हावें । जातीचिया ॥ ४१५ ॥

आणि आचरण पाहतां सुभटा । तो दुष्कृताचा कीर सेल वांटा ।

परि जीवित वेंचिलें चोहटां । भक्तीचिया कीं ॥ ४१६ ॥

अगा अंतींचिया मती । साचपण पुढिले गती ।

म्हणौनि जीवित जेणें भक्ती । दिधलें शेखीं ॥ ४१७ ॥

तो आधीं जरी दुराचारी । तरी सर्वोत्तमुचि अवधारीं ।

जैसा बुडाला महापुरीं । न मरतु निघाला ॥ ४१८ ॥

तयाचें जीवित ऐलथडिये आलें । म्हणौनि बुडालेपण जेवीं वायां गेलें ।

तेवीं नुरेचि पाप केलें । शेवटलिये भक्ती ॥ ४१९ ॥

यालागीं दुष्कृती जर्‍ही जाहाला । तरी अनुतापतीर्थीं न्हाला ।

न्हाऊनि मजआंतु आला । सर्वभावें ॥ ४२० ॥

तरी आतां पवित्र तयाचेंचि कुळ । अभिजात्य तेंचि निर्मळ ।

जन्मलेयाचें फळ । तयासीच जोडलें ॥ ४२१ ॥

तो सकळही पढिन्नला । तपें तोचि तपिन्नला ।

अष्टांग अभ्यासिला । योगु तेणें ॥ ४२२ ॥

हें असो बहुत पार्था । तो उतरला कर्में सर्वथा ।

जयाची अखंड गा आस्था । मजचिलागीं ॥ ४२३ ॥

अवघिया मनोबुद्धीचिया राहटी । भरोनि एकनिष्ठेची पेटी ।

मजमाजीं किरीटी । निक्षेपिलीं जेणें ॥ ४२४ ॥

क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं निगच्छति ।

कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति ॥ ३१॥

तो आतां अवसरें मजसारिखा होईल । ऐसा हन भाव तुज जाईल ।

हां गा अमृताआंत राहील । तया मरण कैचें ? ॥ ४२५ ॥

पैं सूर्यु जो वेळु नुदैजे । तया वेळा कीं रात्रि म्हणिजे ।

तेवीं माझिये भक्तीविण जें कीजे । तें महापाप नोहें ? ॥ ४२६ ॥

म्हणौनि तयाचिया चित्ता । माझी जवळिक पंडुसुता ।

तेव्हांचि तो तत्त्वता । स्वरूप माझें ॥ ४२७ ॥

जैसा दीपें दीपु लाविजे । तेथ आदील कोण हें नोळखिजे ।

तैसा सर्वस्वें जो मज भजे । तो मीचि होऊनि ठाके ॥ ४२८ ॥

मग माझी नित्य शांती । तया दशा तेचि कांती ।

किंबहुना जिती । माझेनि जीवें ॥ ४२९ ॥

एथ पार्था पुढतपुढती । तेंचि तें सांगों किती ।

जरी मियां चाड तरी भक्ती । न विसंबिजे गा ॥ ४३० ॥

अगा कुळाचिया चोखटपणा नलगा । आभिजात्य झणीं श्लाघा ।

व्युत्पत्तीचा वाउगा । सोसु कां वहावा ? ॥ ४३१ ॥

कां रूपवयसा माजा । आथिलेपणें कां गाजा ? ।

एक भाव नाहीं माझा । तरी पाल्हाळ तें ॥ ४३२ ॥

कणेंविण सोपटें । कणसें लागलीं घनदाटें ।

काय करावें गोमटें । वोस नगर ? ॥ ४३३ ॥

नातरी सरोवर आटलें । रानीं दुःखिया दुःखी भेटलें ।

कां वांझ फुलीं फुललें । झाड जैसें ॥ ४३४ ॥

तैसें सकळ तें वैभव । अथवा कुळ जाति गौरव ।

जैसें शरीर आहे सावेव । परि जीवचि नाहीं ॥ ४३५ ॥

तैसें माझिये भक्तीविण । जळो तें जियालेंपण ।

अगा पृथ्वीवरी पाषाण । नसती काईं ? ॥ ४३६ ॥

पैं हिंवराची दाट साउली । सज्जनीं जैसी वाळिली ।

तैसीं पुण्यें डावलूनि गेलीं । अभक्तांतें ॥ ४३७ ॥

निंब निंबोळियां मोडोनि आला । तरी तो काउळियांसीचि सुकाळु जाहला ।

तैसा भक्तिहीनु वाढिन्नला । दोषांचिलागीं ॥ ४३८ ॥

कां षड्रस खापरीं वाढिले । वाढूनि चोहटां ठेविले ।

ते सुणियांचेचि ऐसे झाले । जियापरी ॥ ४३९ ॥

तैसें भक्तिहीनाचें जिणें । जो स्वप्नींहि परि सुकृत नेणे ।

संसारदुःखासि भाणें । वोगरिलें ॥ ४४० ॥

म्हणौनि कुळ उत्तम नोहावें । जाती अंत्यजहि व्हावें ।

वरि देहाचेनि नांवें । पशूचेंहि लाभो ॥ ४४१ ॥

पाहें पां सावजें हातिरूं धरिलें । तेणें तया काकुळती मातें स्मरिलें ।

कीं तयाचें पशुत्व वावो जाहलें । पावलिया मातें ॥ ४४२ ॥

मां हि पार्थ व्यपाश्रित्य ये~पि स्युः पापयोनयः ॥

स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्ते~पि यान्ति परां गतिम् ॥ ३२॥

अगा नांवें घेतां वोखटीं । जे आघवेया अधमांचिये शेवटीं ।

तिये पापयोनींही किरीटी । जन्मले जे ॥ ४४३ ॥

ते पापयोनि मूढ । मूर्ख जैसे कां दगड ।

परि माझ्यां ठायीं दृढ । सर्वभावें ॥ ४४४ ॥

जयांचिये वाचें माझे आलाप । दृष्टी भोगी माझेंचि रूप ।

जयांचें मन संकल्प । माझाचि वाहे ॥ ४४५ ॥

माझिया कीर्तीविण । जयांचे रिते नाहीं श्रवण ।

जयां सर्वांगीं भूषण । माझी सेवा ॥ ४६ ॥

जयांचे ज्ञान विषो नेणे । जाणीव मज एकातेंचि जाणे ।

जया ऐसें लाभे तरी जिणें । एर्‍हवीं मरण ॥ ४४७ ॥

ऐसा आघवाचि परी पांडवा । जिहीं आपुलिया सर्वभावा ।

जियावयालागीं वोलावा । मीचि केला ॥ ४४८ ॥

ते पापयोनीही होतु कां । ते श्रुताधीतही न होतु कां ।

परि मजसीं तुकितां तुकां । तुटी नाहीं ॥ ४४९ ॥

पाहें पां भक्तीचेनि आथिलेपणें । दैत्यीं देवां आणिलें उणें ।

माझें नृसिंहत्व लेणें । जयाचिये महिमें ॥ ४५० ॥

तो प्रल्हादु गा मजसाठीं । घेतां बहुतें संकटे सदा किरीटी ।

कां जें मियां द्यावें ते गोष्टी । तयाचिया जोडे ॥ ४५१ ॥

एर्‍हवीं दैत्यकुळ साचोकारें । परि इंद्रही सरी न लाहे उपरें ।

म्हणौनि भक्ति गा एथ सरे । जाति अप्रमाण ॥ ४५२ ॥

राजाज्ञेचीं अक्षरें आहाती । तियें चामा एका जया पडती ।

तया चामासाठीं जोडती । सकळ वस्तु ॥ ४५३ ॥

वांचूनि सोनें रुपें प्रमाण नोहे । एथ राजाज्ञाचि समर्थ आहे ।

तेंचि चाम एक जैं लाहे । तेणें विकती आघवीं ॥ ४५४ ॥

तैसें उत्तमत्व तैंचि तरे । तैंचि सर्वज्ञता सरे ।

जैं मनोबुद्धि भरे । माझेनि प्रेमें ॥ ४५५ ॥

म्हणौनि कुळ जाति वर्ण । हें आघवेंचि गा अकारण ।

एथ अर्जुना माझेपण । सार्थक एक ॥ ४५६ ॥

तेंचि भलतेणें भावें । मन मज आंतु येतें होआवें ।

आलें तरी आघवें । मागील वावो ॥ ४५७ ॥

जैसें तंवचि वहाळ वोहळ । जंव न पवती गंगाजळ ।

मग होऊनि ठाकती केवळ । गंगारूप ॥ ४५८ ॥

कां खैर चंदन काष्ठें । हे विवंचना तंवचि घटे ।

जंव न घापती एकवटे । अग्नीमाजीं ॥ ४५९ ॥

तैसे क्षत्री वैश्य स्त्रिया । कां शूद्र अंत्यजादि इया ।

जाती तंवचि वेगळालिया । जंव न पवती मातें ॥ ४६० ॥

मग जाती व्यक्ती पडे बिंदुलें । जेव्हां भावें होती मज मीनलें ।

जैसे लवणकण घातले । सागरामाजीं ॥ ४६१ ॥

तंववरी नदानदींचीं नांवें । तंवचि पूर्वपश्चिमेचे यावे ।

जंव न येती आघवे । समुद्रामाजीं ॥ ४६२ ॥

हेंचि कवणें एकें मिसें । चित्त माझे ठायीं प्रवेशे ।

येतुलें हो मग आपैसें । मीचि होणें असे ॥ ४६३ ॥

अगा वरी फोडावयाचि लागीं । लोहो मिळो कां परिसाचे आंगीं ।

कां जे मिळतिये प्रसंगी । सोनेंचि होईल ॥ ४६४ ॥

पाहें पां वालभाचेनि व्याजें । तिया व्रजांगनांचीं निजें ।

मज मीनलिया काय माझें । स्वरूप नव्हती ? ॥ ६५ ॥

नातरी भयाचेनि मिसें । मातें न पविजेचि काय कंसें ? ।

कीं अखंड वैरवशें । चैद्यादिकीं ॥ ४६६ ॥

अगा सोयरेपणेंचि पांडवा । माझें सायुज्य यादवां ।

कीं ममत्वें वसुदेवा- । दिकां सकळां ॥ ४६७ ॥

नारदा ध्रुवा अक्रूरा । शुका हन सनत्कुमारा ।

यां भक्तीं मी धनुर्धरा । प्राप्यु जैसा ॥ ४६८ ॥

तैसाचि गोपीकांसि कामें । तया कंसा भयसंभ्रमें ।

येरां घातकां मनोधर्में । शिशुपालादिकां ॥ ४६९ ॥

अगा मी एकुलाणीचें खागें । मज येवों पां भलतेनि मार्गें ।

भक्ती कां विषयविरागें । अथवा वैरें ॥ ४७० ॥

म्हणौनि पार्था पाहीं । प्रवेशावया माझ्या ठायीं ।

उपायांची नाहीं । वाणी एथ ॥ ४७१ ॥

आणि भलतिया जातीं जन्मावें । मग भजिजे कां विरोधावें ।

परि भक्त कां वैरिया व्हावें । माझियाचि ॥ ४७२ ॥

अगा कवणें एकें बोलें । माझेपण जर्‍ही जाहालें ।

तरी मी होणें आलें । हाता निरुतें ॥ ४७३ ॥

यालागीं पापयोनीही अर्जुना । कां वैश्य शूद्र अंगना ।

मातें भजतां सदना । माझिया येती ॥ ४७४ ॥

किं पुनर्ब्राह्मणाः पुण्या भक्ता राजर्षयस्तथा ।

अनित्यमसुखं लोकमिमं प्राप्य भजस्व माम् ॥ ३३॥

मग वर्णांमाजीं छत्रचामर । स्वर्ग जयांचें अग्रहार ।

मंत्रविद्येसि माहेर । ब्राह्मण जे ॥ ४७५ ॥

जे पृथ्वीतळींचें देव । जे तपोवतार सावयव ।

सकळ तीर्थांसि दैव । उदयलें जें ॥ ४७६ ॥

जेथ अखंड वसिजे यागीं । जे वेदांची वज्रांगी ।

जयांचेनि दिठीचिया उत्संगीं । मंगळ वाढे ॥ ४७७॥

जयांचिये आस्थेचेनि वोलें । सत्कर्म पाल्हाळीं गेलें ।

संकल्पें सत्य जियालें । जियांचेनि ॥ ४७८ ॥

जयांचेनि गा बोलें । अग्नीसि आयुष्य जाहालें ।

म्हणौनि समुद्रें पाणी आपुलें । दिधलें यांचिया प्रीती ॥ ४७९ ॥

मियां लक्ष्मी डावलोनि केली परौती । फेडोनि कौस्तुभ घेतला हातीं ।

मग वोढविली वक्षस्थळाची वाखती । चरणरजां ॥ ४८० ॥

आझुनि पाउलाची मुद्रा । मी हृदयीं वाहें गा सुभद्रा ।

जे आपुलिया दैवसमुद्रा । जतनेलागीं ॥ ४८१ ॥

जयांचा कोप सुभटा । काळाग्निरुद्राचा वसौटा ।

जयांचे प्रसादीं फुकटा । जोडती सिद्धी ॥ ४८२ ॥

ऐसे पुण्यपूज्य जे ब्राह्मण । आणि माझ्या ठायीं अतिनिपुण ।

आतां मातें पावती हे कवण । समर्थावें ? ॥ ४८३ ॥

पाहें पां चंदनाचेनि अंगानिळें । शिवतिले निंब होते जे जवळें ।

तिहीं निर्जिवींही देवांचीं निडळें । बैसणीं केलीं ॥ ४८४ ॥

मग तो चंदनु तेथ न पवे । ऐसें मनीं कैसेनि धरावें ।

अथवा पातला हें समर्थावें । तेव्हां कायी साच ? ॥ ४८५ ॥

जेथ निववील ऐशिया आशा । हरें चंद्रमा आधा ऐसा ।

वाहिजत असे शिरसा । निरंतर ॥ ४८६ ॥

तेथ निवविता आणि सगळा । परिमळें चंद्राहूनि आगळा ।

तो चंदनु केवीं अवलीळा । सर्वांगीं न बैसे ? ॥ ४८७ ॥

कां रथ्योदकें जियेचिये कासे । लागलिया समुद्र जालीं अनायासें ।

तिये गंगेसि काय अनारिसें । गत्यंतर असे ? ॥ ४८८ ॥

म्हणौनि राजर्षि कां ब्राह्मण । जयां गति मति मीचि शरण्य ।

तयां त्रिशुद्धी मीच निर्वाण । स्थितीही मीचि ॥ ४८९ ॥

यालागीं शतजर्जर नावें । रिगोनि केवीं निश्चिंत होआवें ।

कैसेनि उघडिया असावें । शस्त्रवर्षीं ॥ ४९० ॥

आंगावरी पडतां पाषाण । न सुवावें केवीं वोडण ।

रोगें दाटला आणि उदासपण । वोखदेंसी ? ॥ ४९१ ॥

जेथ चहूंकडे जळत वणवा । तेथूनि न निगिजे केवीं पांडवा ।

तेवीं लोकां येऊनि सोपद्रवां । केवीं न भजिजे मातें ॥ ४९२ ॥

अगा मातें न भजावयालागीं । कवण बळ पां आपुलिया आंगीं ।

काई घरीं कीं भोगी । निश्चिंती केलीं ? ॥ ४९३ ॥

नातरी विद्या कीं वयसा । ययां प्राणियांसि हा ऐसा ।

मज न भजतां भरंवसा । सुखाचा कोण ? ॥ ४९४ ॥

तरी भोग्यजात जेतुलें । तें एका देहाचिया निकिया लागलें ।

आणि एथ देह तंव असे पडिलें । काळाचिये तोंडीं ॥ ४९५ ॥

बाप दुःखाचें केणें सुटलें । जेथ मरणाचे भरे लोटले ।

तिये मृत्युलोकींचिये शेवटिलें । येणें जाहालें हाटवेळे ॥ ४९६ ॥

आंता सुखेंसि जीविता । कैंचीं ग्राहिकी किजेल पंडुसुता ।

काय राखोंडी फुंकितां । दीपु लागे ? ॥ ४९७ ॥

अगा विषाचे कांदे वाटुनी । जो रसु घेईजे पिळुनी ।

तया नाम अमृत ठेवुनी । जैसें अमर होणें ॥ ४९८ ॥

तेवीं विषयांचें जें सुख । तें केवळ परम दुःख ।

परि काय कीजे मूर्ख । न सेवितां न सरे ॥ ४९९ ॥

कां शीस खांडूनि आपुलें । पायींच्या खतीं बांधिलें ।

तैसें मृत्युलोकींचें भलें । आहे आघवें ॥ ५०० ॥

म्हणौनि मृत्युलोकीं सुखाची कहाणी । ऐकिजेल कवणाचिये श्रवणीं ।

कैंची सुखनिद्रा अंथरुणीं । इंगळांच्या ॥ ५०१ ॥

जिये लोकींचा चंद्र क्षयरोगी । जेथ उदयो होय अस्तालागीं ।

दुःख लेऊनि सुखाची आंगीं । सळित जगातें ॥ ५०२ ॥

जेथ मंगळाचिया अंकुरीं । सवेंचि अमंगळाची पडे पोहरी ।

मृत्यु उदराचिया परिवरी । गर्भु गिंवसी ॥ ५०३ ॥

जें नाहीं तयातें चिंतवी । तंव तेंचि नेइजे गंधर्वीं ।

गेलियाची कवणें गांवीं । शुद्धी न लगे ॥ ५०४ ॥

अगा गिंवसितां आघविया वाटी । परतलें पाऊलचि नाहीं किरीटी ।

सैंघ निमालियांचिया गोठी । तियें पुराणें जेथिंचीं ॥ ५०५ ॥

जेथिंचिये अनित्यतेची थोरी । करितया ब्रह्मयाचे आयुष्यवेरी ।

कैसें नाहीं होणें अवधारीं । निपटूनियां ॥ ५०६ ॥

ऐसी लोकींची जिये नांदणूक । तेथ जन्मले आथि जे लोक ।

तयांचिये निश्चिंतीचें कौतुक । दिसत असे ॥ ५०७ ॥

पैं दृष्टादृष्टाचिये जोडी- । लागीं भांडवल न सुटे कवडी ।

जेथ सर्वस्वें हानि तेथ कोडी । वेंचिती गा ॥ ५०८ ॥

जो बहुवें विषयविलासें गुंफे । तो म्हणती उवाईं पडिला सापें ।

जो अभिलाषभारें दडपे । तयातें सज्ञान म्हणती ॥ ५०९ ॥

जयाचें आयुष्य धाकुटें होय । बळ प्रज्ञा जिरौनि जाय ।

तयाचे नमस्कारिती पाय । वडील म्हणुनी ॥ ५१० ॥

जंव जंव बाळ बळिया वाढे । तंव तंव भोजे नाचती कोडें ।

आयुष्य निमालें आंतुलियेकडे । ते ग्लानीचि नाहीं ॥ ५११ ॥

जन्मलिया दिवसदिवसें । हों लागे काळाचेंचि ऐसें ।

कीं वाढती करिती उल्हासें । उभविती गुढिया ॥ ५१२ ॥

अगा मर हा बोलु न साहती । आणि मेलिया तरी रडती ।

परि असतें जात न गणिती । गहिंसपणें ॥ ५१३ ॥

दर्दूर सापें गिळिजतु आहे उभा । कीं तो मासिया वेंटाळी जिभा ।

तैसें प्राणिये कवणा लोभा । वाढविती तृष्णा ॥ ५१४ ॥

अहा कटकटा हें वोखटें । इये मृत्युलोकींचें उफराटें ।

एथ अर्जुना जरी अवचटें । जन्मलासी तूं ॥ ५१५ ॥

तरि झडझडोनि वहिला निघ । इये भक्तीचिये वाटे लाग ।

जिया पावसी अव्यंग । निजधाम माझें ॥ ५१६ ॥

मन्मना भव मद्‍भक्तो मद्याजी मां नमस्कुरु ।

मामेवैष्यसि युक्‍त्वैवमात्मानं मत्परायणः ॥ ३४॥

ॐ तत्सदिति श्रीमद्‍भ्गवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे

श्रीकृष्णार्जुनसंवादे राजविद्याराजगुह्ययोगो नाम नवमोऽध्यायः ॥ ९ ॥

तूं मन हें मीचि करीं । माझिया भजनीं प्रेम धरीं ।

सर्वत्र नमस्कारीं । मज एकातें ॥ ५१७ ॥

माझेनि अनुसंधानें देख । संकल्पु जाळणें निःशेख ।

मद्याजी चोख । याचि नांव ॥ ५१८ ॥

ऐसा मियां आथिला होसी । तेथ माझियाचि स्वरूपा पावसी ।

हें अंतःकरणींचें तुजपासीं । बोलिजत असें ॥ ५१९ ॥

अगा अवघिया चोरिया आपुलें । जें सर्वस्व आम्हीं असें ठेविलें ।

तें पावोनि सुख संचलें । होऊनि ठासी ॥ ५२० ॥

ऐसें सांवळेनि परब्रह्में । भक्तकामकल्पद्रुमें ।

बोलिलें आत्मारामें । संजयो म्हणे ॥ ५२१ ॥

अहो ऐकिजत असें कीं अवधारा । तंव इया बोला निवांत म्हातारा ।

जैसा म्हैसा नुठी कां पुरा । तैसा उगाचि असे ॥ ५२२ ॥

तेथ संजयें माथा तुकिला । अहा अमृताचा पाऊस वर्षला ।

कीं हा एथ असतुचि गेला । सेजिया गांवा ॥ ५२३ ॥

तर्‍ही दातारु हा आमुचा । म्हणौनि हें बोलतां मैळेल वाचा ।

काय कीजे ययाचा । स्वभावोचि ऐसा ॥ ५२४ ॥

परि बाप भाग्य माझें । जे वृत्तांतु सांगावयाचेनि व्याजें ।

कैसा रक्षिलों मुनिराजें । श्रीव्यासदेवें ॥ ५२५ ॥

येतुलें हें वाड सायासें । जंव बोलत असे दृढमानसें ।

तंव न धरवेचि आपुलिया ऐसें । सात्त्विकें केलें ॥ ५२६ ॥

चित्त चाकाटलें आटु घेत । वाचा पांगुळली जेथिंची तेथ ।

आपाद कंचुकित । रोमांच आले ॥ ५२७ ॥

अर्धोन्मीलित डोळे । वर्षताति आनंदजळें ।

आंतुलिया सुखोर्मींचेनि बळें । बाहेरी कांपे ॥ ५२८ ॥

पैं आघवाचि रोममूळीं । आली स्वेदकणिका निर्मळी ।

लेइला मोतियांची कडियाळीं । आवडे तैसा ॥ ५२९ ॥

ऐसा महासुखाचेनि अतिरसें । जेथ आटणी हों पाहे जीवदशे ।

तेथ निरोपिलें व्यासें । तें नेदीच हों ॥ ५३० ॥

आणिक श्रीकृष्णाचें बोलणें । घोकरी आलें श्रवणें ।

कीं देहस्मृतीचा तेणें । वापसा केला ॥ ५३१ ॥

तेव्हां नेत्रींचें जळ विसर्जी । सर्वांगींचा स्वेदु परिमार्जीं ।

तेवींचि अवधारा म्हणे हो जी । धृतराष्ट्रातें ॥ ५३२ ॥

आतां श्रीकृष्णवाक्यबीजा निवाडु । आणि संजय सात्त्विकाचा बिवडु ।

म्हणौनि श्रोतयां होईल सुरवाडु । प्रमेय पिकाचा ॥ ५३३ ॥

अहो अळुमाळ अवधान देयावें । येतुलेनि आनंदाचे राशीवरी बैसावें ।

बाप श्रवणेंद्रिया दैवें । घातली माळ ॥ ५३४ ॥

म्हणौनि विभूतींचा ठावो । अर्जुना दावील सिद्धांचा रावो ।

तो ऐका म्हणे ज्ञानदेवो । निवृत्तीचा ॥ ५३५ ॥

इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां नवमोऽध्यायः ॥

No comments:

Post a Comment