Tuesday, May 5, 2009

अध्याय अकरावा । ।

। विश्वरूपदर्शनयोगः ।

आतां यावरी एकादशीं । कथा आहे दोहीं रसीं ।

येथ पार्था विश्वरूपेंसीं । होईल भेटी ॥ १ ॥

जेथ शांताचिया घरा । अद्भुत आला आहे पाहुणेरा ।

आणि येरांही रसां पांतिकरां । जाहला मानु ॥ २ ॥

अहो वधुवरांचिये मिळणीं । जैशी वराडियां लुगडीं लेणीं ।

तैसे देशियेच्या सुखासनीं । मिरविले रस ॥ ३ ॥

परी शांताद्‍भुत बरवे । जे डोळियांच्या अंजुळीं घ्यावें ।

जैसे हरिहर प्रेमभावें । आले खेंवा ॥ ४ ॥

ना तरी अंवसेच्या दिवशीं । भेटलीं बिंबें दोनी जैशीं ।

तेवीं एकवळा रसीं । केला एथ ॥ ५ ॥

मीनले गंगेयमुनेचे ओघ । तैसें रसां जाहलें प्रयाग ।

म्हणौनि सुस्नात होत जग । आघवें एथ ॥ ६ ॥

माजीं गीता सरस्वती गुप्त । आणि दोनी रस ते ओघ मूर्त ।

यालागीं त्रिवेणी हे उचित । फावली बापा ॥ ७ ॥

एथ श्रवणाचेनि द्वारें । तीर्थीं रिघतां सोपारें ।

ज्ञानदेवो म्हणे दातारें । माझेनि केलें ॥ ८ ॥

तीरें संस्कृताचीं गहनें । तोडोनि मर्‍हाठियां शब्दसोपानें ।

रचिली धर्मनिधानें । श्रिइनिवृत्तिदेवें ॥ ९ ॥

म्हणौनि भलतेणें एथ सद्‍भावें नाहावें । प्रयागमाधव विश्वरूप पहावें ।

येतुलेनि संसारासि द्यावें । तिळोदक ॥ १० ॥

हें असो ऐसें सावयव । एथ सासिन्नले आथी रसभाव ।

तेथ श्रवणसुखाची राणीव । जोडली जगा ॥ ११ ॥

जेथ शांताद्‍भुत रोकडे । आणि येरां रसां पडप जोडे ।

हें अल्पचि परी उघडें । कैवल्य एथ ॥ १२ ॥

तो हा अकरावा अध्यायो । जो देवाचा आपणपें विसंवता ठावो ।

परी अर्जुन सदैवांचा रावो । जो एथही पातला ॥ १३ ॥

एथ अर्जुनचि काय म्हणों पातला । आजि आवडतयाही सुकाळु जाहला ।

जे गीतार्थु हा आला । मर्‍हाठिये ॥ १४ ॥

याचिलागीं माझें । विनविलें आइकिजे ।

तरी अवधान दीजे । सज्जनीं तुम्ही ॥ १५ ॥

तेवींचि तुम्हां संतांचिये सभे । ऐसी सलगी कीर करूं न लभे ।

परी मानावें जी तुम्ही लोभें । अपत्या मज ॥ १६ ॥

अहो पुंसा आपणचि पढविजे । मग पढे तरी माथा तुकिजे ।

कां करविलेनि चोजें न रिझे । बाळका माय ॥ १७ ॥

तेवीं मी जें जें बोलें । तें प्रभु तुमचेंचि शिकविलें ।

म्हणौनि अवधारिजो आपुलें । आपण देवा ॥ १८ ॥

हें सारस्वताचें गोड । तुम्हींचि लाविलें जी झाड ।

तरी आतां अवधानामृतें वाड । सिंपोनि कीजे ॥ १९ ॥

मग हें रसभाव फुलीं फुलेल । नानार्थ फळभारें फळा येईल ।

तुमचेनि धर्में होईल । सुरवाडु जगा ॥ २० ॥

या बोला संत रिझले । म्हणती तोषलों गा भलें केलें ।

आतां सांगैं जें बोलिलें । अर्जुनें तेथ ॥ २१ ॥

तंव निवृत्तिदास म्हणे । जी कृष्णार्जुनांचें बोलणें ।

मी प्राकृत काय सांगों जाणें । परी सांगवा तुम्ही ॥ २२ ॥

अहो रानींचिया पालेखाइरा । नेवाणें करविले लंकेश्वरा ।

एकला अर्जुन परी अक्षौहिणी अकरा । न जिणेचि काई ? ॥ २३ ॥

म्हणौनि समर्थ जें जें करी । तें न हो न ये चराचरीं ।

तुम्ही संत तयापरी । बोलवा मातें ॥ २४ ॥

आतां बोलिजतसें आइका । हा गीताभाव निका ।

जो वैकुंठनायका- । मुखौनि निघाला ॥ २५ ॥

बाप बाप ग्रंथ गीता । जो वेदीं प्रतिपाद्य देवता ।

तो श्रीकृष्ण वक्ता । जिये ग्रंथीं ॥ २६ ॥

तेथिंचे गौरव कैसें वानावें । जें श्रीशंभूचिये मती नागवे ।

तें आतां नमस्कारिजे जीवेंभावें । हेंचि भलें ॥ २७ ॥

मग आइका तो किरीटी । घालूनि विश्वरूपीं दिठी ।

पहिली कैसी गोठी । करिता जाहला ॥ २८ ॥

हें सर्वही सर्वेश्वरु । ऐसा प्रतीतिगत जो पतिकरु ।

तो बाहेरी होआवा गोचरु । लोचनांसी ॥ २९ ॥

हे जिवाआंतुली चाड । परी देवासि सांगतां सांकड ।

कां जें विश्वरूप गूढ । कैसेनि पुसावें ? ॥ ३० ॥

म्हणे मागां कवणीं कहीं । जें पढियंतेनें पुसिलें नाहीं ।

ते सहसा कैसें काई । सांगा म्हणों ? ॥ ३१ ॥

मी जरी सलगीचा चांगु । तरी काय आइसीहूनी अंतरंगु ।

परी तेही हा प्रसंगु । बिहाली पुसों ॥ ३२ ॥

माझी आवडे तैसी सेवा जाहली । तरी काय होईल गरुडाचिया येतुली ? ।

परी तोही हें बोली । करीचिना ॥ ३३ ॥

मी काय सनकादिकांहूनि जवळां । परी तयांही नागवेचि हा चाळा ।

मी आवडेन काय प्रेमळां । गोकुळींचिया ऐसा ? ॥ ३४ ॥

तयांतेंही लेकुरपणें झकविलें । एकाचे गर्भवासही साहिले ।

परी विश्वरूप हें राहविलें । न दावीच कवणा ॥ ३५ ॥

हा ठायवरी गुज । याचिये अंतरीचें हें निज ।

केवीं उराउरी मज । पुसों ये पां ? ॥ ३६ ॥

आणि न पुसेंचि जरी म्हणे । तरी विश्वरूप देखिलियाविणें ।

सुख नोहेचि परी जिणें । तेंही विपायें ॥ ३७ ॥

म्हणौनि आतां पुसों अळुमाळसें । मग करूं देवा आवडे तैसें ।

येणें प्रवर्तला साध्वसें । पार्थु बोलों ॥ ३८ ॥

परी तेंचि ऐसेनि भावें । जें एका दों उत्तरांसवें ।

दावी विश्वरूप आघवें । झाडा देउनी ॥ ३९ ॥

अहो वांसरूं देखिलियाचिसाठीं । धेनु खडबडोनि मोहें उठी ।

मग स्तनामुखाचिये भेटी । काय पान्हा धरे ? ॥ ४० ॥

पाहा पां तया पांडवाचेनि नांवें । जो कृष्ण रानींही प्रतिपाळूं धावे ।

तयांतें अर्जुनें जंव पुसावें । तंव साहील काई ? ॥ ४१ ॥

तो सहजेंचि स्नेहाचें अवतरण । आणि येरु स्नेहा घातलें आहे माजवण ।

ऐसिये मिळवणी वेगळेपण । उरे हेंचि बहु ॥ ४२ ॥

म्हणौनि अर्जुनाचिया बोलासरिसा । देव विश्वरूप होईल आपैसा ।

तोचि पहिला प्रसंगु ऐसा । ऐकिजे तरी ॥ ४३ ॥

अर्जुन उवाच ।

मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसंज्ञितम् ।

यत्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम ॥ १॥

मग पार्थु देवातें म्हणे । जी तुम्ही मजकारणें ।

वाच्य केलें जें न बोलणें । कृपानिधे ॥ ४४ ॥

जैं महाभूतें ब्रह्मीं आटती । जीव महदादींचे ठाव फिटती ।

तैं जें देव होऊनि ठाकती । तें विसवणें शेषींचें ॥ ४५ ॥

होतें हृदयाचिये परिवरीं । रोंविलें कृपणाचिये परी ।

शब्दब्रह्मासही चोरी । जयाची केली ॥ ४६ ॥

तें तुम्हीं आजि आपुलें । मजपुढां हियें फोडिलें ।

जया अध्यात्मा वोवाळिलें । ऐश्वर्य हरें ॥ ४७ ॥

ते वस्तु मज स्वामी । एकिहेळां दिधली तुम्ही ।

हें बोलों तरी आम्ही । तुज पावोनि कैंचे ॥ ४८ ॥

परी साचचि महामोहाचिये पुरीं । बुडालेया देखोनि सीसवरी ।

तुवां आपणपें घालोनि श्रीहरी । मग काढिलें मातें ॥ ४९ ॥

एक तूंवांचूनि कांहीं । विश्वीं दुजियाची भाष नाहीं ।

कीं आमुचें कर्म पाहीं । जे आम्हीं आथी म्हणों ॥ ५० ॥

मी जगीं एक अर्जुनु । ऐसा देहीं वाहे अभिमानु ।

आणि कौरवांतें इयां स्वजनु । आपुलें म्हणें ॥ ५१ ॥

याहीवरी यांतें मी मारीन । म्हणें तेणें पापें कें रिगेन ।

ऐसें देखत होतों दुःस्वप्न । तों चेवविला प्रभु ॥ ५२ ॥

देवा गंधर्वनगरीची वस्ती । सोडूनि निघालों लक्ष्मीपती ।

होतों उदकाचिया आर्ती । रोहिणी पीत ॥ ५३ ॥

जी किरडूं तरी कापडाचें । परी लहरी येत होतिया साचें ।

ऐसें वायां मरतया जीवाचें । श्रेय तुवां घेतलें ॥ ५४ ॥

आपुलें प्रतिबिंब नेणता । सिंह कुहां घालील देखोनि आतां ।

ऐसा धरिजे तेवीं अनंता । राखिलें मातें ॥ ५५ ॥

एर्‍हवीं माझा तरी येतुलेवरी । एथ निश्चय होता अवधारीं ।

जें आतांचि सातांही सागरीं । एकत्र मिळिजे ॥ ५६ ॥

हें जगचि आघवें बुडावें । वरी आकाशहि तुटोनि पडावें ।

परी झुंजणें न घडावें । गोत्रजेशीं मज ॥ ५७ ॥

ऐसिया अहंकाराचिये वाढी । मियां आग्रहजळीं दिधली होती बुडी ।

चांगचि तूं जवळां एर्‍हवीं काढी । कवणु मातें ॥ ५८ ॥

नाथिलें आपण पां एक मानिलें । आणि नव्हतया नाम गोत्र ठेविलें ।

थोर पिसें होतें लागलें । परि राखिलें तुम्ही ॥ ५९ ॥

मागां जळत काढिलें जोहरीं । तैं तें देहासीच भय अवधारीं ।

आतां हे जोहरवाहर दुसरी । चैतन्यासकट ॥ ६० ॥

दुराग्रह हिरण्याक्षें । माझी बुद्धि वसुंधरा सूदली काखे ।

मग माहार्णव गवाक्षें । रिघोनि ठेला ॥ ६१ ॥

तेथ तुझेनि गोसावीपणें । एकवेळ बुद्धीचिया ठाया येणें ।

हें दुसरें वराह होणें । पडिलें तुज ॥ ६२ ॥

ऐसें अपार तुझें केलें । एकी वाचा काय मी बोलें ।

परी पांचही पालव मोकलिले । मजप्रती ॥ ६३ ॥

तें कांहीं न वचेचि वायां । भलें यश फावलें देवराया ।

जे साद्यंत माया । निरसिली माझी ॥ ६४ ॥

आजीं आनंदसरोवरींचीं कमळें । तैसे हे तुझे डोळे ।

आपुलिया प्रसादाचीं राउळें । जयालागीं करिती ॥ ६५ ॥

हां हो तयाही आणि मोहाची भेटी । हे कायसी पाबळी गोठी ? ।

केउती मृगजळाची वृष्टी । वडवानळेंसीं ? ॥ ६६ ॥

आणि मी तंव दातारा । ये कृपेचिये रिघोनि गाभारां ।

घेत आहें चारा । ब्रह्मरसाचा ॥ ६७ ॥

तेणें माझा जी मोह जाये । एथ विस्मो कांहीं आहे ? ।

तरी उद्धरलों कीं तुझे पाये । शिवतले आहाती ॥ ६८ ॥

भवाप्ययौ हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया ।

त्वत्तः कमलपत्राक्ष माहात्म्यमपि चाव्ययम् ॥ २॥

पैं कमलायतडोळसा । सूर्यकोटितेजसा ।

मियां तुजपासोनि महेशा । परिसिलें आजीं ॥ ६९ ॥

इयें भूतें जयापरी होती । अथवा लया हन जैसेनि जाती ।

ते मजपुढां प्रकृती । विवंचिली देवें ॥ ७० ॥

आणि प्रकृती कीर उगाणा दिधला । वरि पुरुषाचाही ठावो दाविला ।

जयाचा महिमा पांघरोनि जाहला । धडौता वेदु ॥ ७१ ॥

जी शब्दराशी वाढे जिये । कां धर्मा{ऐ}शिया रत्‍नांतें विये ।

ते एथिंचे प्रभेचे पाये । वोळगे म्हणौनि ॥ ७२ ॥

ऐसें अगाध माहात्म्य । जें सकळमार्गैकगम्य ।

जें स्वात्मानुभवरम्य । तें इयापरी दाविलें ॥ ७३ ॥

जैसा केरु फिटलिया आभाळीं । दिठी रिगे सूर्यमंडळीं ।

कां हातें सारूनि बाबुळीं । जळ देखिजे ॥ ७४ ॥

नातरी उकलतया सापाचे वेढे । जैसें चंदना खेंव देणें घडे ।

अथवा विवसी पळे मग चढे । निधान हातां ॥ ७५ ॥

तैसी प्रकृती हे आड होती । ते देवेंचि सारोनि परौती ।

मग परतत्त्व माझिये मती । शेजार केलें ॥ ७६ ॥

म्हणौनि इयेविषयींचा मज देवा । भरंवसा कीर जाहला जीवा ।

परी आणीक एक हेवा । उपनला असे ॥ ७७ ॥

तो भिडां जरी म्हणों राहों । तरी आना कवणा पुसों जावों ।

काय तुजवांचोनि ठावो । जाणत आहों आम्ही ? ॥ ७८ ॥

जळचरु जळाचा आभारु धरी । बाळक स्तनपानीं उपरोधु करी ।

तरी तया जिणया श्रीहरी । आन उपायो असे ? ॥ ७९ ॥

म्हणौनि भीड सांकडी न धरवे । जीवा आवडे तेंही तुजपुढां बोलावें ।

तंव राहें म्हणितलें देवें । चाड सांगैं ॥ ८० ॥

एवमेतद्यथाऽऽत्थ त्वमात्मानं परमेश्वर ।

द्रष्टुमिच्छामि ते रूपमैश्वरं पुरुषोत्तम ॥ ३॥

मग बोलिला तो किरीटी । म्हणे तुम्हीं केली जे गोठी ।

तिया प्रतीतीची दिठी । निवाली माझी ॥ ८१ ॥

आतां जयाचेनि संकल्पें । हे लोकपरंपरा होय हारपे ।

जया ठायातें आपणपें । मी ऐसें म्हणसी ॥ ८२ ॥

तें मुद्दल रूप तुझें । जेथूनि इयें द्विभुजें हन चतुर्भुजें ।

सुरकार्याचेनि व्याजें । घेवों घेवों येसी ॥ ८३ ॥

पैं जळशयनाचिया अवगणिया । कां मत्स्य कूर्म इया मिरवणिया ।

खेळु सरलिया तूं गुणिया । सांठविसी जेथ ॥ ८४ ॥

उपनिषदें जें गाती । योगिये हृदयीं रिगोनि पाहाती ।

जयातें सनकादिक आहाती । पोटाळुनियां ॥ ८५ ॥

ऐसें अगाध जें तुझें । विश्वरूप कानीं ऐकिजे ।

तें देखावया चित्त माझें । उतावीळ देवा ॥ ८६ ॥

देवें फेडूनियां सांकड । लोभें पुसिली जरी चाड ।

तरी हेंचि एकीं वाड । आर्तीं जी मज ॥ ८७ ॥

तुझें विश्वरूपपण आघवें । माझिये दिठीसि गोचर होआवें ।

ऐसी थोर आस जीवें । बांधोनि आहें ॥ ८८ ॥

मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो ।

योगेश्वर ततो मे त्वं दर्शयाऽत्मानमव्ययम् ॥ ४॥

परी आणीक एक एथ शारङ्गी । तुज विश्वरूपातें देखावयालागीं ।

पैं योग्यता माझिया आंगीं । असे कीं नाहीं ॥ ८९ ॥

हें आपलें आपण मी नेणें । तें कां नेणसी जरी देव म्हणे ।

तरी सरोगु काय जाणे । निदान रोगाचें ? ॥ ९० ॥

आणि जी आर्तीचेनि पडिभरें । आर्तु आपुली ठाकी पैं विसरे ।

जैसा तान्हेला म्हणे न पुरे । समुद्र मज ॥ ९१ ॥

ऐशा सचाडपणाचिये भुली । न सांभाळवे समस्या आपुली ।

यालागीं योग्यता जेवीं माउली । बालकाची जाणे ॥ ९२ ॥

तयापरी श्रीजनार्दना । विचारिजो माझी संभावना ।

मग विश्वरूपदर्शना । उपक्रम कीजे ॥ ९३ ॥

तरी ऐसी ते कृपा करा । एर्‍हवीं नव्हे हें म्हणा अवधारा ।

वायां पंचमालापें बधिरा । सुख केउतें देणें ? ॥ ९४ ॥

एर्‍हवीं येकले बापियाचे तृषे । मेघ जगापुरतें काय न वर्षे ? ।

परी जहालीही वृष्टि उपखे । जर्‍ही खडकीं होय ॥ ९५ ॥

चकोरा चंद्रामृत फावलें । येरा आण वाहूनि काय वारिलें ? ।

परी डोळ्यांवीण पाहलें । वायां जाय ॥ ९६ ॥

म्हणौनि विश्वरूप तूं सहसा । दाविसी कीर हा भरवंसा ।

कां जे कडाडां आणि गहिंसा- । माजी नीत्य नवा तूं कीं ॥ ९७ ॥

तुझें औदार्य जाणों स्वतंत्र । देतां न म्हणसी पात्रापात्र ।

पैं कैवल्या ऐसें पवित्र । जें वैरियांही दिधलें ॥ ९८ ॥

मोक्षु दुराराध्यु कीर होय । परी तोही आराधी तुझे पाय ।

म्हणौनि धाडिसी तेथ जाय । पाइकु जैसा ॥ ९९ ॥

तुवां सनकादिकांचेनि मानें । सायुज्यीं सौरसु दिधला पूतने ।

जे विषाचेनि स्तनपानें । मारूं आली ॥ १०० ॥

हां गा राजसूय यागाचिया सभासदीं । देखतां त्रिभुवनाची मांदी ।

कैसा शतधा दुर्वाक्य शब्दीं । निस्तेजिलासी ॥ १०१ ॥

ऐशिया अपराधिया शिशुपाळा । आपणपें ठावो दिधला गोपाळा ।

आणि उत्तानचरणाचिया बाळा । काय ध्रुवपदीं चाड ? ॥ १०२ ॥

तो वना आला याचिलागीं । जे बैसावें पितयाचिया उत्संगीं ।

कीं तो चंद्रसूर्यादिकांपरिस जगीं । श्लाघ्यु केला ॥ १०३ ॥

ऐसा वनवासिया सकळां । देतां एकचि तूं धसाळा ।

पुत्रा आळवितां अजामिळा । आपणपें देसी ॥ १०४ ॥

जेणें उरीं हाणितलासि पांपरा । तयाचा चरणु वाहासी दातारा ।

अझुनी वैरियांचिया कलेवरा । विसंबसीना ॥ १०५ ॥

ऐसा अपकारियां तुझा उपकारु । तूं अपात्रींही परी उदारु ।

दान म्हणौनि दारवंठेकरु । जाहलासी बळीचा ॥ १०६ ॥

तूंतें आराधी ना आयकें । होती पुंसा बोलावित कौतुकें ।

तिये वैकुंठीं तुवां गणिके । सुरवाडु केला ॥ १०७ ॥

ऐसीं पाहूनि वायाणीं मिषें । आपणपें देवों लागसी वानिवसें ।

तो तूं कां अनारिसें । मजलागीं करिसी ॥ १०८ ॥

हां गा दुभतयाचेनि पवाडें । जे जगाचें फेडी सांकडें ।

तिये कामधेनूचे पाडे । काय भुकेले ठाती ? ॥ १०९ ॥

म्हणौनि मियां जें विनविलें कांहीं । तें देव न दाखविती हें कीर नाहीं ।

परी देखावयालागीं देईं । पात्रता मज ॥ ११० ॥

तुझें विश्वरूप आकळे । ऐसे जरी जाणसी माझे डोळे ।

तरी आर्तीचे डोहळे । पुरवीं देवा ॥ १११ ॥

ऐसी ठायेंठावो विनंती । जंव करूं सरला सुभद्रापती ।

तंव तया षड्गुणचक्रवर्ती । साहवेचिना ॥ ११२ ॥

तो कृपापीयूषसजळु । आणि येरु जवळां आला वर्षाकाळु ।

नाना कृष्ण कोकिळु । अर्जुन वसंतु ॥ ११३ ॥

नातरी चंद्रबिंब वाटोळें । देखोनि क्षीरसागर उचंबळे ।

तैसा दुणेंही वरी प्रेमबळें । उल्लसितु जाहला ॥ ११४ ॥

मग तिये प्रसन्नतेचेनि आटोपें । गाजोनि म्हणितलें सकृपें ।

पार्था देख देख अमुपें । स्वरूपें माझीं ॥ ११५ ॥

एक विश्वरूप देखावें । ऐसा मनोरथु केला पांडवें ।

कीं विश्वरूपमय आघवें । करूनि घातलें ॥ ११६ ॥

बाप उदार देवो अपरिमितु । याचक स्वेच्छा सदोदितु ।

असे सहस्रवरी देतु । सर्वस्व आपुलें ॥ ११७ ॥

अहो शेषाचेहि डोळे चोरिले । वेद जयालागीं झकविले ।

लक्ष्मीयेही राहविलें । जिव्हार जें ॥ ११८ ॥

तें आतां प्रकटुनी अनेकधा । करीत विश्वरूपदर्शनाचा धांदा ।

बाप भाग्या अगाधा । पार्थाचिया ॥ ११९ ॥

जो जागता स्वप्नावस्थे जाये । तो जेवीं स्वप्नींचें आघवें होये ।

तेवीं अनंत ब्रह्मकटाह आहे । आपणचि जाहला ॥ १२० ॥

ते सहसा मुद्रा सोडिली । आणि स्थूळदृष्टीची जवनिका फेडिली ।

किंबहुना उघडिली । योगऋद्धी ॥ १२१ ॥

परी हा हें देखेल कीं नाहीं । ऐसी सेचि न करी कांहीं ।

एकसरां म्हणतसे पाहीं । स्नेहातुर ॥ १२२ ॥

श्रीभगवानुवाच ।

पश्य मे पार्थ रूपाणि शतशोऽथ सहस्रशः ।

नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च ॥ ५॥

अर्जुना तुवां एक दावा म्हणितलें । आणि तेंचि दावूं तरी काय दाविलें ।

आतां देखें आघवें भरिलें । माझ्याचि रूपीं ॥ १२३ ॥

एकें कृशें एकें स्थूळें । एकें र्‍हस्वें एकें विशाळें ।

पृथुतरें सरळें । अप्रांतें एकें ॥ १२४ ॥

एकें अनावरें प्रांजळें । सव्यापारें एकें निश्चळें ।

उदासीनें स्नेहाळें । तीव्रें एकें ॥ १२५ ॥

एके घूर्णितें सावधें । असलगें एकें अगाधें ।

एकें उदारें अतिबद्धें । क्रुद्धें एकें ॥ १२६ ॥

एकें शांतें सन्मदें । स्तब्धें एकें सानंदें ।

गर्जितें निःशब्दें । सौम्यें एकें ॥ १२७ ॥

एकें साभिलाषें विरक्तें । उन्निद्रितें एकें निद्रितें ।

परितुष्टें एकें आर्तें । प्रसन्नें एकें ॥ १२८ ॥

एकें अशस्त्रें सशस्त्रें । एकें रौद्रें अतिमित्रें ।

भयानकें एकें पवित्रें । लयस्थें एकें ॥ १२९ ॥

एकें जनलीलाविलासें । एकें पालनशीलें लालसें ।

एकें संहारकें सावेशें । साक्षिभूतें एकें ॥ १३० ॥

एवं नानाविधें परी बहुवसें । आणि दिव्यतेजप्रकाशें ।

तेवींचि एक{ए}का ऐसें । वर्णेंही नव्हे ॥ १३१ ॥

एकें तातलें साडेपंधरें । तैसीं कपिलवर्णें अपारें ।

एकें सर्वांगीं जैसें सेंदुरें । डवरलें नभ ॥ १३२ ॥

एकें सावियाचि चुळुकीं । जैसें ब्रह्मकटाह खचिलें माणिकीं ।

एकें अरुणोदयासारिखीं । कुंकुमवर्णें ॥ १३३ ॥

एकें शुद्धस्फटिकसोज्वळें । एकें इंद्रनीळसुनीळें ।

एकें अंजनवर्णें सकाळें । रक्तवर्णें एकें ॥ १३४ ॥

एकें लसत्कांचनसम पिंवळीं । एकें नवजलदश्यामळीं ।

एकें चांपेगौरीं केवळीं । हरितें एकें ॥ १३५ ॥

एकें तप्तताम्रतांबडीं । एकें श्वेतचंद्र चोखडीं ।

ऐसीं नानावर्णें रूपडीं । देखें माझीं ॥ १३६ ॥

हे जैसे कां आनान वर्ण । तैसें आकृतींही अनारिसेपण ।

लाजा कंदर्प रिघाला शरण । तैसीं सुंदरें एकें ॥ १३७ ॥

एकें अतिलावण्यसाकारें । एकें स्निग्धवपु मनोहरें ।

शृंगारश्रियेचीं भांडारें । उघडिली जैसीं ॥ १३८ ॥

एकें पीनावयवमांसाळें । एकें शुष्कें अति विक्राळें ।

एकें दीर्घकंठें विताळें । विकटें एकें ॥ १३९ ॥

एवं नानाविधाकृती । इयां पाहतां पारु नाहीं सुभद्रापती ।

ययांच्या एकेकीं अंगप्रांतीं । देख पां जग ॥ १४० ॥

पश्यादित्यान्वसून्रुद्रान् अश्विनौ मरुतस्तथा ।

बहून्यदृष्टपूर्वाणि पश्याश्चर्याणि भारत ॥ ६॥

जेथ उन्मीलन होत आहे दिठी । तेथ पसरती आदित्यांचिया सृष्टी ।

पुढती निमीलनीं मिठीं । देत आहाती ॥ १४१ ॥

वदनींचिया वाफेसवें । होत ज्वाळामय आघवें ।

जेथ पावकादिक पावे । समूह वसूंचा ॥ १४२ ॥

आणि भ्रूलतांचे शेवट । कोपें मिळों पाहतीं एकवट ।

तेथ रुद्रगणांचे संघाट । अवतरत देखें ॥ १४३ ॥

पैं सौम्यतेचा बोलावा । मिती नेणिजे अश्विनौदेवां ।

श्रोत्रीं होती पांडवा । अनेक वायु ॥ १४४ ॥

यापरी एकेकाचिये लीळे । जन्मती सुरसिद्धांचीं कुळें ।

ऐसीं अपारें आणि विशाळें । रूपें इयें पाहीं ॥ १४५ ॥

जयांतें सांगावया वेद बोबडे । पहावया काळाचेंही आयुष्य थोकडें ।

धातयाही परी न सांपडे । ठाव जयांचा ॥ १४६ ॥

जयांतें देवत्रयी कधीं नायके । तियें इयें प्रत्यक्ष देख अनेकें ।

भोगीं आश्चर्याची कवतिकें । महासिद्धी ॥ १४७ ॥

इहैकस्थं जगत्कृत्स्नं पश्याद्य सचराचरम् ।

मम देहे गुडाकेश यच्चान्यद्दृष्टुमिच्छसि ॥ ७॥

इया मूर्तीचिया किरीटी । रोममूळीं देखें पां सृष्टी ।

सुरतरुतळवटीं । तृणांकुर जैसे ॥ १४८ ॥

चंडवाताचेनि प्रकाशें । उडत परमाणु दिसती जैसे ।

भ्रमत ब्रह्मकटाह तैसें । अवयवसंधीं ॥ १४९ ॥

एथ एकैकाचिया प्रदेशीं । विश्व देख विस्तारेंशी ।

आणि विश्वाही परौतें मानसीं । जरी देखावें वर्ते ॥ १५० ॥

तरी इयेही विषयींचें कांहीं । एथ सर्वथा सांकडें नाहीं ।

सुखें आवडे तें माझिया देहीं । देखसी तूं ॥ १५१ ॥

ऐसें विश्वमूर्ती तेणें । बोलिलें कारुण्यपूर्णें ।

तंव देखत आहे कीं नाहीं न म्हणे । निवांतुचि येरु ॥ १५२ ॥

एथ कां पां हा उगला ? । म्हणौनि श्रीकृष्णें जंव पाहिला ।

तंव आर्तीचें लेणें लेइला । तैसाचि आहे ॥ १५३ ॥

न तु मां शक्यसे द्रष्टुमनेनैव स्वचक्षुषा ।

दिव्यं ददामि ते चक्षुः पश्य मे योगमैश्वरम् ॥ ८॥

मग म्हणें उत्कंठे वोहट न पडे । अझुनी सुखाची सोय न सांपडे ।

परी दाविलें तें फुडें । नाकळेचि यया ॥ १५४ ॥

हे बोलोनि देवो हांसिले । हांसोनि देखणियातें म्हणितलें ।

आम्हीं विश्वरूप तरी दाविलें । परी न देखसीच तूं ॥ १५५ ॥

यया बोला येरें विचक्षणें । म्हणितलें हां जी कवणासी तें उणें ? ।

तुम्ही बकाकरवीं चांदिणें । चरऊं पहा मा ॥ १५६ ॥

हां हो उटोनियां आरिसा । आंधळिया दाऊं बैसा ।

बहिरियापुढें हृषीकेशा । गाणीव करा ॥ १५७ ॥

मकरंदकणाचा चारा । जाणतां घालूनि दर्दुरा ।

वायां धाडा शारङ्गधरा । कोपा कवणा ॥ १५८ ॥

जें अतींद्रिय म्हणौनि व्यवस्थिलें । केवळ ज्ञानदृष्टीचिया भागा फिटलें ।

तें तुम्हीं चर्मचक्षूंपुढें सूदलें । मी कैसेनि देखें ॥ १५९ ॥

परी हें तुमचें उणें न बोलावें । मीचि साहें तेंचि बरवें ।

एथ आथि म्हणितलें देवें । मानूं बापा ॥ १६० ॥

साच विश्वरूप जरी आम्ही दावावें । तरी आधीं देखावया सामर्थ्य कीं द्यावें ।

परी बोलत बोलत प्रेमभावें । धसाळ गेलों ॥ १६१ ॥

काय जाहलें न वाहतां भुई पेरिजे । तरी तो वेलु विलया जाइजे ।

तरी आतां माझें निजरूप देखिजे । तें दृष्टी देवों तुज ॥ १६२ ॥

मग तिया दृष्टी पांडवा । आमुचा ऐश्वर्ययोगु आघवा ।

देखोनियां अनुभवा । माजिवडा करीं ॥ १६३ ॥

ऐसें तेणें वेदांतवेद्यें । सकळ लोक आद्यें ।

बोलिलें आराध्यें । जगाचेनि ॥ १६४ ॥

संजय उवाच ।

एवमुक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरिः ।

दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरम् ॥ ९॥

पैं कौरवकुलचक्रवर्ती । मज हाचि विस्मयो पुढतपुढती ।

जे श्रियेहूनि त्रिजगतीं । सदैव असे कवणी ? ॥ १६५ ॥

ना तरी खुणेचें वानावयालागीं । श्रुतीवांचूनि दावा पां जगीं ।

ना सेवकपण तरी आंगीं । शेषाच्याचि आथी ॥ १६६ ॥

हां हो जयाचेनि सोसें । शिणत आठही पहार योगी जैसे ।

अनुसरलें गरुडा{ऐ}सें । कवण आहे ? ॥ १६७ ॥

परी तें आघवेंचि एकीकडे ठेलें । सापें कृष्णसुख एकंदरें जाहलें ।

जिये दिवूनि जन्मले । पांडव हे ॥ १६८ ॥

परी पांचांही आंतु अर्जुना । श्रीकृष्ण सावियाचि जाहला अधीना ।

कामुक कां जैसा अंगना । आपैता कीजे ॥ १६९ ॥

पढविलें पाखरूं ऐसें न बोले । यापरी क्रीडामृगही तैसा न चले ।

कैसें दैव एथें सुरवाडलें । तें जाणों न ये ॥ १७० ॥

आजि हें परब्रह्म सगळें । भोगावया सदैव याचेचि डोळे ।

कैसे वाचेनि हन लळे । पाळीत असे ॥ १७१ ॥

हा कोपे कीं निवांतु साहे । हा रुसे तरी बुझावीत जाये ।

नवल पिसें लागलें आहे । पार्थाचें देवा ॥ १७२ ॥

एर्‍हवीं विषय जिणोनि जन्मले । जे शुकादिक दादुले ।

ते विषयोचि वानितां जाहले । भाट ययाचें ॥ १७३ ॥

हा योगियांचें समाधिधन । कीं होऊनि ठेले पार्थाआधीन ।

यालागीं विस्मयो माझें मन । करीतसे राया ॥ १७४ ॥

तेवींचि संजय म्हणे कायसा । विस्मयो एथें कौरवेशा ।

श्रीकृष्णें स्वीकारिजे तया ऐसा । भाग्योदय होय ॥ १७५ ॥

म्हणौनि तो देवांचा रावो । म्हणे पार्थाते तुज दृष्टि देवों ।

जया विश्वरूपाचा ठावो । देखसी तूं ॥ १७६ ॥

ऐसी श्रीमुखौनि अक्षरें । निघती ना जंव एकसरें ।

तंव अविद्येचे आंधारें । जावोंचि लागे ॥ १७७ ॥

तीं अक्षरें नव्हती देखा । ब्रह्मसाम्राज्यदीपिका ।

अर्जुनालागीं चित्कळिका । उजळलिया श्रीकृष्णें ॥ १७८ ॥

मग दिव्यचक्षुप्रकाशु प्रगटला । तया ज्ञानदृष्टी फांटा फुटला ।

ययापरी दाविता जाहला । ऐश्वर्य आपुलें ॥ १७९ ॥

हे अवतार जे सकळ । ते जिये समुद्रींचे कां कल्लोळ ।

विश्व हें मृगजळ । जया रश्मीस्तव दिसे ॥ १८० ॥

जिये अनादिभूमिके निटे । चराचर हें चित्र उमटे ।

आपणपें श्रीवैकुंठें । दाविलें तया ॥ १८१ ॥

मागां बाळपणीं येणें श्रीपती । जैं एक वेळ खादली होती माती ।

तैं कोपोनियां हातीं । यशोदां धरिला ॥ १८२ ॥

मग भेणें भेणें जैसें । मुखीं झाडा द्यावयाचेनि मिसें ।

चवदाही भुवनें सावकाशें । दाविलीं तिये ॥ १८३ ॥

ना तरी मधुवनीं ध्रुवासि केलें । जैसें कपोल शंखें शिवतलें ।

आणि वेदांचियेही मतीं ठेलें । तें लागला बोलों ॥ १८४ ॥

तैसा अनुग्रहो पैं राया । श्रीहरी केला धनंजया ।

आतां कवणेकडेही माया । ऐसी भाष नेणेंचि तो ॥ १८५ ॥

एकसरें ऐश्वर्यतेजें पाहलें । तया चमत्काराचें एकार्णव जाहलें ।

चित्त समाजीं बुडोनि ठेलें । विस्मयाचिया ॥ १८६ ॥

जैसा आब्रह्म पूर्णोदकीं । पव्हे मार्कंडेय एकाकीं ।

तैसा विश्वरूप कौतुकीं । पार्थु लोळे ॥ १८७ ॥

म्हणे केवढें गगन एथ होतें । तें कवणें नेलें पां केउतें ।

तीं चराचर महाभूतें । काय जाहलीं ? ॥ १८८ ॥

दिशांचे ठावही हारपले । आधोर्ध्व काय नेणों जाहले ।

चेइलिया स्वप्न तैसे गेले । लोकाकार ॥ १८९ ॥

नाना सूर्यतेजप्रतापें । सचंद्र तारांगण जैसें लोपे ।

तैसीं गिळिलीं विश्वरूपें । प्रपंचरचना ॥ १९० ॥

तेव्हां मनासी मनपण न स्फुरे । बुद्धि आपणपें न सांवरें ।

इंद्रियांचे रश्मी माघारे । हृदयवरी भरले ॥ १९१ ॥

तेथ ताटस्थ्या ताटस्थ्य पडिलें । टकासी टक लागले ।

जैसें मोहनास्त्र घातलें । विचारजातां ॥ १९२ ॥

तैसा विस्मितु पाहे कोडें । तंव पुढां होतें चतुर्भुज रूपडें ।

तेंचि नानारूप चहूंकडे । मांडोनि ठेलें ॥ १९३ ॥

जैसें वर्षाकाळींचे मेघौडे । कां महाप्रळयींचें तेज वाढे ।

तैसें आपणावीण कवणीकडे । नेदीचि उरों ॥ १९४ ॥

प्रथम स्वरूपसमाधान । पावोनि ठेला अर्जुन ।

सवेचि उघडी लोचन । तंव विश्वरूप देखें ॥ १९५ ॥

इहींचि दोहीं डोळां । पाहावें विश्वरूपा सकळा ।

तो श्रीकृष्णें सोहळा । पुरविला ऐसा ॥ १९६ ॥

अनेकवक्त्रनयनमनेकाद्भुतदर्शनम् ।

अनेकदिव्याभरणं दिव्यानेकोद्यतायुधम् ॥ १०॥

मग तेथ सैंघ देखे वदनें । जैसी रमानायकाचीं राजभुवनें ।

नाना प्रगटलीं निधानें । लावण्यश्रियेचीं ॥ १९७ ॥

कीं आनंदाची वनें सासिन्नलीं । जैसी सौंदर्या राणीव जोडली ।

तैसीं मनोहरें देखिलीं । हरीचीं वक्त्रें ॥ १९८ ॥

तयांही माजीं एकैकें । सावियाचि भयानकें ।

काळरात्रीचीं कटकें । उठवलीं जैसीं ॥ १९९ ॥

कीं मृत्यूसीचि मुखें जाहलीं । हो कां जें भयाचीं दुर्गें पन्नासिलीं ।

कीं महाकुंडें उघडलीं । प्रळयानळाचीं ॥ २०० ॥

तैसीं अद्‍भुतें भयासुरें । तेथ वदनें देखिलीं वीरें ।

आणिकें असाधारणें साळंकारें । सौम्यें बहुतें ॥ २०१ ॥

पैं ज्ञानदृष्टीचेनि अवलोकें । परी वदनांचा शेवटु न टके ।

मग लोचन तें कवतिकें । लागला पाहों ॥ २०२ ॥

तंव नानावर्णें कमळवनें । विकासिलीं तैसे अर्जुनें ।

डोळे देखिले पालिंगनें । आदित्यांचीं ॥ २०३ ॥

तेथेंचि कृष्णमेघांचिया दाटी- । माजीं कल्पांत विजूंचिया स्फुटी ।

तैसिया वन्हि पिंगळा दिठी । भ्रूभंगातळीं ॥ २०४ ॥

हें एकैक आश्चर्य पाहतां । तिये एकेचि रूपीं पंडुसुता ।

दर्शनाची अनेकता । प्रतिफळली ॥ २०५ ॥

मग म्हणे चरण ते कवणेकडे । केउते मुकुट कें दोर्दंडें ।

ऐसी वाढविताहे कोडें । चाड देखावयाची ॥ २०६ ॥

तेथ भाग्यनिधि पार्था । कां विफलत्व होईल मनोरथा ।

काय पिनाकपाणीचिया भातां । वायकांडीं आहाती ? ॥ २०७ ॥

ना तरी चतुराननाचिये वाचे । काय आहाती लटिकिया अक्षरांचे साचे ? ।

म्हणौनि साद्यंतपण अपारांचे । देखिलें तेणें ॥ २०८ ॥

जयाची सोय वेदां नाकळे । तयाचे सकळावयव एकेचि वेळे ।

अर्जुनाचे दोन्ही डोळे । भोगिते जाहले ॥ २०९ ॥

चरणौनि मुकुटवरी । देखत विश्वरूपाची थोरी ।

जे नाना रत्‍न अळंकारीं । मिरवत असे ॥ २१० ॥

परब्रह्म आपुलेनि आंगें । ल्यावया आपणचि जाहला अनेगें ।

तियें लेणीं मी सांगें । काइसयासारिखीं ॥ २११ ॥

जिये प्रभेचिये झळाळा । उजाळु चंद्रादित्यमंडळा ।

जे महातेजाचा जिव्हाळा । जेणें विश्व प्रगटे ॥ २१२ ॥

तो दिव्यतेज शृंगारु । कोणाचिये मतीसी होय गोचरु ।

देव आपणपेंचि लेइले ऐसें वीरु । देखत असे ॥ २१३ ॥

मग तेथेंचि ज्ञानाचिया डोळां । पहात करपल्लवां जंव सरळा ।

तंव तोडित कल्पांतींचिया ज्वाळा । तैसीं शस्त्रें झळकत देखे ॥ २१४ ॥

आपण आंग आपण अलंकार । आपण हात आपण हतियार ।

आपण जीव आपण शरीर । देखें चराचर कोंदलें देवें ॥ २१५ ॥

जयाचिया किरणांचे निखरपणें । नक्षत्रांचे होत फुटाणे ।

तेजें खिरडला वन्हि म्हणे । समुद्रीं रिघों ॥ २१६ ॥

मग कालकूटकल्लोळीं कवळिलें । नाना महाविजूंचें दांग उमटलें ।

तैसे अपार कर देखिले । उदितायुधीं ॥ २१७ ॥

दिव्यमाल्याम्बरधरं दिव्यगन्धानुलेपनम् ।

सर्वाश्चर्यमयं देवमनन्तं विश्वतोमुखम् ॥ ११॥

कीं भेणें तेथूनि काढिली दिठी । मग कंठमुगुट पहातसे किरीटी ।

तंव सुरतरूची सृष्टी । जयांपासोनि कां जाहली ॥ २१८ ॥

जिये महासिद्धींचीं मूळपीठें । शिणली कमळा जेथ वावटे ।

तैसीं कुसुमें अति चोखटें । तुरंबिलीं देखिलीं ॥ २१९ ॥

मुगुटावरी स्तबक । ठायीं ठायीं पूजाबंध अनेक ।

कंठीं रुळताति अलौकिक । माळादंड ॥ २२० ॥

स्वर्गें सूर्यतेज वेढिलें । जैसें पंधरेनें मेरूतें मढिलें ।

तैसें नितंबावरी गाढिलें । पीतांबरु झळके ॥ २२१ ॥

श्रीमहादेवो कापुरें उटिला । कां कैलासु पारजें डवरिला ।

नाना क्षीरोदकें पांघरविला । क्षीरार्णवो जैसा ॥ २२२ ॥

जैसी चंद्रमयाची घडी उपलविली । मग गगनाकरवीं बुंथी घेवविली ।

तैसीं चंदनपिंजरी देखिली । सर्वांगीं तेणें ॥ २२३ ॥

जेणें स्वप्रकाशा कांतीं चढे । ब्रह्मानंदाचा निदाघु मोडे ।

जयाचेनि सौरभ्यें जीवित जोडे । वेदवतीये ॥ २२४ ॥

जयाचे निर्लेप अनुलेपु करी । जे अनंगुही सर्वांगीं धरी ।

तया सुगंधाची थोरी । कवण वानी ? ॥ २२५ ॥

ऐसी एकैक शृंगारशोभा । पाहतां अर्जुन जातसें क्षोभा ।

तेवींचि देवो बैसला कीं उभा । का शयालु हें नेणवें ॥ २२६ ॥

बाहेर दिठी उघडोनि पाहे । तंव आघवें मूर्तिमय देखत आहे ।

मग आतां न पाहें म्हणौनि उगा राहे । तरी आंतुही तैसेंचि ॥ २२७ ॥

अनावरें मुखें समोर देखे । तयाभेणें पाठीमोरा जंव ठाके ।

तंव तयाहीकडे श्रीमुखें । करचरण तैसेचि ॥ २२८ ॥

अहो पाहतां कीर प्रतिभासे । एथ नवलावो काय असे ? ।

परि न पाहतांही दिसे । चोज आइका ॥ २२९ ॥

कैसें अनुग्रहाचें करणें । पार्थाचें पाहणें आणि न पाहणें ।

तयाही सकट नारायणें । व्यापूनि घेतलें ॥ २३० ॥

म्हणौनि आश्चर्याच्या पुरीं एकीं । पडिला ठायेठाव थडीं ठाकी ।

तंव चमत्काराचिया आणिकीं । महार्णवीं पडे ॥ २३१ ॥

तैसा अर्जुनु असाधारणें । आपुलिया दर्शनाचेनि विंदाणें ।

कवळूनि घेतला तेणें । अनंतरूपें ॥ २३२ ॥

तो विश्वतोमुख स्वभावें । आणि तेचि दावावयालागीं पांडवें ।

प्रार्थिला आतां आघवें । होऊनि ठेला ॥ २३३ ॥

आणि दीपें कां सूर्यें प्रगटे । अथवा निमुटलिया देखावेंचि खुंटे ।

तैसी दिठी नव्हे जे वैकुंठें । दिधली आहे ॥ २३४ ॥

म्हणौनि किरीटीसि दोहीं परी । तें देखणें देखें अंधारी ।

हें संजयो हस्तिनापुरीं । सांगतसे राया ॥ २३५ ॥

म्हणे किंबहुना अवधारिलें । पार्थें विश्वरूप देखिलें ।

नाना आभरणीं भरलें । विश्वतोमुख ॥ २३६ ॥

दिवि सूर्य सहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता ।

यदि भाः सदृशी सा स्याद्भासस्तस्य महात्मनः ॥ १२॥

तिये अंगप्रभेचा देवा । नवलावो काइसया ऐसा सांगावा ।

कल्पांतीं एकुचि मेळावा । द्वादशादित्यांचा होय ॥ २३७ ॥

तैसे ते दिव्यसूर्य सहस्रवरी । जरी उदयजती कां एकेचि अवसरीं ।

तर्‍ही तया तेजाची थोरी । उपमूं नये ॥ २३८ ॥

आघवयाचि विजूंचा मेळावा कीजे । आणि प्रळयाग्नीची सर्व सामग्री आणिजे ।

तेवींचि दशकुही मेळविजे । महातेजांचा ॥ २३९ ॥

तर्‍ही तिये अंगप्रभेचेनि पाडें । हें तेज कांहीं कांहीं होईल थोडें ।

आणि तया ऐसें कीर चोखडें । त्रिशुद्धी नोहे ॥ २४० ॥

ऐसें महात्म्य या श्रीहरीचें सहज । फांकतसे सर्वांगीचें तेज ।

तें मुनिकृपा जी मज । दृष्ट जाहलें ॥ २४१ ॥

तत्रैकस्थं जगत्कृत्स्नम् प्रविभक्तमनेकधा ॥

अपश्यद्देवदेवस्य शरीरे पांडवस्तदा ॥ १३॥

आणि तिये विश्वरूपीं एकीकडे । जग आघवें आपुलेनि पवाडें ।

जैसे महोदधीमाजीं बुडबुडे । सिनानें दिसती ॥ २४२ ॥

कां आकाशीं गंधर्वनगर । भूतळीं पिपीलिका बांधे घर ।

नाना मेरुवरी सपूर । परमाणु बैसले ॥ २४३ ॥

विश्व आघवेंचि तयापरी । तया देवचक्रवर्तीचिया शरीरीं ।

अर्जुन तिये अवसरीं । देखता जाहला ॥ २४४ ॥

ततः स विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनंजयः ।

प्रणम्य शिरसा देवं कृताझ्जलिरभाषत ॥ १४॥

तेथ एक विश्व एक आपण । ऐसें अळुमाळ होतें जें दुजेपण ।

तेंही आटोनि गेलें अंतःकरण । विरालें सहसा ॥ २४५ ॥

आंतु आनंदा चेइरें जाहलें । बाहेरि गात्रांचें बळ हारपोनि गेलें ।

आपाद पां गुंतलें । पुलकांचलें ॥ २४६ ॥

वार्षिये प्रथमदशे । वोहळलया शैलांचें सर्वांग जैसें ।

विरूढे कोमलांकुरीं तैसे । रोमांच जाहले ॥ २४७ ॥

शिवतला चंद्रकरीं । सोमकांतु द्रावो धरी ।

तैसिया स्वेदकणिका शरीरीं । दाटलिया ॥ २४८ ॥

माजीं सापडलेनि अलिकुळें । जळावरी कमळकळिका जेवीं आंदोळे ।

तेवीं आंतुलिया सुखोर्मीचेनि बळें । बाहेरि कांपे ॥ २४९ ॥

कर्पूरकर्दळीचीं गर्भपुटें । उकलतां कापुराचेनि कोंदाटें ।

पुलिका गळती तेवीं थेंबुटें । नेत्रौनि पडती ॥ २५० ॥

उदयलेनि सुधाकरें । जैसा भरलाचि समुद्र भरे ।

तैसा वेळोवेळां उर्मिभरें । उचंबळत असे ॥ २५१ ॥

ऐसा सात्त्विकांही आठां भावां । परस्परें वर्ततसे हेवा ।

तेथ ब्रह्मानंदाची जीवा । राणीव फावली ॥ २५२ ॥

तैसाचि तया सुखानुभवापाठीं । केला द्वैताचा सांभाळु दिठी ।

मग उसासौनि किरीटी । वास पाहिली ॥ २५३ ॥

तेथ बैसला होता जिया सवा । तियाचिया कडे मस्तक खालविला देवा ।

जोडूनि करसंपुट बरवा । बोलतु असे ॥ २५४ ॥

अर्जुन उवाच ।

पश्यामि देवांस्तव देव देहे सर्वांस्तथा भूतविशेषसंघान् ॥

ब्रह्माणमीशं कमलासनस्थ मृषींश्चसर्वानुरगांश्च दिव्यान् ॥ १५॥

म्हणे जयजयाजी स्वामी । नवल कृपा केली तुम्हीं ।

जें हें विश्वरूप कीं आम्हीं । प्राकृत देखों ॥ २५५ ॥

परि साचचि भलें केलें गोसाविया । मज परितोषु जाहला साविया ।

जी देखलासि जो इया । सृष्टीसी तूं आश्रयो ॥ २५६ ॥

देवा मंदराचेनि अंगलगें । ठायीं ठायीं श्वापदांचीं दांगें ।

तैसीं इयें तुझ्या देहीं अनेगें । देखतसें भुवनें ॥ २५७ ॥

अहो आकाशचिये खोळे । दिसती ग्रहगणांचीं कुळें ।

कां महावृक्षीं अविसाळें । पक्षिजातीचीं ॥ २५८ ॥

तयापरी श्रीहरी । तुझिया विश्वात्मकीं इये शरीरीं ।

स्वर्गु देखतसें अवधारीं । सुरगणेंसीं ॥ २५९ ॥

प्रभु महाभूतांचें पंचक । येथ देखत आहे अनेक ।

आणि भूतग्राम एकेक । भूतसृष्टीचें ॥ २६० ॥

जी सत्यलोकु तुजमाजीं आहे । देखिला चतुराननु हा नोहे ? ।

आणि येरीकडे जंव पाहें । तंव कैलासुही दिसे ॥ २६१ ॥

श्रीमहादेव भवानियेशीं । तुझ्या दिसतसे एके अंशीं ।

आणि तूंतेंही गा हृषीकेशी । तुजमाजीं देखे ॥ २६२ ॥

पैं कश्यपादि ऋषिकुळें । इयें तुझिया स्वरूपीं सकळें ।

देखतसें पाताळें । पन्नगेंशीं ॥ २६३ ॥

किंबहुना त्रैलोक्यपती । तुझिया एकेकाचि अवयवाचिये भिंती ।

इयें चतुर्दशभुवनें चित्राकृती । अंकुरलीं जाणों ॥ २६४ ॥

आणि तेथिंचे जे जे लोक । ते चित्ररचना जी अनेक ।

ऐसें देखतसे अलोकिक । गांभीर्य तुझें ॥ २६५ ॥

अनेकबाहूदरवक्त्रनेत्रं पश्यामि त्वां सर्वतोऽनंतरूपम् ।

नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूपम् ॥ १६॥

त्या दिव्यचक्षूंचेनि पैसें । चहुंकडे जंव पाहात असें ।

तंव दोर्दंडीं कां जैसें । आकाश कोंभैलें ॥ २६६ ॥

तैसे एकचि निरंतर । देवा देखत असें तुझे कर ।

करीत आघवेचि व्यापार । एकेचि काळीं ॥ २६७ ॥

मग महाशून्याचेनि पैसारें । उघडलीं ब्रह्मकटाहाचीं भांडारें ।

तैसीं देखतसें अपारें । उदरें तुझीं ॥ २६८ ॥

जी सहस्रशीर्षयाचें देखिलें । कोडीवरी होताति एकीवेळें ।

कीं परब्रह्मचि वदनफळें । मोडोनि आलें ॥ २६९ ॥

तैसीं वक्त्रें जी जेउतीं तेउतीं । तुझीं देखितसे विश्वमूर्ती ।

आणि तयाचिपरी नेत्रपंक्ती । अनेका सैंघ ॥ २७० ॥

हें असो स्वर्ग पाताळ । कीं भूमी दिशा अंतराळ ।

हे विवक्षा ठेली सकळ । मूर्तिमय देखतसें ॥ २७१ ॥

हें तुजवीण एकादियाकडे । परमाणूहि एतुला कोडें ।

अवकाशु पाहतसें परि न सांपडे । ऐसें व्यापिलें तुवां ॥ २७२ ॥

इये नानापरी अपरिमितें । जेतुलीं साठविलीं होतीं महाभूतें ।

तेतुलाहि पवाडु तुवां अनंतें । कोंदला देखतसें ॥ २७३ ॥

ऐसा कवणें ठायाहूनि तूं आलासी । एथ बैसलासि कीं उभा आहासि ।

आणि कवणिये मायेचिये पोटीं होतासी । तुझें ठाण केवढें ॥ २७४ ॥

तुझें रूप वय कैसें । तुजपैलीकडे काय असे ।

तूं काइसयावरी आहासि ऐसें । पाहिलें मियां ॥ २७५ ॥

तंव देखिलें जी आघवेंचि । तरि आतां तुज ठावो तूंचि ।

तूं कवणाचा नव्हेसि ऐसाचि । अनादि आयता ॥ २७६ ॥

तूं उभा ना बैठा । दिघडु ना खुजटा ।

तुज तळीं वरी वैकुंठा । तूंचि आहासी ॥ २७७ ॥

तूं रूपें आपणयांचि ऐसा । देवा तुझी तूंचि वयसा ।

पाठीं पोट परेशा । तुझें तूं गा ॥ २७८ ॥

किंबहुना आतां । तुझें तूंचि आघवें अनंता ।

हें पुढत पुढती पाहतां । देखिलें मियां ॥ २७९ ॥

परि या तुझिया रूपाआंतु । जी उणीव एक असे देखतु ।

जे आदि मध्य अंतु । तिन्हीं नाहीं ॥ २८० ॥

एर्‍हवीं गिंवसिलें आघवां ठायीं । परि सोय न लाहेचि कहीं ।

म्हणौनि त्रिशुद्धी हे नाहीं । तिन्ही एथ ॥ २८१ ॥

एवं आदिमध्यांतरहिता । तूं विश्वेश्वरा अपरिमिता ।

देखिलासि जी तत्त्वतां । विश्वरूपा ॥ २८२ ॥

तुज महामूर्तीचिया आंगी । उमटलिया पृथक् मूर्ती अनेगी ।

लेइलासी वानेपरींची आंगीं । ऐसा आवडतु आहासी ॥ २८३ ॥

नाना पृथक् मूर्ती तिया द्रुमवल्ली । तुझिया स्वरूपमहाचळीं ।

दिव्यालंकार फुलीं फळीं । सासिन्नलिया ॥ २८४ ॥

हो कां जे महोदधीं तूं देवा । जाहलासि तरंगमूर्ती हेलावा ।

कीं तूं एक वृक्षु बरवा । मूर्तिफळीं फळलासी ॥ २८५ ॥

जी भूतीं भूतळ मांडिलें । जैसें नक्षत्रीं गगन गुढलें ।

तैसें मूर्तिमय भरलें । देखतसें तुझें रूप ॥ २८६ ॥

जी एकेकीच्या अंगप्रांतीं । होय जाय हें त्रिजगती ।

एवढियाही तुझ्या आंगीं मूर्ती । कीं रोमा जालिया ॥ २८७ ॥

ऐसा पवाडु मांडूनि विश्वाचा । तूं कवण पां एथ कोणाचा ।

हें पाहिलें तंव आमुचा । सारथी तोचि तूं ॥ २८८ ॥

तरी मज पाहतां मुकुंदा । तूं ऐसाचि व्यापकु सर्वदा ।

मग भक्तानुग्रहें तया मुग्धा । रूपातें धरिसी ॥ २८९ ॥

कैसें चहूं भुजांचें सांवळें । पाहतां वोल्हावती मन डोळे ।

खेंव देऊं जाइजे तरी आकळे । दोहींचि बाहीं ॥ २९० ॥

ऐसी मूर्ति कोडिसवाणी कृपा । करूनि होसी ना विश्वरूपा ।

कीं अमुचियाचि दिठी सलेपा । जें सामान्यत्वें देखिती ॥ २९१ ॥

तरी आतां दिठीचा विटाळु गेला । तुवां सहजें दिव्यचक्षू केला ।

म्हणौनि यथारूपें देखवला । महिमा तुझा ॥ २९२ ॥

परी मकरतुंडामागिलेकडे । तोचि होतासि तूं एवढें ।

रूप जाहलासि हें फुडें । वोळखिलें मियां ॥ २९३ ॥

किरीटिनं गदिनं चक्रिणं च तेजोराशिं सर्वतो दीप्तिमन्तम् ।

पश्यामि त्वां दुर्निरीक्ष्यं समन्ताद्दीप्तानलार्कद्युतिमप्रमेयम् ॥ १७॥

नोहे तोचि हा शिरीं ? । मुकुट लेइलासि श्रीहरी ।

परी आतांचें तेज आणि थोरी । नवल कीं बहु हें ॥ २९४ ॥

तेंचि हें वरिलियेचि हातीं । चक्र परिजितया आयती ।

सांवरितासि विश्वमूर्ती । ते न मोडे खूण ॥ २९५ ॥

येरीकडे तेचि हे नोहे गदा । आणि तळिलिया दोनी भुजा निरायुधा ।

वागोरे सांवरावया गोविंदा । संसरिलिया ॥ २९६ ॥

आणि तेणेंचि वेगें सहसा । माझिया मनोरथासरिसा ।

जाहलासि विश्वरूपा विश्वेशा । म्हणौनि जाणें ॥ २९७ ॥

परी कायसें बा हें चोज । विस्मयो करावयाहि पाडू नाहीं मज ।

चित्त होऊनि जातसें निर्बुज । आश्चर्यें येणें ॥ २९८ ॥

हें एथ आथि कां येथ नाहीं । ऐसें श्वसोंही नये कांहीं ।

नवल अंगप्रभेची नवाई । कैसी कोंदलीं सैंघ ॥ २९९ ॥

एथ अग्नीचीही दिठी करपत । सूर्य खद्योतु तैसा हारपत ।

ऐसें तीव्रपण अद्‍भुत । तेजाचें यया ॥ ३०० ॥

हो कां महातेजाचिया महार्णवीं । बुडोनि गेली सृष्टी आघवी ।

कीं युगांतविजूंच्या पालवीं । झांकलें गगन ॥ ३०१ ॥

नातरी संहारतेजाचिया ज्वाळा । तोडोनि माचू बांधला अंतराळां ।

आतां दिव्य ज्ञानाचिया डोळां । पाहवेना ॥ ३०२ ॥

उजाळु अधिकाधिक बहुवसु । धडाडीत आहे अतिदाहसु ।

पडत दिव्यचक्षुंसही त्रासु । न्याहाळितां ॥ ३०३ ॥

हो कां जे महाप्रळयींचा भडाडु । होता काळाग्निरुद्राचिया ठायीं गूढु ।

तो तृतीयनयनाचा मढू । फुटला जैसा ॥ ३०४ ॥

तैसें पसरलेनि प्रकाशें । सैंघ पांचवनिया ज्वाळांचे वळसे ।

पडतां ब्रह्मकटाह कोळिसे । होत आहाती ॥ ३०५ ॥

ऐसा अद्‍भुत तेजोराशी । जन्मा नवल म्यां देखिलासी ।

नाहीं व्याप्ती आणि कांतीसी । पारु जी तुझिये ॥ ३०६ ॥

त्वमक्षरं परमं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य परं निधानम् ।

त्वमव्ययः शाश्वतधर्मगोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे ॥ १८॥

देवा तूं अक्षर । औटाविये मात्रेसि पर ।

श्रुती जयाचें घर । गिंवसीत आहाती ॥ ३०७ ॥

जें आकाराचें आयतन । जें विश्वनिक्षेपैकनिधान ।

तें अव्यय तूं गहन । अविनाश जी ॥ ३०८ ॥

तूं धर्माचा वोलावा । अनादिसिद्ध तूं नित्य नवा ।

जाणें मी सदतिसावा । पुरुष विशेष तूं ॥ ३०९ ॥

अनादिमध्यान्तमनन्तवीर्यं अनन्तबाहुं शशिसूर्यनेत्रम् ।

पश्यामि त्वां दीप्तहुताशवक्त्रं स्वतेजसा विश्वमिदं तपन्तम् ॥ १९॥

तूं आदिमध्यांतरहितु । स्वसामर्थ्यें तूं अनंतु ।

विश्वबाहु अपरिमितु । विश्वचरण तूं ॥ ३१० ॥

पैं चंद्र चंडांशु डोळां । दावितासि कोपप्रसाद लीळा ।

एकां रुससी तमाचिया डोळां । एकां पाळितोसि कृपादृष्टी ॥ ३११ ॥

जी एवंविधा तूंतें । मी देखतसें हें निरुतें ।

पेटलें प्रळयाग्नीचें उजितें । तैसें वक्त्र हें तुझें ॥ ३१२ ॥

वणिवेनि पेटले पर्वत । कवळूनि ज्वाळांचे उभड उठत ।

तैसी चाटीत दाढा दांत । जीभ लोळे ॥ ३१३ ॥

इये वदनींचिया उबा । आणि जी सर्वांगकांतीचिया प्रभा ।

विश्व तातलें अति क्षोभा । जात आहे ॥ ३१४ ॥

द्यावापृथिव्योरिदमन्तरं हि व्याप्तं त्वयैकेन दिशश्च सर्वाः ।

दृष्ट्वाऽद्भुतं रूपमुग्रं तवेदं लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन् ॥ २०॥

कां जे द्यौर्लोक आणि पाताळ । पृथिवी आणि अंतराळ ।

अथवा दशदिशा समाकुळ । दिशाचक्र ॥ ३१५ ॥

हें आघवेंचि तुंवा एकें । भरलें देखत आहे कौतुकें ।

परि गगनाहीसकट भयानकें । आप्लविजे जेवीं ॥ ३१६ ॥

नातरी अद्‍भुतरसाचिया कल्लोळीं । जाहली चवदाही भुवनांसि कडियाळीं ।

तैसें आश्चर्यचि मग मी आकळीं । काय एक ? ॥ ३१७ ॥

नावरे व्याप्ती हे असाधारण । न साहवे रूपाचें उग्रपण ।

सुख दूरी गेलें परि प्राण । विपायें धरीजे ॥ ३१८ ॥

देवा ऐसें देखोनि तूंतें । नेणों कैसें आलें भयाचें भरितें ।

आतां दुःखकल्लोळीं झळंबतें । तिन्हीं भुवनें ॥ ३१९ ॥

एर्‍हवीं तुज महात्मयाचें देखणें । तरि भयदुःखासि कां मेळवणें ? ।

परि हें सुख नव्हेचि जेणें गुणें । तें जाणवत आहे मज ॥ ३२० ॥

जंव तुझें रूप नोहे दिठें । तंव जगासि संसारिक गोमटें ।

आतां देखिलासि तरी विषयविटें । उपनला त्रासु ॥ ३२१ ॥

तेवींचि तुज देखिलियासाठीं । काय सहसा तुज देवों येईल मिठी ।

आणि नेदीं तरी शोकसंकटीं । राहों केवीं ? ॥ ३२२ ॥

म्हणौनि मागां सरों तंव संसारु । आडवीत येतसे अनिवारु ।

आणि पुढां तूं तंव अनावरु । न येसि घेवों ॥ ३२३ ॥

ऐसा माझारलिया सांकडां । बापुड्या त्रैलोक्याचा होतसे हुरडा ।

हा ध्वनि जी फुडा । चोजवला मज ॥ ३२४ ॥

जैसा आरंबळला आगीं । तो समुद्रा ये निवावयालागीं ।

तंव कल्लोळपाणियाचिया तरंगीं । आगळा बिहे ॥ ३२५ ॥

तैसें या जगासि जाहलें । तूंतें देखोनि तळमळित ठेलें ।

यामाजीं पैल भले । ज्ञानशूरांचे मेळावे ॥ ३२६ ॥

अमी हि त्वां सुरसंघा विशन्ति केचिद्भीताः प्राञ्जलयो गृणन्ति ।

स्वस्तीत्युक्त्वा महर्षिसिद्धसङ्घाः स्तुवन्ति त्वां सुतिभिः पुष्कलाभिः ॥ २१॥

हे तुझेनि आंगिकें तेजें । जाळूनि सर्व कर्मांचीं बीजें ।

मिळत तुज आंतु सहजें । सद्‍भावेसीं ॥ ३२७ ॥

आणिक एक सावियाचि भयभीरु । सर्वस्वें धरूनि तुझी मोहरु ।

तुज प्रार्थिताति करु । जोडोनियां ॥ ३२८ ॥

देवा अविद्यार्णवीं पडिलों । जी विषयवागुरें आंतुडलों ।

स्वर्गसंसाराचिया सांकडलों । दोहीं भागीं ॥ ३२९ ॥

ऐसें आमुचें सोडवणें । तुजवांचोनि कीजेल कवणें ? ।

तुज शरण गा सर्वप्राणें । म्हणत देवा ॥ ३३० ॥

आणि महर्षी अथवा सिद्ध । कां विद्याधरसमूह विविध ।

हे बोलत तुज स्वस्तिवाद । करिती स्तवन ॥ ३३१ ॥

रुद्रादित्या वसवो ये च साध्या विश्वेऽश्विनौ मरुतश्चोश्मपाश्च ।

गन्धर्वयक्षासुरसिद्धसङ्घा वीक्षन्ते त्वां विस्मिताश्चैव सर्वे ॥ २२॥

हे रुद्रादित्यांचे मेळावे । वसु हन साध्य आघवे ।

अश्विनौ देव विश्वेदेव विभवें । वायुही हे जी ॥ ३३२ ॥

अवधारा पितर हन गंधर्व । पैल यक्षरक्षोगण सर्व ।

जी महेंद्रमुख्य देव । कां सिद्धादिक ॥ ३३३ ॥

हे आघवेचि आपुलालिया लोकीं । सोत्कंठित अवलोकीं ।

हे महामूर्ती दैविकी । पाहात आहाती ॥ ३३४ ॥

मग पाहात पाहात प्रतिक्षणीं । विस्मित होऊनि अंतःकरणीं ।

करित निजमुकटीं वोवाळणी । प्रभुजी तुज ॥ ३३५ ॥

ते जय जय घोष कलरवें । स्वर्ग गाजविताती आघवे ।

ठेवित ललाटावरी बरवे । करसंपुट ॥ ३३६ ॥

तिये विनयद्रुमाचिये आरवीं । सुरवाडली सात्त्विकांची माधवी ।

म्हणौनि करसंपुटपल्लवीं । तूं होतासि फळ ॥ ३३७ ॥

रूपं महत्ते बहुवक्त्रनेत्रं महाबाहो बहुबाहूरुपादम् ।

बहूदरं बहुदंष्ट्राकरालं दृष्ट्वा लोकाः प्रव्यथितास्तथाऽहम् ॥ २३॥

जी लोचनां भाग्य उदेलें । मना सुखाचें सुयाणें पाहलें ।

जे अगाध तुझें देखिलें । विश्वरूप इहीं ॥ ३३८ ॥

हें लोकत्रयव्यापक रूपडें । पाहतां देवांही वचक पडे ।

याचें सन्मुखपण जोडें । भलतयाकडुनी ॥ ३३९ ॥

ऐसें एकचि परी विचित्रें । आणि भयानकें वक्त्रें ।

बहुलोचन हे सशस्त्रें । अनंतभुजा ॥ ३४० ॥

अनंत चारु बाहु चरण । बहूदर आणि नानावर्ण ।

कैसें प्रतिवदनीं मातलेपण । आवेशाचें ॥ ३४१ ॥

हो कां महाकल्पाचिया अंतीं । तवकलेनि यमें जेउततेउतीं ।

प्रळयाग्नीचीं उजितीं । आंबुखिलीं जैसीं ॥ ३४२ ॥

नातरी संहारत्रिपुरारीचीं यंत्रें । कीं प्रळयभैरवाचीं क्षेत्रें ।

नाना युगांतशक्तीचीं पात्रें । भूतखिचा वोढविलीं ॥ ३४३ ॥

तैसीं जियेतियेकडे । तुझीं वक्त्रें जीं प्रचंडें ।

न समाती दरीमाजीं सिंव्हाडे । तैसे दशन दिसती रागीट ॥ ३४४ ॥

जैसें काळरात्रीचेनि अंधारें । उल्हासत निघतीं संहारखेंचरें ।

तैसिया वदनीं प्रळयरुधिरें । काटलिया दाढा ॥ ३४५ ॥

हें असो काळें अवंतिलें रण । कां सर्व संहारें मातलें मरण ।

तैसें अतिभिंगुळवाणेंपण । वदनीं तुझिये ॥ ३४६ ॥

हे बापुडी लोकसृष्टी । मोटकीये विपाइली दिठी ।

आणि दुःखकालिंदीचिया तटीं । झाड होऊनि ठेली ॥ ३४७ ॥

तुज महामृत्यूचिया सागरीं । आतां हे त्रैलोक्य जीविताची तरी ।

शोकदुर्वातलहरी । आंदोळत असे ॥ ३४८ ॥

एथ कोपोनि जरी वैकुंठें । ऐसें हन म्हणिपैल अवचटें ।

जें तुज लोकांचें काई वाटे ? । तूं ध्यानसुख हें भोगीं ॥ ३४९ ॥

तरी जी लोकांचें कीर साधारण । वायां आड सूतसे वोडण ।

केवीं सहसा म्हणे प्राण । माझेचि कांपती ॥ ३५० ॥

ज्या मज संहाररुद्र वासिपे । ज्या मजभेणें मृत्यु लपे ।

तो मी एथें अहाळबाहळीं कांपें । ऐसें तुवां केलें ॥ ३५१ ॥

परि नवल बापा हे महामारी । इया नाम विश्वरूप जरी ।

हे भ्यासुरपणें हारी । भयासि आणी ॥ ३५२ ॥

नभःस्पृशं दीप्तमनेकवर्णं व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रम् ।

दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा धृतिं न विन्दामि शमं च विष्णो ॥ २४॥

ठेलीं महाकाळेंसि हटेंतटें । तैसी किती{ए}कें मुखें रागिटें ।

इहीं वाढोनियां धाकुटें । आकाश केलें ॥ ३५३ ॥

गगनाचेंनि वाडपणें नाकळे । त्रिभुवनींचियाही वारिया न वेंटाळे ।

ययाचेनि वाफा आगी जळे । कैसें धडाडीत असे ॥ ३५४ ॥

तेवींचि एकसारिखें एक नोहे । एथ वर्णावर्णाचा भेदु आहे ।

हो कां जें प्रळयीं सावावो लाहे । वन्ह्ं ययाचा ॥ ३५५ ॥

जयाचिये आंगींची दीप्ती येवढी । जे त्रैलोक्य कीजे राखोंडी ।

कीं तयाही तोंडें आणि तोंडीं । दांत दाढा ॥ ३५६ ॥

कैसा वारया धनुर्वात चढला । समुद्र कीं महापुरीं पडिला ।

विषाग्नि मारा प्रवर्तला । वडवानळासी ॥ ३५७ ॥

हळाहळ आगी पियालें । नवल मरण मारा प्रवर्तलें ।

तैसें संहारतेजा या जाहलें । वदन देखा ॥ ३५८ ॥

परी कोणें मानें विशाळ । जैसें तुटलिया अंतराळ ।

आकाशासि कव्हळ । पडोनि ठेलें ॥ ३५९ ॥

नातरी काखे सूनि वसुंधरी । जैं हिरण्याक्षु रिगाला विवरीं ।

तैं उघडले हाटकेश्वरीं । जेवीं पाताळकुहर ॥ ३६० ॥

तैसा वक्त्रांचा विकाशु । माजीं जिव्हांचा आगळाचि आवेशु ।

विश्व न पुरे म्हणौनि घांसु । न भरीचि कोंडें ॥ ३६१ ॥

आणि पाताळव्याळांचिया फूत्कारीं । गरळज्वाळा लागती अंबरीं ।

तैसी पसरलिये वदनदरी- । माजीं हे जिव्हा ॥ ३६२ ॥

काढूनि प्रळयविजूंचीं जुंबाडें । जैसें पन्नासिलें गगनाचे हुडे ।

तैसे आवाळुवांवरी आंकडे । धगधगीत दाढांचे ॥ ३६३ ॥

आणि ललाटपटाचिये खोळे । कैसें भयातें भेडविताती डोळे ।

हो कां जे महामृत्यूचे उमाळे । कडवसां राहिले ॥ ३६४ ॥

ऐसें वाऊनि भयाचें भोज । एथ काय निपजवूं पाहातोसि काज ।

तें नेणों परी मज । मरणभय आलें ॥ ३६५ ॥

देवा विश्वरूप पहावयाचे डोहळे । केले तिये पावलों प्रतिफळें ।

बापा देखिलासि आतां डोळे । निवावे तैसे निवाले ॥ ३६६ ॥

अहो देहो पार्थिव कीर जाये । ययाची काकुळती कवणा आहे ।

परि आतां चैतन्य माझें विपायें । वांचे कीं न वांचे ॥ ३६७ ॥

एर्‍हवीं भयास्तव आंग कांपे । नावेक आगळें तरी मन तापे ।

अथवा बुद्धिही वासिपे । अभिमानु विसरिजे ॥ ३६८ ॥

परी येतुलियाही वेगळा । जो केवळ आनंदैककळा ।

तया अंतरात्मयाही निश्चळा । शियारी आली ॥ ३६९ ॥

बाप साक्षात्काराचा वेधु । कैसा देशधडी केला बोधु ।

हा गुरुशिष्यसंबंधु । विपायें नांदे ॥ ३७० ॥

देवा तुझ्या ये दर्शनीं । जें वैकल्य उपजलें आहे अंतःकरणीं ।

तें सावरावयालागीं गंवसणी । धैर्याची करितसें ॥ ३७१ ॥

तंव माझेनि नामें धैर्य हारपलें । कीं तयाहीवरी विश्वरूपदर्शन जाहलें ।

हें असो परि मज भलें आतुडविलें । उपदेशा इया ॥ ३७२ ॥

जीव विसंवावयाचिया चाडा । सैंघ धांवाधांवी करितसे बापुडा ।

परि सोयही कवणेंकडां । न लभे एथ ॥ ३७३ ॥

ऐसें विश्वरूपाचिया महामारी । जीवित्व गेलें आहें चराचरीं ।

जी न बोलें तरि काय करीं । कैसेनि राहें ? ॥ ३७४ ॥

दंष्ट्राकरालानि च ते मुखानि दृष्ट्वैव कालानलसन्निभानि ।

दिशो न जाने न लभे च शर्म प्रसीद देवेश जगन्निवास ॥ २५॥

पैं अखंड डोळ्यांपुढें । फुटलें जैसें महाभयाचें भांडें ।

तैशीं तुझीं मुखें वितंडें । पसरलीं देखें ॥ ३७५ ॥

असो दांत दाढांची दाटी । न झांकवे मा दों दों वोठीं ।

सैंघ प्रळयशस्त्रांचिया दाट कांटी । लागलिया जैशा ॥ ३७६ ॥

जैसें तक्षका विष भरलें । हो कां जे काळरात्रीं भूत संचरलें ।

कीं आग्नेयास्त्र परजिलें । वज्राग्नि जैसें ॥ ३७७ ॥

तैशीं तुझीं वक्त्रें प्रचंडें । वरि आवेश हा बाहेरी वोसंडे ।

आले मरणरसाचे लोंढे । आम्हांवरी ॥ ३७८ ॥

संहारसमयींचा चंडानिळु । आणि महाकल्पांत प्रळयानळु ।

या दोहीं जैं होय मेळु । तैं काय एक न जळे ? ॥ ३७९ ॥

तैसीं संहारकें तुझीं मुखें । देखोनि धीरु कां आम्हां पारुखे ? ।

आतां भुललों मी दिशा न देखें । आपणपें नेणें ॥ ३८० ॥

मोटकें विश्वरूप डोळां देखिलें । आणि सुखाचें अवर्षण पडिलें ।

आतां जापाणीं जापाणीं आपुलें । अस्ताव्यस्त हें ॥ ३८१ ॥

ऐसें करिसी म्हणौनि जरी जाणें । तरी हे गोष्टी सांगावीं कां मी म्हणें ।

आतां एक वेळ वांचवी जी प्राणें । या स्वरूपप्रळयापासोनि ॥ ३८२ ॥

जरी तूं गोसावी आमुचा अनंता । तरी सुईं वोडण माझिया जीविता ।

सांटवीं पसारा हा मागुता । महामारीचा ॥ ३८३ ॥

आइकें सकळ देवांचिया परदेवते । तुवां चैतन्यें गा विश्व वसतें ।

तें विसरलासी हें उपरतें । संहारूं आदरिलें ॥ ३८४ ॥

म्हणौनि वेगीं प्रसन्न होईं देवराया । संहरीं संहरीं आपुली माया ।

काढीं मातें महाभया- । पासोनियां ॥ ३८५ ॥

हा ठायवरी पुढतपुढतीं । तूंतें म्हणिजे बहुवा काकुळती ।

ऐसा मी विश्वमूर्ती । भेडका जाहलों ॥ ३८६ ॥

जैं अमरावतीये आला धाडा । तैं म्यां एकलेनि केला उवेडा ।

जो मी काळाचियाही तोंडा । वासिपु न धरीं ॥ ३८७ ॥

परी तया आंतुल नव्हे हें देवा । एथ मृत्यूसही करूनि चढावा ।

तुवां आमुचाचि घोटू भरावा । या सकळ विश्वेंसीं ॥ ३८८ ॥

कैसा नव्हता प्रळयाचा वेळु । गोखा तूंचि मिनलासि काळु ।

बापुडा हा त्रिभुवनगोळु । अल्पायु जाहला ॥ ३८९ ॥

अहा भाग्या विपरीता । विघ्न उठिलें शांत करितां ।

कटाकटा विश्व गेलें आतां । तूं लागलासि ग्रासूं ॥ ३९० ॥

हें नव्हे मा रोकडें । सैंघ पसरूनियां तोंडें ।

कवळितासि चहूंकडे । सैन्यें इयें ॥ ३९१ ॥

अमी च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्राः सर्वे सहैवावनिपालसङ्घैः ।

भीष्मो द्रोणः सूतपुत्रस्तथाऽसौ सहास्मदीयैरपि योधमुख्यैः ॥ २६॥

नोहेति ? हे कौरवकुळींचे वीर । आंधळिया धृतराष्ट्राचे कुमर ।

हे गेले गेले सहपरिवार । तुझिया वदनीं ॥ ३९२ ॥

आणि जे जे यांचेनि सावायें । आले देशोदेशींचे राये ।

तयांचें सांगावया जावों न लाहे । ऐसें सरकटित आहासी ॥ ३९३ ॥

मदमुखाचिया संघटा । घेत आहासि घटघटां ।

आरणीं हन थाटा । देतासि मिठी ॥ ३९४ ॥

जंत्रावरिचील मार । पदातींचे मोगर ।

मुखाआंत भार । हारपताति मा ॥ ३९५ ॥

कृतांताचिया जावळी । जें एकचि विश्वातें गिळी ।

तियें कोटीवरी सगळीं । गिळितासि शस्त्रें ॥ ३९६ ॥

चतुरंगा परिवारा । संजोडियां रहंवरां ।

दांत न लाविसी मा परमेश्वरा । कसा तुष्टलासि बरवा ॥ ३९७ ॥

हां गा भीष्मा{ऐ}सा कवणु । सत्यशौर्यनिपुणु ।

तोही आणि ब्राह्मण द्रोणु । ग्रासिलासि कटकटा ॥ ३९८ ॥

अहा सहस्रकराचा कुमरु । एथ गेला गेला कर्णवीरु ।

आणि आमुचिया आघवयांचा केरु । फेडिला देखें ॥ ३९९ ॥

कटकटा धातया । कैसें जाहलें अनुग्रहा यया ।

मियां प्रार्थूनि जगा बापुडिया । आणिलें मरण ॥ ४०० ॥

मागां थोडिया बहुवा उपपत्ती । येणें सांगितलिया विभूती ।

तैसा नसेचि मा पुढती । बैसलों पुसों ॥ ४०१ ॥

म्हणौनि भोग्य तें त्रिशुद्धी न चुके । आणि बुद्धिही होणारासारिखी ठाके ।

माझ्या कपाळीं पिटावें लोकें । तें लोटेल कांह्यां ॥ ४०२ ॥

पूर्वीं अमृतही हातां आलें । परी देव नसतीचि उगले ।

मग काळकूट उठविलें । शेवटीं जैसें ॥ ४०३ ॥

परी तें एकबगीं थोडें । केलिया प्रतिकारामाजिवडें ।

आणि तिये अवसरीचें तें सांकडें । निस्तरविलें शंभू ॥ ४०४ ॥

आतां हा जळतां वारा कें वेंटाळे ? । कोणा हे विषा भरलें गगन गिळे ? ।

महाकाळेंसि कें खेळें ? । आंगवत असे ॥ ४०५ ॥

ऐसा अर्जुन दुःखें शिणतु । शोचित असे जिवाआंतु ।

परी न देखें तो प्रस्तुतु । अभिप्राय देवाचा ॥ ४०६ ॥

जे मी मारिता हे कौरव मरते । ऐसेनि वेंटाळिला होता मोहें बहुतें ।

तो फेडावयालागीं अनंतें । हें दाखविलें निज ॥ ४०७ ॥

अरे कोण्ही कोणातें न मारी । एथ मीचि हो सर्व संहारीं ।

हें विश्वरूपव्याजें हरी । प्रकटित असे ॥ ४०८ ॥

परी वायांचि व्याकुलता । ते न चोजवेचि पंडुसुता ।

मग अहा कंपु नव्हता । वाढवित असे ॥ ४०९ ॥

वक्त्राणि ते त्वरमाणा विशन्ति दंष्ट्राकरालानि भयानकानि ।

केचिद्विलग्ना दशनान्तरेषु संदृश्यन्ते चूर्णितैरुत्तमाङ्गैः ॥ २७॥

तेथ म्हणे पाहा हो एके वेळे । सासिकवचेंसि दोन्ही दळें ।

वदनीं गेलीं आभाळें । गगनीं कां जैसीं ॥ ४१० ॥

कां महाकल्पाचिया शेवटीं । जैं कृतांतु कोपला होय सृष्टी ।

तैं एकविसांही स्वर्गां मिठी । पाताळासकट दे ॥ ४११ ॥

नातरी उदासीनें दैवें । संचकाचीं वैभवें ।

जेथींचीं तेथ स्वभावें । विलया जाती ॥ ४१२ ॥

तैसीं सासिन्नलीं सैन्यें एकवटें । इये मुखीं जाहलीं प्रविष्टें ।

परी एकही तोंडौनि न सुटे । कैसें कर्म देखा ॥ ४१३ ॥

अशोकाचे अंगवसे । चघळिले कर्‍हेनि जैसे ।

लोक वक्त्रामाजीं तैसे । वायां गेले ॥ ४१४ ॥

परि सिसाळें मुकुटेंसीं । पडिली दाढांचे सांडसीं ।

पीठ होत कैसीं । दिसत आहाती ॥ ४१५ ॥

तियें रत्‍नें दांतांचिये सवडीं । कूट लागलें जिभेच्या बुडीं ।

कांहीं कांहीं आगरडीं । द्रंष्ट्रांचीं माखलीं ॥ ४१६ ॥

हो कां जे विश्वरूपें काळें । ग्रासिलीं लोकांचीं शरीरें बळें ।

परि जीवित्व देहींचीं सिसाळें । अवश्य कीं राखिलीं ॥ ४१७ ॥

तैसीं शरीरामाजीं चोखडीं । इयें उत्तमांगें होतीं फुडीं ।

म्हणौनि महाकाळाचियाही तोंडीं । परि उरलीं शेखीं ॥ ४१८ ॥

मग म्हणे हें काई । जन्मलयां आन मोहरचि नाहीं ।

जग आपैसेंचि वदनडोहीं । संचारताहे ॥ ४१९ ॥

यया आपेंआप आघविया सृष्टी । लागलिया आहाति वदनाच्या वाटीं ।

आणि हा जेथिंचिया तेथ मिठी । देतसे उगला ॥ ४२० ॥

ब्रह्मादिक समस्त । उंचा मुखामाजीं धांवत ।

येर सामान्य हे भरत । ऐलीच वदनीं ॥ ४२१ ॥

आणीकही भूतजात । तें उपजलेचि ठायीं ग्रासित ।

परि याचिया मुखा निभ्रांत । न सुटेचि कांहीं ॥ ४२२ ॥

यथा नदीनाम् बहवोऽम्बुवेगाः समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति ।

तथा तवामी नरलोकवीरा विशन्ति वक्त्राण्यभिविज्वलन्ति ॥ २८॥

जैसे महानदीचे वोघ । वहिले ठाकिती समुद्राचें आंग ।

तैसें आघवाचिकडूनि जग । प्रवेशत मुखीं ॥ ४२३ ॥

आयुष्यपंथें प्राणिगणी । करोनि अहोरात्रांची मोवणी ।

वेगें वक्त्रामिळणीं । साधिजत आहाती ॥ ४२४ ॥

यथा प्रदीप्तं ज्वलनं पतङ्गा विशन्ति नाशाय समृद्धवेगाः ।

तथैव नाशाय विशन्ति लोका स्तवापि वक्त्राणि समृद्धवेगाः ॥ २९॥

जळतया गिरीच्या गवखा- । माजीं घापती पतंगाचिया झाका ।

तैसे समग्र लोक देखा । इये वदनीं पडती ॥ ४२५ ॥

परि जेतुलें येथ प्रवेशलें । तें तातलिया लोहें पाणीचि पां गिळिलें ।

वहवटींहि पुसिलें । नामरूप तयांचें ॥ ४२६ ॥

लेलिह्यसे ग्रसमानः समन्ताल्लोकान्समग्रान्वदनैर्ज्वद्भिः ।

तेजोभिरापूर्य जगत्समग्रं भासस्तवोग्राः प्रतपन्ति विष्णो ॥ ३०॥

आणि येतुलाही आरोगण । करितां भुके नाहीं उणेपण ।

कैसें दीपन असाधारण । उदयलें यया ॥ ४२७ ॥

जैसा रोगिया ज्वराहूनि उठिला । का भणगा दुकाळु पाहला ।

तैसा जिभांचा लळलळाटु देखिला । आवाळुवें चाटितां ॥ ४२८ ॥

तैसें आहाराचे नांवें कांहीं । तोंडापासूनि उरलेंचि नाहीं ।

कैसी समसमीत नवाई । भुकेलेपणाची ॥ ४२९ ॥

काय सागराचा घोंटु भरावा ? । कीं पर्वताचा घांसु करावा ? ।

ब्रह्मकटाहो घालावा । आघवाचि दाढे ॥ ४३० ॥

दिशा सगळियाचि गिळाविया । चांदिणिया चाटूनि घ्याविया ।

ऐसें वर्तत आहे साविया । लोलुप्य बा तुझें ॥ ४३१ ॥

जैसा भोगीं कामु वाढे । कां इंधनें आगीसि हाकाक चढे ।

तैसी खातखातांचि तोंडें । खाखांतें ठेलीं ॥ ४३२ ॥

कैसें एकचि केवढें पसरलें । त्रिभुवन जिव्हाग्रीं आहे टेकलें ।

जैसें कां कवीठ घातलें । वडवानळीं ॥ ४३३ ॥

ऐसीं अपार वदनें । आतां येतुलीं कैंचीं त्रिभुवनें ।

कां आहारु न मिळतां येणें मानें । वाढविलीं सैंघ ॥ ४३४ ॥

अगा हा लोकु बापुडा । जाहला वदनज्वाळां वरपडा ।

जैसी वणवेयाचिया वेढां । सांपडती मृगें ॥ ४३५ ॥

आतां तैसें यां विश्वा जाहालें । देव नव्हे हें कर्म आलें ।

कां जग चळचळां पांगिलें । काळजाळें ॥ ४३६ ॥

आतां इये अंगप्रभेचिये वागुरे । कोणीकडूनि निगिजैल चराचरें ।

हीं वक्त्रें नोहेती जोहारें । वोडवलीं जगा ॥ ४३७ ॥

आगी आपुलेनि दाहकपणें । कैसेनि पोळिजे तें नेणे ।

परी जया लागे तया प्राणें । सुटिकाची नाहीं ॥ ४३८ ॥

नातरी माझेनि तिखटपणें । कैसें निवटे हें शस्त्र कायि जाणें ।

कां आपुलियां मारा नेणें । विष जैसें ॥ ४३९ ॥

तैसी तुज कांहीं । आपुलिया उग्रपणाची सेचि नाहीं ।

परी ऐलीकडिले मुखीं खाई । हो सरली जगाची ॥ ४४० ॥

अगा आत्मा तूं एकु । सकळ विश्वव्यापकु ।

तरी कां आम्हां अंतकु । तैसा वोडवलासी ? ॥ ४४१ ॥

तरी मियां सांडिली जीवित्वाची चाड । आणि तुवांही न धरावी भीड ।

मनीं आहे तें उघड । बोल पां सुखें ॥ ४४२ ॥

किती वाढविसी या उग्ररूपा । आंगींचें भगवंतपण आठवीं बापा ।

नाहीं तरी कृपा । मजपुरती पाही ॥ ४४३ ॥

आख्याहि मे को भवानुग्ररूपो नमोऽस्तु ते देववर प्रसीद ।

विज्ञातुमिच्छामिभवन्तमाद्यं न हि प्रजानामि तव प्रवृत्तिम् ॥ ३१॥

तरी एक वेळ वेदवेद्या । जी त्रिभुवनैक आद्या ।

विनवणी विश्ववंद्या । आइकें माझी ॥ ४४४ ॥

ऐसें बोलोनि वीरें । चरण नमस्कारिलें शिरें ।

मग म्हणें तरी सर्वेश्वरें । अवधारिजो ॥ ४४५ ॥

मियां होआवया समाधान । जी पुसिलें विश्वरूपध्यान ।

आणि एकेंचि काळें त्रिभुवन । गिळितुचि उठिलासी ॥ ४४६ ॥

तरी तूं कोण कां येतुलीं । इयें भ्यासुरें मुखें कां मेळविलीं ।

आघवियाचि करीं परिजिलीं । शस्त्रें कांह्या ॥ ४४७ ॥

जी जंव तंव रागीटपणें । वाढोनि गगना आणितोसि उणें ।

कां डोळे करूनि भिंगुळवाणे । भेडसावीत आहासी ॥ ४४८ ॥

एथ कृतांतेंसि देवा । कासया किजतसे हेवा ।

हा आपुला तुवां सांगावा । अभिप्राय मज ॥ ४४९ ॥

या बोला म्हणे अनंतु । मी कोण हें आहासी पुसतु ।

आणि कायिसयालागीं असे वाढतु । उग्रतेसी ॥ ४५० ॥

श्रीभगवानुवाच ।

कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः ॥

ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे येऽवस्थिताः प्रत्यनीकेषु योधाः ॥ ३२॥

तरी मी काळु गा हें फुडें । लोक संहारावयालागीं वाढें ।

सैंघ पसरिलीं आहातीं तोंडें । आतां ग्रासीन हें आघवें ॥ ४५१ ॥

एथ अर्जुन म्हणे कटकटा । उबगिलों मागिल्या संकटा ।

म्हणौनि आळविला तंव वोखटा । उवाइला हा ॥ ४५२ ॥

तेवींचि कठिण बोलें आसतुटी । अर्जुन होईल हिंपुटी ।

म्हणौनि सवेंचि म्हणे किरीटी । परि आन एक असे ॥ ४५३ ॥

तरी आतांचिये संहारवाहरे । तुम्हीं पांडव असा बाहिरे ।

तेथ जातजातां धनुर्धरें । सांवरिले प्राण ॥ ४५४ ॥

होता मरणमहामारीं गेला । तो मागुता सावधु जाहला ।

मग लागला बोला । चित्त देऊं ॥ ४५५ ॥

ऐसें म्हणिजत आहे देवें । अर्जुना तुम्ही माझें हें जाणावें ।

येर जाण मी आघवें । सरलों ग्रासूं ॥ ४५६ ॥

वज्रानळीं प्रचंडीं । जैसी घापे लोणियाची उंडी ।

तैसें जग हें माझिया तोंडीं । तुवां देखिलें जें ॥ ४५७ ॥

तरी तयामाझारीं कांहीं । भरंवसेनि उणें नाहीं ।

इये वायांचि सैन्यें पाहीं । बरवतें आहाती ॥ ४५८ ॥

ऐसा चतुरंगाचिया संपदा । करित महाकाळेंसीं स्पर्धा ।

वांटिवेचिया मदा । वघळले जे ॥ ४५९ ॥

हे जे मिळोनियां मेळे । कुंथती वीरवृत्तीचेनि बळें ।

यमावरी गजदळें । वाखाणिजताती ॥ ४६० ॥

म्हणती सृष्टीवरी सृष्टी करूं । आण वाहूनि मृत्यूतें मारूं ।

आणि जगाचा भरूं । घोंटु यया ॥ ४६१ ॥

पृथ्वी सगळीचि गिळूं । आकाश वरिच्यावरी जाळूं ।

कां बाणवरी खिळूं । वारयातें ॥ ४६२ ॥

बोल हतियेराहूनि तिखट । दिसती अग्निपरिस दासट ।

मारकपणें काळकूट । महुर म्हणत ॥ ४६३ ॥

तरी हे गंधर्वनगरींचे उमाळे । जाण पोकळीचे पेंडवळें ।

अगा चित्रीव फळें । वीर हे देखें ॥ ४६४ ॥

हां गा मृगजळाचा पूर आला । दळ नव्हे कापडाचा साप केला ।

इया शृंगारूनियां खाला । मांडिलिया पैं ॥ ४६५ ॥

तस्मात्त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून्भुंक्ष्व राज्यं समृद्धम् ।

मयैवैते निहताः पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन् ॥ ३३॥

येर चेष्टवितें जें बळ । तें मागांचि मियां ग्रासिलें सकळ ।

आतां कोल्हारिचे वेताळ । तैसे निर्जीव हे आहाती ॥ ४६६ ॥

हालविती दोरी तुटली । तरी तियें खांबावरील बाहुलीं ।

भलतेणें लोटिलीं । उलथोनि पडती ॥ ४६७ ॥

तैसा सैन्याचा यया बगा । मोडतां वेळू न लगेल पैं गा ।

म्हणौनि उठीं उठीं वेगां । शाहाणा होईं ॥ ४६८ ॥

तुवां गोग्रहणाचेनि अवसरें । घातलें मोहनास्त्र एकसरें ।

मग विराटाचेनि महाभेडें उत्तरें । आसडूनि नागाविलें ॥ ४६९ ॥

आतां हें त्याहूनि निपटारें जहालें । निवटीं आयितें रण पडिलें ।

घेईं यश रिपु जिंतिले । एकलेनि अर्जुनें ॥ ४७० ॥

आणि कोरडें यशचि नोहे । समग्र राज्यही आलें आहे ।

तूं निमित्तमात्रचि होयें । सव्यसाची ॥ ४७१ ॥

द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च कर्णां तथान्यानपि योधवीरान् ।

मया हतांस्त्वं जहि मा व्यथिष्ठा युध्यस्व जेतासि रणे सपत्‍नान् ॥ ३४॥

द्रोणाचा पाडु न करीं । भीष्माचें भय न धरीं ।

कैसेनि कर्णावरी । परजूं हें न म्हण ॥ ४७२ ॥

कोण उपायो जयद्रथा कीजे । हें न चिंतूं चित्त तुझें ।

आणिकही आथि जे जे । नावाणिगे वीर ॥ ४७३ ॥

तेही एक एक आघवें । चित्रींचे सिंहाडे मानावे ।

जैसे वोलेनि हातें घ्यावें । पुसोनियां ॥ ४७४ ॥

यावरी पांडवा । काइसा युद्धाचा मेळावा ? ।

हा आभासु गा आघवा । येर ग्रासिलें मियां ॥ ४७५ ॥

जेव्हां तुवां देखिले । हे माझिया वदनीं पडिले ।

तेव्हांचि यांचें आयुष्य सरलें । आतां रितीं सोपें ॥ ४७६ ॥

म्हणौनि वहिला उठीं । मियां मारिले तूं निवटीं ।

न रिगे शोकसंकटीं । नाथिलिया ॥ ४७७ ॥

आपणचि आडखिळा कीजे । तो कौतुकें जैसा विंधोनि पाडिजे ।

तैसें देखें गा तुझें । निमित्त आहे ॥ ४७८ ॥

बापा विरुद्ध जें जाहलें । तें उपजतांचि वाघें नेलें ।

आतां राज्येंशीं संचलें । यश तूं भोगीं ॥ ४७९ ॥

सावियाचि उतत होते दायाद । आणि बळिये जगीं दुर्मद ।

ते वधिले विशद । सायासु न लागतां ॥ ४८० ॥

ऐसिया इया गोष्टी । विश्वाच्या वाक्पटीं ।

लिहूनि घाली किरीटी । जगामाजीं ॥ ४८१ ॥

संजय उवाच ।

एतच्छ्रुत्वा वचनं केशवस्य कृताञ्जलिर्वेपमानः किरीटी ॥

नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं सगद्‍गदं भीतभीतः प्रणम्य ॥ ३५॥

ऐसी आघवीचि हे कथा । तया अपूर्ण मनोरथा ।

संजयो सांगे कुरुनाथा । ज्ञानदेवो म्हणे ॥ ४८२ ॥

मग सत्यलोकौनि गंगाजळ । सुटलिया वाजत खळाळ ।

तैशी वाचा विशाळ । बोलतां तया ॥ ४८३ ॥

नातरी महामेघांचे उमाळे । घडघडीत एके वेळे ।

कां घुमघुमिला मंदराचळें । क्षीराब्धी जैसा ॥ ४८४ ॥

तैसें गंभीरें महानादें । हें वाक्य विश्वकंदें ।

बोलिलें अगाधें । अनंतरूपें ॥ ४८५ ॥

तें अर्जुनें मोटकें ऐकिलें । आणि सुख कीं भय दुणावलें ।

हें नेणों परि कांपिन्नलें । सर्वांग तयाचें ॥ ४८६ ॥

सखोलपणें वळली मोट । आणि तैसेचि जोडले करसंपुट ।

वेळोवेळां ललाट । चरणीं ठेवी ॥ ४८७ ॥

तेवींचि कांहीं बोलों जाये । तंव गळा बुजालाचि ठाये ।

हें सुख कीं भय होये । हें विचारा तुम्हीं ॥ ४८८ ॥

परि तेव्हां देवाचेनि बोलें । अर्जुना हें ऐसें जाहलें ।

मियां पदांवरूनि देखिलें । श्लोकींचिया ॥ ४८९ ॥

मग तैसाचि भेणभेण । पुढती जोहारूनि चरण ।

मग म्हणे जी आपण । ऐसें बोलिलेती ॥ ४९० ॥

अर्जुन उवाच ।

स्थाने हृषीकेश तव प्रकीर्त्या जगत्प्रहृष्यत्यनुरज्यते च ॥

रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्धसंघाः ॥ ३६॥

ना तरी अर्जुना मी काळु । आणि ग्रासिजे तो माझा खेळु ।

हा बोलु तुझा कीर अढळु । मानूं आम्ही ॥ ४९१ ॥

परि तुवां जी काळें । आजि स्थितीचिये वेळे ।

ग्रासिजे हें न मिळे । विचारासी ॥ ४९२ ॥

कैसेनि आंगींचें तारुण्य काढावें ? । कैचें नव्हे तें वार्धक्य आणावें ? ।

म्हणौनि करूं म्हणसी तें नव्हे । बहुतकरुनी ॥ ४९३ ॥

हां जी चौपाहारी न भरतां । कोणेही वेळे श्रीअनंता ।

काय माध्यान्हीं सविता । मावळतु आहे ? ॥ ४९४ ॥

पैं तुज अखंडिता काळा । तिन्ही आहाती जी वेळा ।

त्या तिन्ही परी सबळा । आपुलालिया समयीं ॥ ४९५ ॥

जे वेळीं हों लागे उत्पत्ती । ते वेळीं स्थिति प्रळयो हारपती ।

आणि स्थितिकाळीं न मिरविती । उत्पत्ति प्रळयो ॥ ४९६ ॥

पाठीं प्रळयाचिये वेळे । उत्पत्ति स्थिति मावळे ।

हें कायसेनही न ढळे । अनादि ऐसें ॥ ४९७ ॥

म्हणौनि आजि तंव भरें भोगें । स्थिति वर्तिजत आहे जगें ।

एथ ग्रसिसी तूं हें न लगे । माझ्या जीवीं ॥ ४९८ ॥

तंव संकेतें देव बोले । अगा या दोन्ही सैन्यांसीचि मरण पुरलें ।

तें प्रत्यक्षचि तुज दाविलें । येर यथाकाळें जाण ॥ ४९९ ॥

हा संकेतु जंव अनंता । वेळु लागला बोलतां ।

तंव अर्जुनें लोकु मागुता । देखिला यथास्थिति ॥ ५०० ॥

मग म्हणतसे देवा । तूं सूत्रीं विश्वलाघवा ।

जग आला मा आघवा । पूर्वस्थिति पुढती ॥ ५०१ ॥

परी पडिलिया दुःखसागरीं । तूं काढिसी कां जयापरी ।

ते कीर्ति तुझी श्रीहरी । आठवित असे ॥ ५०२ ॥

कीर्ति आठवितां वेळोवेळां । भोगितसें महासुखाचा सोहळा ।

तेथ हर्षामृतकल्लोळा । वरी लोळत आहें ॥ ५०३ ॥

देवा जियालेपणें जग । धरी तुझ्या ठायीं अनुराग ।

आणि दुष्टां तयां भंग । अधिकाधिक ॥ ५०४ ॥

पैं त्रिभुवनींचिया राक्षसां । महाभय तूं हृषीकेशा ।

म्हणौनि पळताती दाही दिशां । पैलीकडे ॥ ५०५ ॥

येथ सुर नर सिद्ध किन्नर । किंबहुना चराचर ।

ते तुज देखोनि हर्षनिर्भर । नमस्कारित असती ॥ ५०६ ॥

कस्माच्च ते न नमेरन्महात्मन् गरीयसे ब्रह्मणोऽप्यादिकर्त्रे ।

अनन्त देवेश जगन्निवास त्वमक्षरं सदसत्तत्परं यत् ॥ ३७॥

एथ गा कवणा कारणा । राक्षस हे नारायणा ।

न लगतीचि चरणा । पळते जाहले ॥ ५०७ ॥

आणि हें काय तूंतें पुसावें । येतुलें आम्हांसिही जाणवे ।

तरी सूर्योदयीं राहावें । कैसेनि तमें ? ॥ ५०८ ॥

जी तूं प्रकाशाचा आगरु । आणि जाहला आम्हासि गोचरू ।

म्हणौनिया निशाचरां केरु । फिटला सहजें ॥ ५०९ ॥

हें येतुले दिवस आम्हां । कांहीं नेणवेचि श्रीरामा ।

आतां देखतसों महिमा । गंभीर तुझा ॥ ५१० ॥

जेथूनि नाना सृष्टींचिया वोळी । पसरती भूतग्रामाचिया वेली ।

तया महद्‍ब्रह्मातें व्याली । दैविकी इच्छा ॥ ५११ ॥

देवो निःसीम तत्त्व सदोदितु । देवो निःसीम गुण अनंतु ।

देवो निःसीम साम्य सततु । नरेंद्र देवांचा ॥ ५१२ ॥

जी तूं त्रिजगतिये वोलावा । अक्षर तूं सदाशिवा ।

तूंचि सदसत् देवा । तयाही अतीत तें तूं ॥ ५१३ ॥

त्वमादिदेवः पुरुषः पुराणस्त्वमस्य विश्वस्य परं निधानम् ।

वेत्तासि वेद्यं च परं च धाम त्वया ततं विश्वमनन्तरूप ॥ ३८॥

तूं प्रकृतिपुरुषांचिया आदी । जी महत्तत्वां तूंचि अवधी ।

स्वयें तूं अनादि । पुरातनु ॥ ५१४ ॥

तूं सकळ विश्वजीवन । जीवांसि तूंचि निधान ।

भूतभविष्याचें ज्ञान । तुझ्याचि हातीं ॥ ५१५ ॥

जी श्रुतीचियां लोचनां । स्वरूपसुख तूंचि अभिन्ना ।

त्रिभुवनाचिया आयतना । आयतन तूं ॥ ५१६ ॥

म्हणौनि जी परम । तूंतें म्हणिजे महाधाम ।

कल्पांतीं महद्‍ब्रह्म । तुजमाजीं रिगे ॥ ५१७ ॥

किंबहुना तुवां देवें । विश्व विस्तारिलें आहे आघवें ।

तरि अनंतरूपा वानावें । कवणें तूंतें ॥ ५१८ ॥

वायुर्यमोग्निर्वरुणः शशाङ्कः प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च ।

नमो नमस्तेऽस्तुसहस्रकृत्वः पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते ॥ ३९॥

नमः पुरस्तादथ पृष्ठतस्ते नमोऽस्तु ते सर्वत एव सर्व ।

अनन्तवीर्यामितविक्रमस्त्वं सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वः ॥ ४०॥

जी काय एक तूं नव्हसी । कवणे ठायीं नससी ।

हें असो जैसा आहासी । तैसिया नमो ॥ ५१९ ॥

वायु तूं अनंता । यम तूं नियमिता ।

प्राणिगणीं वसता । अग्नि तो तूं ॥ ५२० ॥

वरुण तूं सोम । स्रष्टा तूं ब्रह्म ।

पितामहाचाही परम । आदि जनक तूं ॥ ५२१ ॥

आणिकही जें जें कांहीं । रूप आथि अथवा नाहीं ।

तया नमो तुज तैसयाही । जगन्नाथा ॥ ५२२ ॥

ऐसें सानुरागें चित्तें । नमन केलें पंडुसुतें ।

मग पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो ॥ ५२३ ॥

पाठीं तिये साद्यंते । न्याहाळी श्रीमूर्तीतें ।

आणि पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो ॥ ५२४ ॥

पाहतां पाहतां प्रांतें । समाधान पावे चित्तें ।

आणि पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो ॥ ५२५ ॥

इये चराचरीं जीं भूतें । सर्वत्र देखे तयांतें ।

आणि पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो ॥ ५२६ ॥

ऐसीं रूपें तियें अद्‍भुतें । आश्चर्यें स्फुरती अनंतें ।

तंव तंव नमस्ते । नमस्तेचि म्हणे ॥ ५२७ ॥

आणिक स्तुतिही नाठवे । आणि निवांतुही न बैसवे ।

नेणें कैसा प्रेमभावें । गाजोंचि लागे ॥ ५२८ ॥

किंबहुना इयापरी । नमन केलें सहस्रवरी ।

कीं पुढती म्हणे श्रीहरी । तुज सन्मुखा नमो ॥ ५२९ ॥

देवासि पाठी पोट आथि कीं नाहीं । येणें उपयोगु आम्हां काई ।

तरि तुज पाठिमोरेयाही । नमो स्वामी ॥ ५३० ॥

उभा माझिये पाठीसीं । म्हणौनि पाठीमोरें म्हणावें तुम्हांसी ।

सन्मुख विन्मुख जगेंसीं । न घडें तुज ॥ ५३१ ॥

आतां वेगळालिया अवयवां । नेणें रूप करूं देवा ।

म्हणौनि नमो तुज सर्वा । सर्वात्मका ॥ ५३२ ॥

जी अनंतबळसंभ्रमा । तुज नमो अमित विक्रमा ।

सकळकाळीं समा । सर्वरूपा ॥ ५३३ ॥

आघविया आकाशीं जैसें । अवकाशचि होऊनि आकाश असे ।

तूं सर्वपणें तैसें । पातलासि सर्व ॥ ५३४ ॥

किंबहुना केवळ । सर्व हें तूंचि निखिळ ।

परी क्षीरार्णवीं कल्लोळ । पयाचे जैसे ॥ ५३५ ॥

म्हणौनिया देवा । तूं वेगळा नव्हसी सर्वां ।

हें आलें मज सद्‍भावा । आतां तूंचि सर्व ॥ ५३६ ॥

सखेति मत्वा प्रसभं यदुक्तं हे कृष्ण हे यादव हे सखेति ।

अजानता महिमानं तवेदं मया प्रमादात्प्रणयेन वापि ॥ ४१॥

परि ऐसिया तूतें स्वामी । कहींच नेणों जी आम्ही ।

म्हणौनि सोयरे संबंधधर्मीं । राहाटलों तुजसीं ॥ ५३७ ॥

अहा थोर वाउर जाहलें । अमृतें संमार्जन म्यां केलें ।

वारिकें घेऊनि दिधलें । कामधेनूतें ॥ ५३८ ॥

परिसाचा खडवाचि जोडला । कीं फोडोनि आम्ही गाडोरा घातला ।

कल्पतरू तोडोनि केला । कूंप शेता ॥ ५३९ ॥

चिंतामणीची खाणी लागली । तेणें करें वोढाळें वोल्हांडिली ।

तैसी तुझी जवळिक धाडिली । सांगातीपणें ॥ ५४० ॥

हें आजिचेंचि पाहें पां रोकडें । कवण झुंज हें केवढें ।

एथ परब्रह्म तूं उघडें । सारथी केलासी ॥ ५४१ ॥

यया कौरवांचिया घरा । शिष्टाई धाडिलासि दातारा ।

ऐसा वणिजेसाठीं जागेश्वरा । विकलासि आम्हीं ॥ ५४२ ॥

तूं योगियांचें समाधिसुख । कैसा जाणेचिना मी मूर्ख ।

उपरोधु जी सन्मुख । तुजसीं करूं ॥ ५४३ ॥

यच्चावहासार्थमसत्कृतोऽसि विहारशय्यासनभोजनेषु ।

एकोऽथवाप्यच्युत तत्समक्षं तत्क्षामये त्वामहमप्रमेयम् ॥ ४२॥

तूं या विश्वाची अनादि आदी । बैससी जिये सभासदीं ।

तेथें सोयरीकीचिया संबंधीं । रळीं बोलों ॥ ५४४ ॥

विपायें राउळा येवों । तरि तुझेनि अंगें मानु पावों ।

न मानिसी तरी जावों । रुसोनि सलगी ॥ ५४५ ॥

पायां लागोनि बुझावणी । तुझ्या ठायीं शारङ्गपाणी ।

पाहिजे ऐशी करणी । बहु केली आम्हीं ॥ ५४६ ॥

सजणपणाचिया वाटा । तुजपुढें बैसें उफराटा ।

हा पाडु काय वैकुंठा ? । परि चुकलों आम्हीं ॥ ५४७ ॥

देवेंसि कोलकाठी धरूं । आखाडा झोंबीलोंबी करूं ।

सारी खेळतां आविष्करूं । निकरेंही भांडों ॥ ५४८ ॥

चांग तें उराउरीं मागों । देवासि कीं बुद्धि सांगों ।

तेवींचि म्हणों काय लागों । तुझें आम्ही ॥ ५४९ ॥

ऐसा अपराधु हा आहे । जो त्रिभुवनीं न समाये ।

जी नेणतांचि कीं पाये । शिवतिले तुझे ॥ ५५० ॥

देवो बोनयाच्या अवसरीं । लोभें कीर आठवण करी ।

परी माझा निसुग गर्व अवधारीं । जे फुगूनचि बैसें ॥ ५५१ ॥

देवाचिया भोगायतनीं । खेळतां आशंकेना मनीं ।

जी रिगोनियां शयनीं । सरिसा पहुडें ॥ ५५२ ॥

'कृष्ण म्हणौनि हाकारिजे । यादवपणें तूंतें लेखिजे ।

आपली आण घालिजे । जातां तुज ॥ ५५३ ॥

मज एकासनीं बैसणें । कां तुझा बोलु न मानणें ।

हें वोतटीचेनि दाटपणें । बहुत घडलें ॥ ५५४ ॥

म्हणौनि काय काय आतां । निवेदिजेल अनंता ।

मी राशि आहें समस्तां । अपराधांचि ॥ ५५५ ॥

यालागीं पुढां अथवा पाठीं । जियें राहटलों बहुवें वोखटीं ।

तियें मायेचिया परी पोटीं । सामावीं प्रभो ॥ ५५६ ॥

जी कोण्ही एके वेळे । सरिता घेऊन येती खडुळें ।

तियें सामाविजेति सिंधुजळें । आन उपायो नाहीं ॥ ५५७ ॥

तैसी प्रीती कां प्रमादें । देवेंसीं मज विरुद्धें ।

बोलविलीं तियें मुकुंदें । उपसाहावीं जी ॥ ५५८ ॥

आणि देवाचेनि क्षमत्वें क्षमा । आधारु जाली आहे या भूतग्रामा ।

म्हणौनि जी पुरुषोत्तमा । विनवूं तें थोडें ॥ ५५९ ॥

तरी आतां अप्रमेया । मज शरणागता आपुलिया ।

क्षमा कीजो जी यया । अपराधांसि ॥ ५६० ॥

पितासि लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान् ।

न त्वत्समोऽस्त्यभ्यधिकः कुतोऽन्यो लोकत्रयेऽप्यप्रतिमप्रभावः ॥ ४३॥

जी जाणितलें मियां साचें । महिमान आतां देवाचें ।

जे देवो होय चराचराचें । जन्मस्थान ॥ ५६१ ॥

हरिहरादि समस्तां । देवा तूं परम देवता ।

वेदांतेंही पढविता । आदिगुरु तूं ॥ ५६२ ॥

गंभीर तूं श्रीरामा । नाना भूतैकसमा ।

सकळगुणीं अप्रतिमा । अद्वितीया ॥ ५६३ ॥

तुजसी नाहीं सरिसें । हें प्रतिपादनचि कायसें ? ।

तुवां जालेनि आकाशें । सामाविलें जग ॥ ५६४ ॥

तया तुझेनि पाडें दुजें । ऐसें बोलतांचि लाजिजे ।

तेथ अधिकाची कीजे । गोठी केवीं ॥ ५६५ ॥

म्हणौनि त्रिभुवनीं तूं एकु । तुजसरिखा ना अधिकु ।

तुझा महिमा अलौकिकु । नेणिजे वानूं ॥ ५६६ ॥

तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायं प्रसादये त्वामहमीशमीड्यम् ।

पितेव पुत्रस्य सखेव सख्युः प्रियः प्रियायार्हसि देव सोढुम् ॥ ४४॥

ऐसें अर्जुनें म्हणितलें । मग पुढती दंडवत घातलें ।

तेथें सात्त्विकाचें आलें । भरतें तया ॥ ५६७ ॥

मग म्हणतसे प्रसीद प्रसीद । वाचा होतसे सद्गद ।

काढी जी अपराध- । समुद्रौनि मातें ॥ ५६८ ॥

तुज विश्वसुहृदातें कहीं । सोयरेपणें न मनूंचि पाहीं ।

तुज विईश्वेश्वराचिया ठायीं । ऐश्वर्य केलें ॥ ५६९ ॥

तूं वर्णनीय परी लोभें । मातें वर्णिसी पां सभे ।

तरि मियां वल्गिजे क्षोभें । अधिकाधिक ॥ ५७० ॥

आतां ऐसिया अपराधां । मर्यादा नाहीं मुकुंदा ।

म्हणौनि रक्ष रक्ष प्रमादा । पासोनियां ॥ ५७१ ॥

जी हेंचि विनवावयालागीं । कैंची योग्यता माझिया आंगीं ।

परी अपत्य जैसें सलगी । बापेंसीं बोले ॥ ५७२ ॥

पुत्राचे अपराध । जरी जाहले अगाध ।

तरी पिता साहे निर्द्वंद्व । तैसें साहिजो जी ॥ ५७३ ॥

सख्याचें उद्धत । सखा साहे निवांत ।

तैसें तुवां समस्त । साहिजो जी ॥ ५७४ ॥

प्रियाचिया ठायीं सन्मान । प्रिय न पाहें सर्वथा जाण ।

तेवीं उच्छिष्ट काढिलें आपण । ते क्षमा कीजो जी ॥ ५७५ ॥

नातरी प्राणाचें सोयरें भेटे । मग जीवें भूतलीं जियें संकटें ।

तियें निवेदितां न वाटे । संकोचु कांहीं ॥ ५७६ ॥

कां उखितें आंगें जीवें । आपणपें दिधलें जिया मनोभावें ।

तिया कांतु मिनलिया न राहवें । हृदय जेवीं ॥ ५७७ ॥

तयापरी जी मियां । हें विनविलें तुमतें गोसाविया ।

आणि कांहीं एक म्हणावया । कारण असे ॥ ५७८ ॥

अदृष्टपूर्वं हृषितोऽस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे ।

तदेव मे दर्शय देव रूपं प्रसीद देवेश जगन्निवास ॥ ४५॥

तरी देवेंसीं सलगी केली । जे विश्वरूपाची आळी घेतली ।

ते मायबापें पुरविली । स्नेहाळाचेनि ॥ ५७९ ॥

सुरतरूंची झाडें । आंगणीं लावावीं कोडें ।

देयावें कामधेनुचें पाडें । खेळावया ॥ ५८० ॥

मियां नक्षत्रीं डाव पाडावा । चंद्र चेंडुवालागीं आणावा ।

हा छंदु सिद्धी नेला आघवा । माउलिये तुवां ॥ ५८१ ॥

जिया अमृतलेशालागीं सायास । तयाचा पाऊस केला चारी मास ।

पृथ्वी वाहून चासेचास । चिंतामणी पेरिले ॥ ५८२ ॥

ऐसा कृतकृत्य केला स्वामी । बहुवे लळा पाळिला तुम्हीं ।

दाविलें जें हरब्रह्मीं । नायकिजे कानीं ॥ ५८३ ॥

मा देखावयाची केउती गोठी । जयाची उपनिषदां नाहीं भेटी ।

ते जिव्हारींची गांठी । मजलागीं सोडिली ॥ ५८४ ॥

जी कल्पादीलागोनि । आजिची घडी धरुनी ।

माझीं जेतुलीं हौनी । गेलीं जन्में ॥ ५८५ ॥

तयां आघवियांचि आंतु । घरडोळी घेऊनि असें पाहतु ।

परि ही देखिली ऐकिली मातु । आतुडेचिना ॥ ५८६ ॥

बुद्धीचें जाणणें । कहीं न वचेचि याचेनि आंगणें ।

हे सादही अंतःकरणें । करवेचिना ॥ ५८७ ॥

तेथा डोळ्यां देखी होआवी । ही गोठीचि कायसया करावी ।

किंबहुना पूर्वीं । दृष्ट ना श्रुत ॥ ५८८ ॥

तें हें विश्वरूप आपुलें । तुम्हीं मज डोळां दाविलें ।

तरी माझें मन झालें । हृष्ट देवा ॥ ५८९ ॥

परि आतां ऐसी चाड जीवीं । जे तुजसीं गोठी करावी ।

जवळीक हे भोगावी । आलिंगावासी ॥ ५९० ॥

ते याचि रूपीं करूं म्हणिजे । तरि कोणे एके मुखेंसी चावळिजे ।

आणि कवणा खेंव देईजे । तुज लेख नाहीं ॥ ५९१ ॥

म्हणौनि वारियासवें धावणें । न ठके गगना खेंव देणें ।

जळकेली खेळणें । समुद्रीं केउतें ? ॥ ५९२ ॥

यालागीं जी देवा । एथिंचें भय उपजतसे जीवा ।

म्हणौनि येतुला लळा पाळावा । जे पुरे हें आतां ॥ ५९३ ॥

पैं चराचर विनोदें पाहिजे । मग तेणें सुखें घरीं राहिजे ।

तैसें चतुर्भुज रूप तुझें । तो विसांवा आम्हां ॥ ५९४ ॥

आम्हीं योगजात अभ्यासावें । तेणें याचि अनुभवा यावें ।

शास्त्रांतें आलोडावें । परि सिद्धांतु तो हाचि ॥ ५९५ ॥

आम्हीं यजनें किजती सकळें । परि तियें फळावीं येणेंचि फळें ।

तीर्थें होतु सकळें । याचिलागीं ॥ ५९६ ॥

आणीकही कांहीं जें जें । दान पुण्य आम्हीं कीजे ।

तया फळीं फळ तुझें । चतुर्भुज रूप ॥ ५९७ ॥

ऐसी तेथिंची जीवा आवडी । म्हणौनि तेंचि देखावया लवडसवडी ।

वर्तत असे ते सांकडी । फेडीजे वेगीं ॥ ५९८ ॥

अगा जीवींचें जाणतेया । सकळ विश्ववसवितेया ।

प्रसन्न होईं पूजितया । देवांचिया देवा ॥ ५९९ ॥

किरीटिनं गदिनं चक्रहस्तमिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव ।

तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते ॥ ४६॥

कैसें नीलोत्पलातें रांवित । आकाशाही रंगु लावित ।

तेजाची वोज दावित । इंद्रनीळा ॥ ६०० ॥

जैसा परिमळ जाहला मरगजा । कां आनंदासि निघालिया भुजा ।

ज्याचे जानुवरी मकरध्वजा । जोडली बरव ॥ ६०१ ॥

मस्तकीं मुकुटातें ठेविलें । कीं मुकुटा मुकुट मस्तक झालें ।

शृंगारा लेणें लाधलें । आंगाचेनि जया ॥ ६०२ ॥

इंद्रधनुष्याचिये आडणी । माजीं मेघ गगनरंगणीं ।

तैसें आवरिलें शारङ्गपाणी । वैजयंतिया ॥ ६०३ ॥

आतां कवणी ते उदार गदा । असुरां देत कैवल्य पदा ।

कैसें चक्र हन गोविंदा । सौम्यतेजें मिरवे ॥ ६०४ ॥

किंबहुना स्वामी । तें देखावया उत्कंठित पां मी ।

म्हणौनि आतां तुम्हीं । तैसया होआवें ॥ ६०५ ॥

हे विश्वरूपाचे सोहळे । भोगूनि निवाले जी डोळे ।

आतां होताति आंधले । कृष्णमूर्तीलागीं ॥ ६०६ ॥

तें साकार कृष्णरूपडें । वांचूनि पाहों नावडे ।

तें न देखतां थोडें । मानिताती हे ॥ ६०७ ॥

आम्हां भोगमोक्षाचिया ठायीं । श्रीमूर्तीवांचूनि नाहीं ।

म्हणौनि तैसाचि साकारु होईं । हें सांवरीं आतां ॥ ६०८ ॥

श्रीभगवानुवाच ।

मया प्रसन्नेन तवार्जुनेदं रूपं परं दर्शितमात्मयोगात् ।

तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वम् ॥ ४७॥

या अर्जुनाचिया बोला । विश्वरूपा विस्मयो जाहला ।

म्हणे ऐसा नाहीं देखिला । धसाळ कोणी ॥ ६०९ ॥

कोण हे वस्तु पावला आहासी । तया लाभाचा तोषु न घेसी ।

मा भेणें काय नेणों बोलसी । हेकाडु ऐसा ॥ ६१० ॥

आम्हीं सावियाचि जैं प्रसन्न होणें । तैं आंगचिवरी म्हणें देणें ।

वांचोनि जीव असे वेंचणें । कवणासि गा ॥ ६११ ॥

तें हें तुझिये चाडे । आजि जिवाचेंचि दळवाडें ।

कामऊनियां येवढें । रचिलें ध्यान ॥ ६१२ ॥

ऐसी काय नेणों तुझिये आवडी । जाहली प्रसन्नता आमुची वेडी ।

म्हणौनि गौप्याचीही गुढी । उभविली जगीं ॥ ६१३ ॥

तें हें अपारां अपार । स्वरूप माझें परात्पर ।

एथूनि ते अवतार । कृष्णादिक ॥ ६१४ ॥

हें ज्ञानतेजाचें निखिळ । विश्वात्मक केवळ ।

अनंत हे अढळ । आद्य सकळां ॥ ६१५ ॥

हें तुजवांचोनि अर्जुना । पूर्वीं श्रुत दृष्ट नाहीं आना ।

जे जोगें नव्हे साधना । म्हणौनियां ॥ ६१६ ॥

न वेदयज्ञाध्ययनैर्न दानैर्न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रैः ।

एवं रूपः शक्य अहं नृलोके द्रष्टुं त्वदन्येन कुरुप्रवीर ॥ ४८॥

याची सोय पातले । आणि वेदीं मौनचि घेतलें ।

याज्ञिकी माघौते आले । स्वर्गौनियां ॥ ६१७ ॥

साधकीं देखिला आयासु । म्हणौनि वाळिला योगाभ्यासु ।

आणि अध्ययनें सौरसु । नाहीं एथ ॥ ६१८ ॥

सीगेचीं सत्कर्मे । धाविन्नलीं संभ्रमें ।

तिहीं बहुतेकीं श्रमें । सत्यलोकु ठाकिला ॥ ६१९ ॥

तपीं ऐश्वर्य देखिलें । आणि उग्रपण उभयांचि सांडिलें ।

एक तपसाधन जें ठेलें । अपारांतरें ॥ ६२० ॥

तें हें तुवां अनायासें । विश्वरूप देखिलें जैसें ।

इये मनुष्यलोकीं तैसें । न फवेचि कवणा ॥ ६२१ ॥

आजि ध्यानसंपत्तीलागीं । तूंचि एकु आथिला जगीं ।

हें परम भाग्य आंगीं । विरंचीही नाहीं ॥ ६२२ ॥

मा ते व्यथा मा च विमूढभावो दृष्ट्वा रूपं घोरमीदृङ्ममेदम् ।

व्यपेतभीः प्रीतमनाः पुनस्त्वं तदेव मे रूपमिदं प्रपश्य ॥ ४९॥

म्हणौनि विश्वरूपलाभें श्लाघ । एथिचें भय नेघ नेघ ।

हें वांचूनि अन्य चांग । न मनीं कांहीं ॥ ६२३ ॥

हां गा समुद्र अमृताचा भरला । आणि अवसांत वरपडा जाहला ।

मग कोणीही आथि वोसंडिला । बुडिजैल म्हणौनि ? ॥ ६२४ ॥

नातरी सोनयाचा डोंगरु । येसणा न चले हा थोरु ।

ऐसें म्हणौनि अव्हेरु । करणें घडे ? ॥ ६२५ ॥

दैवें चिंतामणी लेईजे । कीं हें ओझें म्हणौनि सांडिजे ? ।

कामधेनु दवडिजे । न पोसवे म्हणौनि ? ॥ ६२६ ॥

चंद्रमा आलिया घरा । म्हणिजे निगे करितोसि उबारा ।

पडिसायि पाडितोसि दिनकरा । परता सर ॥ ६२७ ॥

तैसें ऐश्वर्य हें महातेज । आजि हातां आलें आहे सहज ।

कीं एथ तुज गजबज । होआवी कां ? ॥ ६२८ ॥

परि नेणसीच गांवढिया । काय कोपों आतां धनंजया ।

आंग सांडोनि छाया । आलिंगितोसि मा ? ॥ ६२९ ॥

हें नव्हे जो मी साचें । एथ मन करूनियां काचें ।

प्रेम धरिसी अवगणियेचें । चतुर्भुज जें ॥ ६३० ॥

तरि अझुनिवरी पार्था । सांडीं सांडीं हे व्यवस्था ।

इयेविषयीं आस्था । करिसी झणें ॥ ६३१ ॥

हें रूप जरी घोर । विकृति आणि थोर ।

तरी कृतनिश्चयाचें घर । हेंचि करीं ॥ ६३२ ॥

कृपण चित्तवृत्ति जैसी । रोंवोनि घालीं ठेवयापासीं ।

मग नुसधेनि देहेंसीं । आपण असे ॥ ६३३ ॥

कां अजातपक्षिया जवळा । जीव बैसवूनि अविसाळां ।

पक्षिणी अंतराळा- । माजीं जाय ॥ ६३४ ॥

नाना गाय चरे डोंगरीं । परि चित्त बांधिलें वत्सें घरीं ।

प्रेम एथिंचें करीं । स्थानपती ॥ ६३५ ॥

येरें वरिचिलेनि चित्तें । बाह्य सख्य सुखापुरतें ।

भोगिजो कां श्रीमूर्तींतें । चतुर्भुज ॥ ६३६ ॥

परि पुढतपुढती पांडवा । हा एक बोलु न विसरावा ।

जे इये रूपींहूनि सद्‍भावा । नेदावें निघों ॥ ६३७ ॥

हें कहीं नव्हतेंचि देखिलें । म्हणौनि भय जें तुज उपजलें ।

तें सांडीं एथ संचलें । असों दे प्रेम ॥ ६३८ ॥

आतां करूं तुजयासारखें । ऐसें म्हणितलें विश्वतोमुखें ।

तरि मागील रूप सुखें । न्याहाळीं पां तूं ॥ ६३९ ॥

संजय उवाच ।

इत्यर्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा स्वकं रूपं दर्शयामास भूयः ॥

आश्वासयामास च भीतमेनं भूत्वा पुनः सौम्यवपुर्महात्मा ॥ ५०॥

ऐसें वाक्य बोलतखेंवो । मागुता मनुष्य जाहला देवो ।

हें ना परि नवलावो । आवडीचा तिये ॥ ६४० ॥

श्रीकृष्णचि कैवल्य उघडें । वरि सर्वस्व विश्वरूपायेवढें ।

हातीं दिधलें कीं नावडे । अर्जुनासि ॥ ६४१ ॥

वस्तु घेऊनि वाळिजे । जैसें रत्‍नासि दूषण ठेविजे ।

नातरी कन्या पाहूनियां म्हणिजे । मना न ये हे ॥ ६४२ ॥

तया विश्वरूपायेवढी दशा । करितां प्रीतीचा वाढू कैसा ।

सेल दीधलीसे उपदेशा । किरीटीसिं देवें ॥ ६४३ ॥

मोडोनि भांगाराचा रवा । लेणें घडिलें आपलिया सवा ।

मग नावडे जरी जीवा । तरी आटिजे पुढती ॥ ६४४ ॥

तैसें शिष्याचिये प्रीती जाहलें । कृष्णत्व होतें तें विश्वरूप केलें ।

तें मना नयेचि मग आणिलें । कृष्णपण मागुतें ॥ ६४५ ॥

हा ठाववरी शिष्याची निकसी । सहातें गुरु आहाती कवणे देशीं ? ।

परि नेणिजे आवडी कैशी । संजयो म्हणे ॥ ६४६ ॥

मग विश्वरूप व्यापुनि भोंवतें । जें दिव्य तेज प्रगटलें होतें ।

तेंचि सामावलें मागुतें । कृष्णरूपीं तये ॥ ६४७ ॥

जैसें त्वंपद हें आघवें । तत्पदीं सामावे ।

अथवा द्रुमाकारु सांठवे । बीजकणिके जेवीं ॥ ६४८ ॥

नातरी स्वप्नसंभ्रमु जैसा । गिळी चेइली जीवदशा ।

श्रीकृष्णें योगु हा तैसा । संहारिला तो ॥ ६४९ ॥

जैसी प्रभा हारपली बिंबीं । कीं जळदसंपत्ती नभीं ।

नाना भरतें सिंधुगर्भीं । रिगालें राया ॥ ६५० ॥

हो कां जे कृष्णाकृतीचिये मोडी । होती विश्वरूपपटाची घडी ।

ते अर्जुनाचिये आवडी । उकलूनि दाविली ॥ ६५१ ॥

तंव परिमाणा रंगु । तेणें देखिलें साविया चांगु ।

तेथ ग्राहकीये नव्हेचि लागु । म्हणौनि घडी केली पुढती ॥ ६५२ ॥

तैसें वाढीचेनि बहुवसपणें । रूपें विश्व जिंतिलें जेणें ।

तें सौम्य कोडिसवाणें । साकार जाहलें ॥ ६५३ ॥

किंबहुना अनंतें । धरिलें धाकुटपण मागुतें ।

परि आश्वासिलें पार्थातें । बिहालियासी ॥ ६५४ ॥

जो स्वप्नीं स्वर्गा गेला । तो अवसांत जैसा चेइला ।

तैसा विस्मयो जाहला । किरीटीसी ॥ ६५५ ॥

नातरी गुरुकृपेसवें । वोसरलेया प्रपंचज्ञान आघवें ।

स्फुरे तत्त्व तेवीं पांडवें । श्रीमूर्ति देखिली ॥ ६५६ ॥

तया पांडवा ऐसें चित्तीं । आड विश्वरूपाची जवनिका होती ।

ते फिटोनि गेली परौती । हें भलें जाहलें ॥ ६५७ ॥

काय काळातें जिणोनि आला । कीं महावातु मागां सांडिला ।

आपुलिया बाही उतरला । सातही सिंधु ॥ ६५८ ॥

ऐसा संतोष बहु चित्तें । घेइजत असे पंडुसुतें ।

विश्वरूपापाठीं कृष्णातें । देखोनियां ॥ ६५९ ॥

मग सूर्याचिया अस्तमानीं । मागुती तारा उगवती गगनीं ।

तैसी देखों लागला अवनीं । लोकांसहित ॥ ६६० ॥

पाहे तंव तेंचि कुरुक्षेत्र । तैसेंचि देखे दोहीं भागीं गोत्र ।

वीर वर्षताती शस्त्रास्त्र । संघाटवरी ॥ ६६१ ॥

तया बाणांचिया मांडवाआंतु । तैसाचि रथु देखे निवांतु ।

धुरे बैसला लक्ष्मीकांतु । आपण तळीं ॥ ६६२ ॥

अर्जुन उवाच ।

दृष्ट्वेदं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दन ।

इदानीमस्मि संवृत्तः सचेताः प्रकृउतिं गतः ॥ ५१॥

एवं मागील जैसें तैसें । तेणें देखिलें वीरविलासें ।

मग म्हणे जियालों ऐसें । जाहलें आतां ॥ ६६३ ॥

बुद्धीतें सांडोनि ज्ञान । भेणें वळघलें रान ।

अहंकारेंसी मन । देशोधडी जाहलें ॥ ६६४ ॥

इंद्रियें प्रवृत्ती भुललीं । वाचा प्राणा चुकली ।

ऐसें आपांपरी होती जाली । शरीरग्रामीं ॥ ६६५ ॥

तियें आघवींचि मागुतीं । जिवंत भेटलीं प्रकृती ।

आतां जिताणें श्रीमूर्ती । जाहलें मियां ॥ ६६६ ॥

ऐसें सुख जीवीं घेतलें । मग श्रीकृष्णातें म्हणितलें ।

मियां तुमचें रूप देखिलें । मानुष हें ॥ ६६७ ॥

हें रूप दाखवणें देवराया । कीं मज अपत्या चुकलिया ।

बुझावोनि तुवां माया । स्तनपान दिधलें ॥ ६६८ ॥

जी विश्वरूपाचिया सागरीं । होतों तरंग मवित वांवेवरी ।

तो इये निजमूर्तीच्या तीरीं । निगालों आतां ॥ ६६९ ॥

आइकें द्वारकापुरसुहाडा । मज सुकतिया जी झाडा ।

हे भेटी नव्हे बहुडा । मेघाचा केला ॥ ६७० ॥

जी सावियाची तृषा फुटला । तया मज अमृतसिंधु हा भेटला ।

आतां जिणयाचा जाहला । भरंवसा मज ॥ ६७१ ॥

माझिया हृदयरंगणीं । होताहे हरिखलतांची लावणी ।

सुखेंसीं बुझावणी । जाहली मज ॥ ६७२ ॥

श्रीभगवानुवाच ।

सुदुदर्शमिदं रूपं दृष्टवानसि यन्मम ।

देवा अप्यस्य रूपस्य नित्यं दर्शकाङ्क्षिणः ॥ ५२॥

यया पार्थाचिया बोलासवें । हें काय म्हणितलें देवें ।

तुवां प्रेम ठेवूनि यावें । विश्वरूपीं कीं ॥ ६७३ ॥

मग इये श्रीमूर्ती । भेटावें सडिया आयती ।

ते शिकवण सुभद्रापती । विसरलासि मा ॥ ६७४ ॥

अगा आंधळिया अर्जुना । हाता आलिया मेरूही होय साना ।

ऐसा आथी मना । चुकीचा भावो ॥ ६७५ ॥

तरी विश्वात्मक रूपडें । जें दाविलें आम्ही तुजपुढें ।

तें शंभूही परि न जोडे । तपें करितां ॥ ६७६ ॥

आणि अष्टांगादिसंकटीं । योगी शिणताति किरीटी ।

परि अवसरु नाहीं भेटी । जयाचिये ॥ ६७७ ॥

तें विश्वरूप एकादे वेळ । कैसेनि देखों अळुमाळ ।

ऐसें स्मरतां काळ । जातसे देवां ॥ ६७८ ॥

आशेचिये अंजुळी । ठेऊनि हृदयाचिया निडळीं ।

चातक निराळीं । लागले जैसे ॥ ६७९ ॥

तैसे उत्कंठा निर्भर । होऊनियां सुरवर ।

घोकीत आठही पाहार । भेटी जयाची ॥ ६८० ॥

परि विश्वरूपासारिखें । स्वप्नींही कोण्ही न देखे ।

तें प्रत्यक्ष तुवां सुखें । देखिलें हें ॥ ६८१ ॥

नाहं वेदैर्न तपसा न दानेन न चेज्यया ।

शक्यं एवंविधो द्रष्टुं दृष्टवानसि मां यथा ॥ ५३॥

पैं उपायांसि वाटा । न वाहती एथ सुभटा ।

साहीसहित वोहटा । वाहिला वेदीं ॥ ६८२ ॥

मज विश्वरूपाचिया मोहरा । चालावया धनुर्धरा ।

तपांचियाही संभारा । नव्हेचि लागु ॥ ६८३ ॥

आणि दानादि कीर कानडें । मी यज्ञींही तैसा न सांपडें ।

जैसेनि कां सुरवाडें । देखिला तुवां ॥ ६८४ ॥

तैसा मी एकीचि परि । आंतुडें गा अवधारीं ।

जरी भक्ति येऊनि वरी । चित्तातें गा ॥ ६८५ ॥

भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवंविधोऽर्जुन ।

ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परंतप ॥ ५४॥

परि तेचि भक्ति ऐसी । पर्जन्याची सुटिका जैसी ।

धरावांचूनि अनारिसी । गतीचि नेणें ॥ ६८६ ॥

कां सकळ जळसंपत्ती । घेऊनि समुद्रातें गिंवसिती ।

गंगा जैसी अनन्यगती । मिळालीचि मिळे ॥ ६८७ ॥

तैसें सर्वभावसंभारें । न धरत प्रेम एकसरें ।

मजमाजीं संचरे । मीचि होऊनि ॥ ६८८ ॥

आणि तेवींचि मी ऐसा । थडिये माझारीं सरिसा ।

क्षीराब्धि कां जैसा । क्षीराचाचि ॥ ६८९ ॥

तैसें मजलागुनि मुंगीवरी । किंबहुना चराचरीं ।

भजनासि कां दुसरी । परीचि नाहीं ॥ ६९० ॥

तयाचि क्षणासवें । एवंविध मी जाणवें ।

जाणितला तरी स्वभावें । दृष्टही होय ॥ ६९१ ॥

मग इंधनीं अग्नि उद्दीपें । आणि इंधन हें भाष हारपे ।

तें अग्निचि होऊनि आरोपें । मूर्त जेवीं ॥ ६९२ ॥

कां उदय न कीजे तेजाकारें । तंव गगनचि होऊनि असे आंधारें ।

मग उदईलिया एकसरें । प्रकाशु होय ॥ ६९३ ॥

तैसें माझिये साक्षात्कारीं । सरे अहंकाराची वारी ।

अहंकारलोपीं अवधारीं । द्वैत जाय ॥ ६९४ ॥

मग मी तो हें आघवें । एक मीचि आथी स्वभावें ।

किंबहुना सामावे । समरसें तो ॥ ६९५ ॥

मत्कर्मकृन्मत्परमो मद्भक्तः संगवर्जितः ॥

निर्वैरः सर्वभूतेषु यः स मामेति पाण्डव ॥ ५५॥

ॐ इति श्रीमद्भग्वद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे

श्रीकृष्णार्जुनसंवादे विश्वरूपदर्शनयोगोनाम एकादशोऽध्यायः ॥ ११ ॥

जो मजचि एकालागीं । कर्में वाहातसे आंगीं ।

जया मीवांचोनि जगीं । गोमटें नाहीं ॥ ६९६ ॥

दृष्टादृष्ट सकळ । जयाचें मीचि केवळ ।

जेणें जिणयाचें फळ । मजचि नाम ठेविलें ॥ ६९७ ॥

मग भूतें हे भाष विसरला । जे दिठी मीचि आहें सूदला ।

म्हणौनि निर्वैर जाहला । सर्वत्र भजे ॥ ६९८ ॥

ऐसा जो भक्तु होये । तयाचें त्रिधातुक हें जैं जाये ।

तैं मीचि हौनि ठायें । पांडवा गा ॥ ६९९ ॥

ऐसें जगदुदरदोंदिलें । तेणें करुणारसरसाळें ।

संजयो म्हणे बोलिलें । श्रीकृष्णदेवें ॥ ७०० ॥

ययावरी तो पंडुकुमरु । जाहला आनंदसंपदा थोरु ।

आणि कृष्णचरणचतुरु । एक तो जगीं ॥ ७०१ ॥

तेणें देवाचिया दोनही मूर्ती । निकिया न्याहाळिलिया चित्तीं ।

तंव विश्वरूपाहूनि कृष्णाकृतीं । देखिला लाभु ॥ ७०२ ॥

परि तयाचिये जाणिवे । मानु न कीजेचि देवें ।

जें व्यापकाहूनि नव्हे । एकदेशी ॥ ७०३ ॥

हेंचि समर्थावयालागीं । एक दोन चांगी ।

उपपत्ती शारङ्गी । दाविता जाहला ॥ ७०४ ॥

तिया ऐकोनि सुभद्राकांतु । चित्तीं आहे म्हणतु ।

तरि होय बरवें दोन्हीं आंतु । तें पुढती पुसों ॥ ७०५ ॥

ऐसा आलोचु करूनि जीवीं । आतां पुसती वोज बरवी ।

आदरील ते परिसावी । पुढें कथा ॥ ७०६ ॥

प्रांजळ ओंवीप्रबंधें । गोष्टी सांगिजेल विनोदें ।

तें परिसा आनंदें । ज्ञानदेवो म्हणे ॥ ७०७ ॥

भरोनि सद्‍भावाची अंजुळी । मियां वोंवियाफुलें मोकळीं ।

अर्पिलीं अंघ्रियुगुलीं । विश्वरूपाच्या ॥ ७०८ ॥

इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां एकादशोऽध्यायः ॥

No comments:

Post a Comment